कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर असताना प्रकार; चतु:श्रृंगी पोलिसांकडून कारवाई
पुणे :
कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर असताना दारूच्या नशेत एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बबन अशोक वाघ याला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी वाघ याला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन वाघ हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मात्र, तो 17 जुलै 2026 पासून कोणतीही परवानगी न घेता कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समोर आले.
दरम्यान, 4 सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत असताना एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. संबंधित तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बबन वाघ याला अटक केली.
या घटनेनंतर दाखल गुन्ह्याचा अहवाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली.
कर्तव्यावर विनापरवाना गैरहजर राहणे आणि त्यानंतर विनयभंगासारख्या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होणे यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी बबन वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई केली.

