१२० फूट लांब व ६१ फूट उंच मंदिर
श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट कडून अप्रतिम उभारणी
पुणे :
काळाचे चक्र फिरवणाऱ्या महाकालचे दर्शन साक्षात पुण्यामध्ये होणार आहे. यंदा तुळशीबागेतील श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट गणेशोत्सवामध्ये मध्यप्रदेशमधील महाकाल मंदिर साकारणार आहेत. उज्जैनगरीचे राजा आणि शिवभक्तांचे दैवत असलेल्या महाकाल मंदिराची हुवेहब प्रतिकृती तुळशीबागेमध्ये पाहता येणार आहे. संपूर्ण १० दिवस सुविख्यात महाकाल श्रृंगार आणि विधिवत पूजा देखील केली जाणार आहे.
मंडळाच्यावतीने अध्यक्ष सागर सुनील दहीभाते तसेच सर्व पदाधिकारी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. विश्रामबागवाडा समोरून तुळशीबागेत जाणाऱ्या गल्लीच्या प्रारंभीच ही भव्य प्रतिकृती उभी राहत असून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पारंपरिक गणेशोत्सवासाठी आणि समाजाभिमुख कामांसाठी श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट ओळखले जाते. यंदा मंडळाचे ५९ वर्ष असून यानिमित्ताने भव्य गणेशोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. तुळशीबागेमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकाल मंदिर आकार घेत आहे. मराठी चित्रपट सृष्टीत सेट तयार करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे महेश कोरे यासाठी मेहनत घेत आहेत. हे महाकाल मंदिर १२० फूट लांब व ६१ फूट उंच असे भव्य असणार आहे. श्री महाकाल मंदिरातील सर्व विधी, पूजा आणि श्रृंगार मंदिरामध्ये केला जाणार आहे. यामध्ये पहाटेची भस्म आरती, बालभोग आरती, संध्या पूजन आरती, संध्या आरती, शयन आरती नित्यनियमाने होणार आहे. यासाठी खास उज्जैनगरीहून पुजारी बोलवण्यात आहेत. त्याचबरोबर ६ दिवस होमहवन आणि हजारो लोकांना प्रसाद वाटप केले जाणार आहे.
महाकाल दरबारचा भस्म आणि ७५ हजार रुद्राक्ष
उज्जैननगरीला जाऊन श्री महाकालचे दर्शन घेणे ही प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. मात्र प्रत्येकालाच तिकडे जाणे शक्य नाही, त्या प्रत्येक भक्ताला तुळशीबागेमध्ये श्री महाकालचे दर्शन याची देही याची डोळा घेता येणार आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना महाकाल दर्शनाची अनुभूती येणार आहे. उज्जैनवरून खास महाकाल दरबारचा भस्म आणि ७५ हजार रुद्राक्ष मागवण्यात आले आहे. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला ते दिले जाणार आहे. प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब गोपाळे यांची मंडप व्यवस्था करणारी संपूर्ण टीम या भव्य प्रतिकृती साठी मेहनत घेत आहे.
मंडळाच्यावतीने अध्यक्ष सागर सुनील दहीभाते तसेच सर्व पदाधिकारी यांच्याकडून पुणेकर आणी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.