: उत्सवाचे १३३ वे वर्षमहाराष्ट्र व पंजाब यांच्या संस्कृती व परंपरा जीपासण्याचा प्रयत्न
पुणे: सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. हुबेहुब प्रतिकृती साकारण्याच्या मंडळाच्या वैशिष्ट्यामुळे उत्सवात सुवर्ण मंदिरात गेल्याचा अनुभव गणेशभक्तांना मिळणार आहे. शीख समुदायाचे संत गुरुनानक यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित आणि महाराष्ट्र व पंजाब यांच्या संस्कृती व परंपरा ची माहिती व्हावी, या उद्देशाने यंदा सुवर्ण मंदिर साकारण्यात येत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे भव्य आणि हुबेहूब साकारणे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे मंदिराचे पावित्र्य आणि रीती रिवाज देखील यावेळी जपले जातात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण गवळे, मंडळाचे विश्वस्त मंगेश इरोरे, सुनील निंबाळकर, संग्रामसिंह शिंदे उपस्थित होते. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे.
श्रींची प्राणप्रतिष्ठापना व देखाव्याचे उद्घाटन शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, उद्योजक पुनीत बालन, मनजीत कॉटनचे संचालक मनजीत राजपाल, उद्योजक नरेश वाधवानी, पत्रकार मिकी घई यांच्या हस्ते होणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ५० गुरद्वाराचे प्रमुख या सोहळ्यास उपस्थित असणार आहेत.
देखाव्याचे कला दिग्दर्शन मिरॅकल इव्हेंट्स चे विनायक रासकर, विद्युत रोषणाई माधव लाईट्स चे सुनील शेडगे, वैभव जाधव, मंडप व्यवस्था अरविंद बलुतकर हे साकारणार आहेत.
युवराज निंबाळकर म्हणाले, मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या श्री सुवर्ण मंदिराची प्रतिकृती ६५ फूट उंच असणार आहे. त्यात मंदिर ४२ फूट रुंद आणि ६४ फूट लांब असणार आहे. मंदिराच्या बाजूने बारा फूट तलाव असून मंदिराच्या मागील भिंत २० फूट बाय ३५ फूट आहे. महाप्रवेशद्वार ६४ फूट बाय ३२ फूट असणार आहे.
पुण्याच्या वाहतुकीला व्यत्यय नाही- मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही खड्डा खणून रस्त्याचे नुकसान मंडळ करीत नाही. फळ्यांच्या आधारे हँगिंग मंडप उभारण्यात येतो. त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीला कोणत्याही व्यत्यय येत नाही.
मंडळाच्या वतीने उत्सव काळात आरोग्य सेवा- गणेशोत्सव काळात पुण्यात येणाऱ्या गणेश भक्तांची काळजी मंडळाच्या वतीने घेण्यात येते. संपूर्ण दहा दिवस डॉक्टरांसह अॅम्बुलन्स सेवा मंडळाच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असते. तसेच कोविड काळात आपल्या मंडळांनी सर्वतोपरी मदत पुणेकरांना केली आहे.
सामाजिक कार्यातही मंडळ अग्रेसर– सामाजिक कार्यात देखील मंडळ अग्रेसर आहे. इको फ्रेंडली गणेशाची कार्यशाळा, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यवसाय, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्तीसाठी कार्यशाळा, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात.
विद्यार्थी करतात मंडळाच्या वतीने साकारण्यात येणारा प्रतिकृतीचा अभ्यास – देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या प्रतिकृती मंडळाच्या वतीने साकारण्यात येतात. त्या मंदिराचा बारकाईने अभ्यास करून मंदिर साकारल्याने मूळ मंदिरात गेल्याचा अनुभव गणेश भक्तांना येतो. त्यामुळे मंदिराचे काम सुरु असताना विविध तंत्र शिक्षण देणाऱ्या शाळा, आर्किटेक्चर, इंटिरियर चे विद्यार्थी मंडळाला भेट देतात आणि प्रतिकृतीचा अभ्यास करतात. सर्व देखाव्याचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील मंडळाच्या वतीने करण्यात येते.