कोथरूड पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू; आयफोन, सिमकार्ड, ट्रायपॉड आणि कॉलर माइक जप्त
पुणे :महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ख्यातनाम यु ट्यूबर सोशल वर्कर संतोष गजानन पंडित (वय 48) यांना न्यायालयाने 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कोथरूड पोलिसांनी मंगळवारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले होते.
या प्रकरणी सारिका राम कांबळे (वय 36, रा. श्रावणधारा, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी पहाटे अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओंची तपासणी
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पंडित यांनी सोशल मीडियावर काही महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. तसेच काही महिला आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तींविषयी अपमानास्पद शब्दप्रयोग असलेले व्हिडिओ प्रसारित केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या मजकूर आणि व्हिडिओंमुळे संबंधित महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
आयफोनसह चित्रिकरणाचे साहित्य जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी पंडित यांच्याकडून एक आयफोन, सिमकार्ड, मोबाईल चित्रिकरणासाठी वापरण्यात येणारा ट्रायपॉड, कॉलर माइक आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.
पंडित सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या विविध सोशल मीडिया खात्यांची आणि त्यावर प्रसारित करण्यात आलेल्या मजकूर-व्हिडिओंची तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
डिजिटल पुरावे आणि संभाव्य साक्षीदारांचा तपास
या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची पडताळणी, सोशल मीडिया खात्यांचा तांत्रिक तपास तसेच अन्य संभाव्य पीडित आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पंडित यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. मात्र, त्या प्रकरणांचा अंतिम निकाल किंवा स्वरूप स्वतंत्रपणे तपासण्याची गरज आहे.
कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल माने पुढील तपास करत आहेत. बचाव पक्षातर्फे ॲड. वाजेद खान बीडकर यांनी बाजू मांडली.

