पुणे- आज महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या हस्ते व महाराष्ट्र अर्बन सेलचे समन्वयक नितिन जाधव, पुणे शहराचे माजी अध्यक्ष नितीन कदम, पुणे अर्बन सेलच्या सदस्य नीता गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नील दुधाने यांची पुणे शहर अर्बन सेलच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली .यावेळी सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भविष्यात मी प्रामाणिक प्रयत्न करेन. असे दुधाने यांनी म्हटले आहे.
दुधाने पुढे म्हणाले,’ आजमितीस आपल्या देशभरातील शहरी भागात अनेक समस्या नव्याने निर्माण होत असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर शहराचे नागरिक या नात्याने आपण सर्वांनी प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आणि महाराष्ट्र अर्बन सेलची स्थापना केली. अर्बन सेलची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा वंदना चव्हाण यांची अध्यक्षा म्हणून निवड झाली. आज अर्बन सेल राज्यातील विविध शहरात नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत असून पुणे शहराचे माजी अध्यक्ष नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरात कार्यरत आहोत. आजच्या घडीला आपल्या पुणे शहरातील रस्ते, पाणी, शिक्षण, पर्यावरण तसेच अन्य अनेक मूलभूत समस्यांना तोंड देत असताना नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा बनत या समस्यांना निवारीत करण्यासाठी समन्वयक म्हणून मी कार्यरत होतो.आज अध्यक्षपदाची ही जबाबदारी स्वीकारताना वंदना चव्हाण व सर्व अर्बन सेलच्या पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.