-अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती प्रथमच आफ्रीकेतील ज्वालामुखी पर्वतावर,
आई-वडिलांशिवाय अंतराने केला प्रवास
-360 एक्सपलोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत चढाई
-सोलापूरच्या रेल्वे लाईनजवळ आजोळ असलेल्या अंतरा नरूटे हिची कौतुकास्पद कामगिरी
आरुषा (तांझानिया)- भारतातील सर्वात मोठ्या साहसी मोहिमा आयोजित करणाऱ्या 360 एक्सप्लोरर मार्फत अंतराने इतिहास घडवत 18000 फूट उंचीवर चढाई केली असून शिवभक्त अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आफ्रीकेतील टांझानिया येथील किलीमांजारो या सुप्त ज्वालामुखीच्या पर्वतावर नेली आहे. गेले अनेक महिने यासाठी मेहनत घेत अंतराने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत इयत्ता पाचवीत शिकणारी कु.अंतरा नरूटे (वय १०) हिने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. संवेदना होमिओपॅथिक क्लिनिकचे डाॅ.सोमेश्वर नरूटे व सोलापूरच्या शर्मिला रुपनर यांची ती कन्या आहे. इथून पुढेही अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा करण्याचा तिचा मानस आहे. तांझानिया देशात असलेला असलेला हा ज्वालामुखी पर्वत समुद्रसपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४१ फूट) उंच आहे. या देशाच्या ईशान्य भागात पूर्व गोलार्धात ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेला हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे. गिर्यारोहणाची आवड असलेले हौसी आणि धाडसी पर्वतप्रेमी किलीमांजारो पर्वताच्या शिखरावर मोहिमा आखत असतात. सततचे बदलणारे हवामान, -5 ते -15 तापमान, वादळी वारे व अतिशय कठीण व खडी चढाई हे या शिखराच्या मोहिमेमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत.
डाॅ.सोमेश्वर आणि सौ.शर्मिला रुपनर या माता-पित्याने आपल्या मुलीच्या कलागुणांना वाव देत तिची आवड ओळखून प्रोत्साहन दिले. गोरक्षनाथ गड, रतनगड, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, कळसूबाई शिखर येथे यापूर्वी कु.अंतराने ट्रेकिंग केली आहे. याशिवाय तिने योगा, रोप मल्लखांब, सिल्क मल्लखांबचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतले.
सोलापूर येथील 360 एक्सप्लोररचे संस्थापक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.अंतराने आफ्रिकेतील सर्वांत उंच असलेल्या किलीमांजारो या पर्वतावर चढण्याचा संकल्प केला. किलीमांजारो पर्वतावरील चढाई किलिमांजारो नॅशनल पार्कपासून रेनफ़ॉरेस्ट (सतत पाऊस पडत असणारे घनदाट जंगल) मधून सुरवात केली. १० किलोमीटरचे घनदाट जंगलातून हे अंतर अंतर कापण्यास ६ तास लागले. त्यानंतर मंडारा हट ते होरंबो हे १० किलोमीटरचे अंतर कापण्यास ९ तास, तर होरंबो ते किबो हे १० किलोमीटरचे अंतर पार करण्यास ८ तास लागले. उणे 10 अंश तापमाणात किबो हटपासून वर १८००० फूट उंच चढाई पूर्ण केल्यानंतर हवेतील बदलचा व कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणामुळे चढाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. कु.अंतरा हिने भारत देशाचा तिरंगा फडकवत, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व होमिओपॅथीचे जनक डाॅ.सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व आफ्रिकन मार्टीन आणि जस्टीन या स्थानिक गाईडच्या मदतीने अंतराने हे यश मिळवले आहे. बालवयात अंतराने आफ्रीकेतील किलीमांजारो या पर्वतावर केलेल्या 18000 फूट उंचीवर धाडसी चढाईचे कौतुक होत आहे.
“आधीपासूनच व्हिडीओ पाहिल्यामुळे या मोहिमेची खूपच उत्सुकता होती. अत्यंत थकवणारी चढाई असली तरी प्रॅक्टिस केल्यामुळे त्याची मदत झाली. माझे आईवडील, सर्व साथ देणारे नातेवाईक, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, माझ्या सोबत असलेल्या अर्चना भोरे, गाईड जस्टीन व मार्टिन यांच्यामुळे 18000 फूट उंच चढाई करू शकले”-अंतरा नरुटे (बालगिर्यारोहक)
“बाल गिर्यारोहक म्हणून अंतराचे प्रथम अभिनंदन. लहान वयात एवढ्या लवकर उंचीवरील वातावरणाशी अनुकूल होणारी लहान मुलगी मी पाहिली नाही. तिची फिटनेस, स्वप्नावरील प्रेम व जिद्द याची तोड कशाशीही करता येणार नाही. किलीमांजारोवर जरी 18000 फूट उंची गाठली असेल तरी इथून पुढे अंतरा अनेक मोहिमा करून एक आदर्श निर्माण करतील यात शंका नाही. 360 एक्सप्लोरर मार्फत अंतरासहित अनेक लहान मुलांना जागतिक मोहिमांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.”-आनंद बनसोडे (एव्हरेस्टवीर व 360 एक्सप्लोररचे संचालक)