सुहाना प्रवीण मसाले वाले चे संचालक आनंद चोरडिया यांचे मत :मएसो सिनियर कॉलेज, डिक्की नेक्स्ट जेन, लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन’उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’ भाग – चौथा
पुणे : भारतामध्ये ज्याप्रमाणे इटालियन फूड, चायनीज फूड अगदी सहजरीत्या मिळते आणि त्याचे ब्रँडही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये देखील भारतीय उत्पादने प्रसिद्ध होऊन त्यांचे ब्रँड निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी आपण आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जागतिक दर्जाच्या बाजारपेठेमध्ये टिकवून ठेवली पाहिजे, असे मत सुहाना प्रवीण मसालेवाले चे संचालक आनंद चोरडिया यांनी व्यक्त केले.
मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेल, डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’ या विशेष मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. कोथरूड मधील मएसो सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमामध्ये आनंद चोरडिया यांनी प्रवीण सुहाना मसाले या उद्योगाची यशोगाथा मांडली. म.ए.सो. नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, म. ए. सो. नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, म.ए.सो.सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते. सर्वेश देशपांडे यांनी यावेळी मुलाखत घेतली.
आनंद चोरडिया म्हणाले, प्रवीण मसालेवाले चा प्रवास हा दिवसाला पाच किलो गोडा मसाला पासून सुरुवात झाली आज प्रवीण मसाले वाला आणि सुहाना मसालेवाले यांच्या ३०० हून अधिक उत्पादनांना जगातील साठ देशांमध्ये मागणी आहे. आम्ही ग्राहकांचा विश्वास हेच आमचे ध्येय मानतो. ग्राहकांचा विश्वास जर आपण कायम ठेवू शकलो तर ग्राहकच आपले उत्पादन हे ब्रँड बनवतात हा आमचा ठाम विश्वास आहे.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी आणि विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी तरुण पिढीला जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या आपण कायम सकारात्मक असले पाहिजे. कोणत्याही उद्योगांमध्ये दररोज नवीन अडचणी निर्माण होत असतात त्या अडचणींना न घाबरता त्याचे संधी मध्ये रूपांतर करून आपण आपला उद्योग हा ग्राहक केंद्रित केला पाहिजे, असेही आनंद चोरडिया यांनी यावेळी सांगितले.