सरहदतर्फे स्व. श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मणिपुरी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
पुणे, दि. २ ऑगस्ट : ईशान्य भारत समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि गुणवत्तेने संपन्न असून देशाच्या प्रगतीमध्ये या प्रदेशाचे मोठे योगदान आहे. मणिपूरमधून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्व. श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मुलींचे वसतिगृह सुरक्षित आणि आपुलकीचे दुसरे घर ठरेल, असा विश्वास मणिपूरचे उपमुख्यमंत्री लोसी दिखो यांनी व्यक्त केला.
पुणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी एकरूप होऊन शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत बना, असे आवाहनही त्यांनी पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांना केले.
सरहद संस्थेतर्फे गुजर निंबाळकरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या स्व. श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मणिपुरी मुलींच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ रविवारी उपमुख्यमंत्री लोसी दिखो यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया, श्रीबाला फिरोदिया, मणिपूरमधील ज्येष्ठ पत्रकार ब्रोझेन्द्र निंगोम्बा, के. सरोजकुमार शर्मा, केशम यईफाबा, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
वसतिगृह राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
देशाच्या प्रत्येक भागातील युवा पिढीला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे लोसी दिखो यांनी सांगितले. संघर्ष आणि आव्हानांचा सामना करणाऱ्या मणिपूरमधील विद्यार्थी, महिला आणि युवकांसाठी सरहद संस्थेचा हा उपक्रम अत्यंत मोलाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वसतिगृहामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित आणि पोषक वातावरणात शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पूर्ण लाभ घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विविध प्रदेशांतील नागरिकांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य वाढविणारे हे वसतिगृह राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरेल, असेही लोसी दिखो म्हणाले.
दोन प्रदेशांमधील नाते अधिक दृढ होईल
डॉ. अभय फिरोदिया म्हणाले की, ईशान्य भारताला उर्वरित देशापासून वेगळे ठेवण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी झाले. मात्र या वसतिगृहाच्या माध्यमातून ईशान्य भारत आणि महाराष्ट्र यांच्यातील समन्वय तसेच लोकांचे परस्परांशी असलेले नाते अधिक दृढ होणार आहे.
आजची युवा पिढी देशाची दिशा निश्चित करणार आहे. मणिपूरमधील तरुणांना सध्या मोठ्या तणावाचा सामना करावा लागत असून पुण्यासारख्या सुरक्षित शहरात त्यांना शिक्षण घेण्याची आणि स्थानिक संस्कृतीत समरस होण्याची संधी मिळेल. सरहद संस्था माणसे आणि संस्कृतींना जोडणारे पूल उभारण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभर विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन आणि शिक्षणाची सुविधा
सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मणिपूरमध्ये संकट निर्माण झाल्यानंतर तेथील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. ही गरज लक्षात घेऊन डॉ. अभय फिरोदिया यांच्या सहकार्याने सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे.
या वसतिगृहात सुमारे शंभर विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन आणि शिक्षणाशी संबंधित आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे मणिपूरमध्ये सकारात्मक आणि विश्वासदर्शक संदेश पोहोचेल, असे नहार यांनी सांगितले.
लोसी दिखो यांचे स्वागत मणिपुरी विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन केले. डॉ. अभय फिरोदिया यांचे स्वागत मणिपुरी विद्यार्थ्यांनी केले. अन्य मान्यवरांचे स्वागत अनुज नहार, शैलेश वाडेकर आणि लेशपाल जवळगे यांनी केले. हर्षदा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर अनुज नहार यांनी आभार मानले.

