वर्धा-दहीहंडीच्या कार्यक्रमात डीजे वाजवण्यासाठी साऊंडची टेस्टिंग घेणाऱ्या 2 जणांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे घडली. या घटनेमुळे दहीहंडीच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडले आहे.आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. पण वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे या सणाच्या आनंदावर दुःखाचे विरजन पडले आहे. येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी 2 तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या तरुणांनी डीजेसाठी विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरून वीज घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कहर म्हणजे या दोघांचेही मृतदेह रात्रभर तारेला चिकटलेल्या स्थितीत होते. रात्र असल्यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. पण आज सकाळी उठल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज चिंदूजी बावणे (27) व सेजल किशोर बावणे (13) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूरजच्या कुटुंबीयाला सोमवारच्या दहीहंडी कार्यक्रमात डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली ही. यासाठी त्यांनी विजवाहक तारांमधून वीज घेण्याचा प्रयत्न केला. पण विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.गावात दहीहंडीच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे सर्वजण आनंदात होते. पण ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडले आहे.