पुणे, २४ : राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार, संबंधित विभागाचे अधिकारी, कृषिमाल निर्यात उद्योगातील विविध तज्ज्ञ यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व मॅग्नेट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे उद्घाटन पणनमंत्री अब्दुल सत्तार राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार उपस्थित असणार आहेत. परिषदेत अपेडा, डी.जी.एफ.टी., एन.पी.पी.ओ., फेडरेशन ऑफ इंडियन एस्पोर्ट ऑर्गनायझेशन तसेच राज्यातील विविध फळे, भाजीपाला व फुलाचे यशस्वी निर्यातदार यांचे मार्गदर्शनपर सत्र होणार आहे. तसेच पॅकेजिंग, वाहतूक आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी धोरणाबाबत चर्चासत्रांचाही यात समावेश आहे.
शासनाच्या कृषीमाल संदर्भात विविध विभागांच्या योजना, त्यांचे निकष, जागतिक बाजारातील कल, गुणवत्ता मानके आणि निर्यातविषयक नियमांची माहिती विविध चर्चासत्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. निर्यातदार व निर्यात बाजारातील इतर प्रमुख घटक सहभागी होणार असल्याने ही परिषद राज्यातून फळे, भाजीपाला व फुलांच्या निर्यात वृद्धीकरीता उपयुक्त ठरणार आहे.
या परिषदेबाबत अधिक माहितीसाठी सहायक व्यवस्थापक सतिश वराडे ९४२२८८४१९८/ ८९८३४३२८१६ यांच्याशी संपर्क साधावा आणि राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.