संस्थेतील ७५० विद्यार्थिनींनी अन्याय सहन न करण्याची घेतली शपथ
सोसायटीतर्फे “मुलींची सुरक्षितता : आमचे प्राधान्य” कार्यक्रम
पुणे : मी शक्ती रुप अहिल्या.. राणी लक्ष्मीबाईचा वारसा… आम्ही या पुढे भितीने आयुष्य जगणार नाही. अशी प्रतिज्ञा करीत मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध यावेळी विद्यार्थीनींनी केला. तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करुन आम्हाला दुर्बल समजू नका. अन्याय-अत्याचार आम्ही सहन करणार नाही, स्वतःचे संरक्षण आम्ही स्वतः करु, असा संदेश दिला.
शाळकरी मुली शाळेत देखील सुरक्षित नसल्याचे चित्र राज्यातील काही घटनांमधून दिसून येत आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी शाळेने देखील अतिशय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी मराठा सोसायटीने “मुलींची सुरक्षितता : आमचे प्राधान्य” या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील शैक्षणिक संकुलात केले होते. यावेळी कायदेतज्ञ अॅड.प्रताप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बागुल, दामिनी पथकातील निवेदिता यादव, संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, कमलताई व्यवहारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गुड टच बॅड टच या विषयावरील पथनाट्य सादर केले.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, कोणतीही चुकीची गोष्ट घडल्यास मुलींनी निडर होऊन पालक किंवा शिक्षकांना सांगायला हवे. पोलिसांची तसेच कायद्याची भिती मनातून काढून टाका, हे दोघेही तुमच्या संरक्षणासाठी आहेत. मुली धैर्याने लढल्या तर समाजातील वाईट प्रवृतींना आळा बसेल.
प्रियांका बागुल म्हणाल्या, मुलींनी वेळीच चुकीच्या गोष्टींना नाही म्हटले नाही तर त्या गोष्टी पुढे मोठे स्वरुप घेतील. मुलींनी सक्षम व्हा, जेणेकरुन कोणीही तुमच्याकडे चुकीच्या नजरेने बघणार नाही.
अण्णा थोरात म्हणाले, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीसाठी सक्षम बनविणे या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे शाळेत आल्यावर मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शाळा घेणार आहे, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुलींना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर बनविण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे देखील शाळेत दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.
कमलताई व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले, जगदीश जेधे यांनी आभार मानले.