पुणे- शहरातील प्रमुख रस्त्यांवर रोजच्या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य पुणेकर त्रासला आहे. अश्यातच काल “अंदर से कोई बाहर ना जा सके, बाहर से कोई अंदर ना आ सके” अशी काहीशी अवस्था पुणेकरांची झाली होती. (अशीच अवस्था पालखी सोहळ्याच्या वेळी ही झाली होती !! ) उत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करताना संपूर्ण शहराचा विचार करून आणि सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून रचना केली पाहिजे. मात्र काल तसं घडताना दिसून आले नाही. दहीहंडी उत्सवात नागरिकांची कोंडी झाली पण आता यापुढे गणेशोत्सवात तरी वाहतूक नियोजन नीट करा असे आवाहन भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना केले आहे.
खर्डेकर यांनी यासंदर्भात असे म्हटले आहे कि,’ दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळानी अचानक रस्ते बंद केल्याने नागरिक अडकले आणि त्याच वेळी वाहतूक पोलिसांनी देखील बॅरिकेड लावून रस्ते बंद केले. उदाहरणार्थ शहराच्या मध्य वस्तीतून गल्ली बोळातून फिरत फिरत शनिवारवाड्या समोरील श्रीमंत बाजीराव पेशवा पुतळ्याजवळ आले तर तेथून बाहेर पडायला किंवा छत्रपती शिवाजी रस्त्याने आत जायला बॅरिकेड लावून बंदी घालण्यात आली होती. असे अनेक ठिकाणी घडत होते आणि नागरिकांची अवस्था “अभिमन्यू, चक्रव्युह में फंस गया हैं तू ” अशी झाली होती. आता तर गणेशोत्सवाचे मांडव पडत आहेत, देखावे उभारले जात आहेत, नदीपात्रातील रस्ता कधी बंद होईल याची शाश्वती नाही,मध्य पुण्यात खरेदीची गर्दी वाढत आहे, अश्या परिस्थितीत गणेश विसर्जन मिरवणूकीपर्यंत नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.ह्या काळात मध्य पुण्यात चारचाकी ला बंदी घालता येईल का याबाबतची व्यवहार्यता तपासावी. अर्थात यातून शहरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल, तसेच पावसामुळे नागरिकांचा चारचाकी वापरण्याकडे कल असतो याचा ही विचार व्हावा.थोडक्यात काय तर आपणांस आग्रहाची नम्र विनंती की संपूर्ण शहराचा नकाशा मांडून, त्यानुसार वाहतूक नियोजन करावे व नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा. तसेच रस्ते पूर्णतः बंद करून अनावश्यकरित्या वाहतूक कोंडीत भर घालू नये.