पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक गुन्ह्यांची उकल; समर्थ पोलिसांची कारवाई, तीन आरोपी अटकेत
पुणे :
प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरणाऱ्या टोळीचा समर्थ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरातील अशाच प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 175/2026, भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक ज्येष्ठ महिला पॉवर हाऊस चौकातून भवानी पेठेकडे रिक्षातून जात होती. त्यावेळी रिक्षामध्ये असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरल्याची तक्रार करण्यात आली होती.
गुप्त बातमीच्या आधारे आरोपीचा शोध
गुन्ह्याचा तपास समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून सुरू असताना पोलिसांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. संबंधित टोळीतील व्यक्ती जळगाव येथील असून प्रवासादरम्यान वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून हातचलाखीने त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात शाकीर जाकीर तेली (वय 29, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) याला 1 जुलै रोजी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर अन्य साथीदारांची माहिती समोर आली.
यानंतर मोहसीन खान नूर खान (वय 31, जळगाव) आणि इस्माईल ऊर्फ राजू शब्बीर शेख (वय 50, जळगाव) यांना पुण्यातील मालधक्का चौक परिसरात पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना 2 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
सिंहगड रोड ते पिंपरी-चिंचवडपर्यंत गुन्हे
अटक आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आरोपींकडून चोरीच्या मालाचा शोध घेताना पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत आणि त्यांचे अन्य साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

