पुणे – अनेक नामवंत खेळाडूंचा येथे सहभाग असलेल्या प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेस शनिवारी येथे शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारे प्रारंभ झाला. ही स्पर्धा सांघिक विभागात खेळली जात असून त्यामध्ये पाच संघ विजेतेपदासाठी लढत आहेत.
टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते झाले यावेळी टेबल टेनिस संघटक सुरेंद्र देशपांडे, अविनाश जोशी, आशिष बोडस, स्मिता बोडस, दिपेश अभ्यंकर, श्रीकांत अंतुरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस हे उपस्थित होते.
ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून प्रत्येक संघामध्ये ३९ वर्षावरील,४९ वर्षावरील, ५९ वर्षावरील किमान एका खेळाडूंचा समावेश आहे. ही स्पर्धा अव्वल साखळी पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत रॉकेट लॉन्चर, स्पार्टन्स, गेम चेंजर्स, स्काय रेंजर्स, ड्रॅगन वॉरियर्स या संघांचा सहभाग आहे. या संघांमध्ये चुरस आहे.