पुणे-पुण्यात काेयता गँगचा धुमाकूळ सुरु असतानाच आता काैटुंबिक वादात देखील धारदार काेयत्याचा वापर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. येरवडा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पतीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. यावेळी त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर धारदार काेयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेखा बंडु कांबळे (वय-४०,रा. येरवडा,पुणे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी पाेलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पती बंडू हरीशचंद्र कांबळे (४६) याचेवर येरवडा पाेलिस ठाण्यात भान्यास १०९, ३५२, आर्म अॅक्ट ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे दाम्पत्य येरवडा परिसरात लक्ष्मीनगर याठिकाणी राहते. पती बंडू कांबळे हा पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी सतत वाद घालत हाेता. 1 सप्टेंबर राेजी पती बंडू कांबळे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडणे करत तिला शिवीगाळ केली.
त्यानंतर तिला म्हणाला, मला दारुसाठी पैसे देणार नाहीस, थांब तुला आता कायमची संपवूनच टाकताे, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याने पत्नीच्या डाेक्यावर मध्यभागी, उजव्या दंडाच्या पाठीमागील बाजूस , खांद्यावर डाव्या हाताच्या काेपरावर, उजव्या डाेळ्याच्या भुवईच्या वर, कपाळावर त्याचे हातातील धारदार काेयत्याने वार करुन तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी येरवडा पाेलिस पुढील तपास करत आहेत.