पुणे, दि. २५ जुलै २०२४:डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे गुरुवारी (दि. २५) पहाटे तीन वाजता नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. त्याठिकाणी असलेला अंडाभूर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का बसून पहाटे पाचच्या सुमारास तीन जणांचा मृत्यू झाला. अशी माहिती मिळताच महावितरणच्या कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय फुंदे व इतर अभियंते व कर्मचारी यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर लगेचच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांनी देखील पाहणी केली.
डेक्कन येथील नदी पात्राजवळील परिसरात महावितरणची यंत्रणा व वीजवाहिनी भूमिगत आहे. मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदी पात्राबाजूचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पहाटे ४ च्या सुमारास बंद करण्यात आला होता. तथापि प्राथमिक पाहणीमध्ये तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अंडा भुर्जीच्या स्टॉलसाठी इतर ठिकाणाहून वायरद्वारे अनधिकृत वीजपुरवठा घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेताना या वायरमधील करंट लिकेज होऊन हा विद्युत अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सद्यस्थितीत स्टॉलचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली आहे. त्याठिकाणी आज दुपारी साडे तीन वाजपर्यंत ५ ते ६ फूट पाणी होते. त्यामुळे विद्युत अपघाताच्या घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य नसल्याचे दिसून आले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर ही पाहणी करता येईल. याबाबत महावितरणकडून विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले असून त्यांच्याद्वारे या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करण्यात येत आहे.