स्वरचित रचनांतून पं. भाटे यांनाशिष्यांकडून नृत्यांजली अर्पण
पुणे. ता. २४: ‘गुरुने दिला कलारूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ याप्रमाणे नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीच्या सुमारे ३ पिढ्यांतील शिष्यांनी स्वरचित नृत्यरचना सादर करत कथकसम्राज्ञी पं. गुरु रोहिणी भाटे यांना नृत्यांजली अर्पण केली. कलेच्या उपासक असणाऱ्या नर्तक-नर्तकींचे हे सादरीकरण म्हणजे जणू ‘ज्योतीने तेजाची आरती’ अशी अनुभूती देणारे ठरले. निमित्त होते ‘अनुबद्ध’ मैफिलीचे.
गेली ७६ वर्षे निरंतरपणे कार्यरत असणाऱ्या नृत्यभारती संस्थेतर्फे पं. रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर ‘रोहिणीद्युति’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत ‘अनुबद्ध’ ही दोन दिवसीय मैफल घेण्यात आली. यावेळी कला समीक्षक शामहरी चक्र, पं. अरविंदकुमार आझाद, चैतन्य कुंटे, दत्तात्रय पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या दिवशी दीप्ती गोखले यांच्या नृत्यवंदनेने मैफिलीची सुरुवात झाली. गुरु भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या अमला शेखर यांनी ‘ समाक्षरी ‘ तर अभा औटी यांनी सादर केलेली ‘ गवळण ‘ या रचनांनी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर ‘ग्रीष्म’ ऋतूचे वर्णन करणारी प्रस्तुती मनिषा अभय व त्यांच्या शिष्यांनी सादर करत कार्यक्रमास वेगळ्या उंचीवर नेले. तर मयूर शितोळे यांची ‘उच्चिष्ठ गणपती’ ही रचना, ऋजुता सोमण यांची ‘खंडचापु ‘, प्राजक्ता राज यांनी पेश केलेली ‘शिवाजी’ आदी प्रस्तुतींनी ‘रोहिणी’ घराण्याच्या प्रगल्भतेचे दर्शन रसिकांना घडवले. रोशन दात्ये यांची संरचना असलेला ‘नाचत कथक’ हा नृत्याविष्कार रसिकांना विशेष भावला. गुरु रोहिणी भाटे यांची लोकप्रिय ‘अग्नि’ या रचनेच्या सादरीकरणातून पहिल्या दिवशीची समर्पक सांगता झाली. दुसऱ्या दिवशी गणेश वंदनेनंतर आसावरी पाटणकर यांनी नृत्यबद्ध केलेला साडे नऊ मात्रांचा ताल आपल्या शिष्यांसह सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर रोशन दात्ये यांच्या शिष्या धनश्री नातू पोतदार यांनी ‘मंदारमाला’ ही वसंत ऋतूचे वर्णन करणारी रचना तर नीलिमा अध्ये यांच्या शिष्या विदुला वाळवेकर यांच्या शिष्यांनी प्रस्तुत केलेले दावा नयनी, यशोदेचा सुकुमार हे ‘कृष्ण भजन’ यास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. मनीषा अभय यांच्या शिष्या कल्याणी कुलकर्णी यांनी २० मात्रांचा दिमाखदार अर्जुन ताल प्रस्तुत केला.
प्राजक्ता राज यांच्या शिष्या वेणू रिसवडकर यांनी रचलेला तराणा तसेच आभा वांबुरकर यांनी सादर केलेली ‘रास’ रसिकांना विशेष भावली. शृंगाली परांजपे यांनी नृत्यबध्द केलेले ‘ श्रीराम भजन ‘ तसेच जयपूर स्थित मंजिरी महाजनी यांनी आपल्या शिष्यांसह सादर केलेले शिव पार्वतीच्या युगल रूपाचे दर्शन घडविणारे ‘धृपद’ याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘चैती’ या अनोख्या रचनेतून नीलिमा अध्ये यांनी सृजनाचे संकेत देणारा चैत्र ऋतू आणि त्याचवेळी पतीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेली नायिका असा विरोधाभास आपल्या कलाविष्कारातून मांडत रसिकांची मने जिंकली. आदिती रिसवडकर यांनी त्रिवट रचना सादर केली तर सिद्धी अभय यांनी मानवी भावभावनांचे विश्व नृत्य-अभिनयातून उलगडणारी ‘शिखंडी’ ही रचना सादर करत रसिकांना अंतर्मुख केले. रोहिणी भाटे यांच्या सर्व ज्येष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या ‘राधे गोविंद’ या कीर्तनाने अनुबद्ध मैफिलीचा सुरेल समारोप झाला.
यावेळी युवा नर्तक मयूर शितोळे यांचा सुनिता पुरोहित यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्तिकस्वामी (तबला), अर्पिता वैशंपायन (गायन), सुनील अवचट (बासरी), देवेंद्र देशपांडे (संवादिनी), माधव लिमये (संवादिनी) यांनी समर्पक साथ दिली. आसावरी पाटणकर आणि मनीषा अभय यांनी सूत्रसंचालन केले. नृत्यभारतीच्या संचालिका नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून ही मैफल पार पडली. एकापेक्षा एक असे सरस नृत्याविष्कार, नृत्य अभिरुची पूर्ण वेशभूषा, हृदय संगीत आणि अभिनव प्रकाशयोजना यामुळे प्रेक्षकांसाठी ही मैफल अविस्मरणीय ठरली.
रोहिणी भाटे यांच्या कला संस्कारातून समृद्ध झालेल्या व कथक नृत्याच्या विचारांचा वसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या शिष्यांकडून कलामंचावर गुरू भाटे यांची प्रतिमा मध्यभागी ठेऊन पुष्प अर्पण करण्यात आले. संस्थेच्या सर्व ज्येष्ठ शिष्यांकडून ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गुरु शिष्यातील या अनोख्या नात्याच्या दर्शनाने यावेळी प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. प्रत्येकाच्या मनात गुरु पं. भाटे यांच्याविषयी असणारी आत्मीयता स्पष्ट अधोरेखित होत होती.