पुणे- हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळाबंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
पाणी शिरलेलेले सोसायटी नावे1] द्वारका2] जलपुजन3] शारदा सरोवर4] शाम सुंदरसह १५ सोसायटीत नदीचे पाणी शिरले आहे
लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने बुधवारी व गुरुवारी शाळा-कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली. पवना धरण परिसरातही 145 मिमी पाऊस झाल्याने जलसाठा 55% झाला.
पुढील दोन दिवसांत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा चंदपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गंगापूर धरण 44%, दारणा 75% भरले, जायकवाडीत येणार ओघ
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गंगापूर धरण 44% टक्के भरले. पण गतवर्षाच्या तुलनेत 8.62% कमीच. नाशिकच्या 5 तालुक्यांत जुलैतील सरासरीच्या 100 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये 100.3 मिमी नोंद झाली. प्रमुख धरणे याच भागात आहेत.
भावली धरण 100 %, दारणा 75 % भरले. यासह नांदूर- मधमेश्वरमधून विसर्ग सुरू आहे. हे पाणी मराठवाड्याच्या जायकवाडीत येईल.
लोणावळ्यात या दीड महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस ठरला. इथे आठ दिवसांपासून पावसाचा जोर आहे. आतापर्यंत 2601 मिमी (10240 इंच) पाऊस झाला. गतवर्षी 2503 मिमी पडला होता. मळवलीच्या इंद्रायणी नदीजवळ एका बंगल्यात अडकलेल्या 21 नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. कार्ला भागात एका बंगल्यात अडकलेल्या सात नागरिकांनाही सुटका केली.
कोल्हापुरातही धुवाधार
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आल्याने पुराचा धोका आहे. कोयना, वारणा धरणांतून सुरू असलेला विसर्ग आणि घाटमाथ्यावर पावसाची सुरू असलेली संततधार यामुळे कृष्णा खाेऱ्यातील सर्वच नद्यांची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी 30 फूट 4 इंच होती, तर मिरजेजवळ कृष्णा 43 फूट 3 इंच होती. गुरुवारी पाण्याची पातळी 3 ते 4 फुटांनी वाढू शकते, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
कोयना धरणातील 105 टीएमसी पाण्यापैकी सध्या 68.83 टीएमसी तर वारणेतील 35 टीएमसीपैकी 31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजघरातून 1 हजार 500 क्युसेक, वारणा धरणातील दोन वक्रीदार दरवाजे उचलून 2 हजार 172 क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 1 हजार 800 क्युसेक असा 4 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बुधवारी रात्रीपर्यंत पावसाने उसंत घेतली नाही तर हा विसर्ग चौपटीने वाढवावा लागेल. त्यामुळे कृष्णा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन ठेपेल.
गडचिरोलीत अतिवृष्टी, शाळांना सुटी
मागील सहा दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या,नाले तलाव ओसंडून वाहत आहेत. शेतांमध्ये पाणी भरल्यामुळे रोवणीची कामे ठप्प आहेत. शाळांना सलग तीन दिवस सुटी देण्यात आली आहे. विजेचा आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्येही संततधार पावसामुळे रविवारपासून जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पंचगंगा धोका पातळीवर
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्राबाहेर वाहू लागली आहे. बुधवारीही दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली असून संध्याकाळी पाणीपातळी 42.6 पर्यंत पोहोचली आहे. पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (43 फूट) ओलांडणार आहे. राधानगरी धरण 95 टक्के भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर ते मुंबई रेल्वसेवाही खंडित करण्यात आली आहे. वारणा धरणातूनही 8874 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे.
वारणा नदीकाठच्या 30 गावांचा संपर्क तुटला
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 13.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या जवळपास 30 गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने वारणा आणि मोरणा नदीकाठच्या नागरिकांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे तसेच या परिसरात सहा बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.