- जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे १०० सायकलचे गरजूंना वाटप
पुणे : श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी… हाथी घोडा पालकी, जय कन्हैयालाल की… गोपालकृष्ण भगवान की जय… याचा जयघोष करत ढोलताशाच्या गजरात बालगोपाळांनी अभिनव अशी सायकल दहीहंडी फोडली. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन, पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचे आयोजन केले होते.
बालगोपाळांनी ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. या सायकल दहीहंडीतील १०० सायकलींचे मावळ तालुक्यातील करंजगाव, ब्राम्हणवाडी, मोरमारेवाडी, पालेनामा या अतिदुर्गम भागातील, तसेच पुणे शहर परिसरातील गरजू मुलामुलींना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी सायकलींच्या मधोमध क्रेनला बांधलेली दहीहंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. रुद्रांग वाद्यपथक (ट्रस्ट), वज्र युवा मंच या दोन पथकांनी बहारदार ढोलवादन केले.
यावेळी उद्योजक पुनीत बालन, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, संयोजक कान्होजी दयानंद जेधे, गौरव बोराडे, रोहन काळभोर, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, वैभव वाघ, उमेश सपकाळ, मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर, मंगेश कोंढरे, जयराज वाडेकर, साहिल भिंगे, राजवीर जेधे, साईराज नाईक, ऋषिकेश झंवर, प्रीतम परदेशी आदी उपस्थित होते.
पुनीत बालन म्हणाले, “आजवर इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे पुणे, सातारा व अन्य जिल्ह्यातील १२ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित ज्ञान मिळण्यास वेळ मिळावा, हा यामागचा उद्देश आहे. यंदा या अभिनव सायकल दहीहंडीच्या माध्यमातून १०० सायकलींचे वाटप केले असून, पुढील वर्षी या उपक्रमात ५०० सायकलींचे वाटप होईल.”
प्रवीण पाटील म्हणाले, “अभिनव सायकल दहीहंडी काय प्रकार आहे, याची उत्सुकता लागली होती. प्रत्यक्षात या उपक्रमातून सामाजिक बांधीलकी जपताना पाहून आनंद वाटला. अतिशय विधायक पद्धतीने सण, उत्सव साजरा करण्याची ही पद्धत मला भावली. ग्रामीण भागातील या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरील सायकल मिळाल्याचा आनंद सुखावणारा आहे.”
मोहन जोशी म्हणाले, “संपूर्ण पुण्यात ही एकमेव सामाजिक दहीहंडी आहे, ज्यातून समाजहिताचा विचार होतो. यामध्ये पुनीत बालन यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन अंतर्गत दरवर्षी विविध पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते आणि त्यातून समाजातील मुलांना याचा कसा फायदा होतो याचा विचार केला जातो.”
कान्होजी जेधे म्हणाले, “दरवर्षी काही नवीन करण्याचा आमचा ध्यास असतो. या उपक्रमातून आपण समाजाला कशी मदत करू शकू, याकडे जास्त कल असतो. गेल्यावर्षी अभिनव खेळणी दहीहंडीतुन एक हजारपेक्षा अधिक खेळणी गरजू मुलांना देण्यात आले होते. यंदा सायकल हंडीतून दुर्गम भागातील मुलांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.”