शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन : माता यशोदा सन्मान सोहळा
पुणे : गोविंदा आला रे आला…गोविंदा रे गोपाळा…. या पारंपरिक बँडवर वाजविलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांचे पाय थिरकले आणि त्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात पुण्यजागर प्रकल्प भोई प्रतिष्ठान नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांनी व अस्तित्व गुरुकुल मधील मुलांनी सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दmहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुल नटराज वत्स सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी विशेष मुला-मुलींचे संगोपन करणा-या पल्लवी वाघ यांचा यशोदा माता सन्मान देऊन गौरव करण्यात आला. साडी चोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते.
कार्यक्रमाला भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते, आनंद सराफ, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, प्रा.रुपाली देशपांडे, होनराज मावळे, सिद्धार्थ नवरे, ओंकार चिकणे आदी उपस्थित होते.
पारंपरिक वेशात चिमुकले या उत्सवात सहभागी झाले होते. पुण्यजागर प्रकल्प व अस्तित्व गुरुकुल संस्थेला शालेय साहित्यरुपी गोपाळकाला मदत म्हणून देण्यात आला. शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या स्मरणार्थ स्वरगोकुळ हा अतुल खांडेकर यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. लीलाधर चक्रदेव, प्रणव गुरव यांनी साथसंगत केली. विक्रम मंडळ सोमवार पेठ, मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स, श्री देवज्ञ नामदेव शिंपी समाज कसबा पेठ यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.