राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये: सतेज पाटील
मुंबई, दि. २७ ऑगस्ट २०२४
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आणि काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला, महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांनी मालवणला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, मालवण मधील शिवछत्रपतीचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. हे अपयश शौर्याचा मोठा इतिहास असलेल्या नौदलाच्या माथी मारण्याचे पाप राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारने या घटनेबाबत जनतेची माफी मागावी. केवळ उद्घाटनाची घाई असल्यामुळे त्याचा मोठा इव्हेंट करायचा होता म्हणून अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारणीचे काम देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा उभारणी वेळी राज्य सरकारचे कला संचालनालय काय करत होते?
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्या घटनेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन करुन भाजपा युती सरकारचा निषेध केला. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोल्हापुरमध्ये महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उग्र निदर्शने केली. याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिनभाई चव्हाण, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना उपनेते संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, तौफिक मुल्लाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून शिवद्रोही सरकारचा निषेध केला. ह्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक येथे शहर काँग्रेस अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सचिव राहूल दिवे, युवक काँग्रेसचे राहुल पाटील, सुदेश आण्णा मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून शिवद्रोही सरकारचा निषेध केला.