योजक सामाजिक संस्थेतर्फे ९ वीं व १२वीं नतर विज्ञान व तंत्रज्ञान विषयात असलेल्या संधी : ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे, २० जुलैः “विद्यार्थीदशेत असतांना आपल्या भविष्याचा अभिमान वाटावा यासाठी स्वतःमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करा. आज तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यातील यश आणि पूर्ततेवर लक्षणीय परिणाम करू शकतात. उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक म्हणजेच ज्ञानाला अधिक आत्मसात करा.” असा सल्ला ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दिला.
सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारी योजक सामाजिक संस्थेच्यावतीने नुकतेच ‘९ वीं व १२वीं नतर विज्ञान व तंत्रज्ञान विषयात असलेल्या संधी’ या विषयावर आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
यावेळी रमेश वेणूगोपालस्वामी, विजय वावरे, अनुजा सप्तश्वा, रेश्मा आंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच योजक संस्थेच्या संस्थापिक व संचालिका रेणू इनामदार उपस्थित होत्या.
योजक संस्था आणि बजाज अॅटो लि.च्या सीएसआर विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील १२ वस्त्या व खेड तालुक्यातील ४ गावांमध्ये चालविण्यात येणार्या कम्युनिटी लर्निंग सेंटर्समधील ९ ते १२ चे सुमारे ८०० विद्यार्थी व संबंधीत शिक्षक सहभागी झाले होते.
विवेक वेलणकर म्हणाले, “विज्ञानामध्ये करिअर करतांना शक्य तितके शिकत रहा. दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्वाचा टप्पा आहे. यावेळी घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पाया रचतात. स्वतःला विकसित करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांगीण विकासासाठी शक्य तितक्या मार्गांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे. ”
“विद्यार्थी दशेत चांगल्या सवयी लावणे म्हणजे भक्कम इमारतीचा पाया रचण्यासारखे आहे. हा केवळ शैक्षणिक कामगिरी वाढवत नाहीत तर तुमच्या चारित्र्याला आकार देतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी तयार करतात. शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल तर अभिक्षमता चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे. करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच खुले होतात. करिअरसाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी पर्याय वाढले असले तरी स्पर्धाही वाढल्या आहेत. मात्र करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही. असेही मत त्यांनी मांडले. ”
“विज्ञानाच्या पार्श्वभूमीसह विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यक, संशोधन आणि विकास, डेटा विश्लेषण आणि वैज्ञानिक लेखन याक्षेत्राबरोबर अन्य विज्ञानाच्या शाखेत करिअरचा मार्ग अवलंबू शकतात. ”
रेणू इनामदार म्हणाल्या,”गेल्या दीड दशकापासून योजक सामाजिक संस्था पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावे पिंपरी चिंचवड येथिल वस्त्यांमध्ये शिक्षणाच्या व विकासाच्या संधी पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे द्वार तळागळातील विद्यार्थ्यांसाठी उघडणे गरजेचे आहे.”
“या संस्थेमार्फेत बजाज ऑटो लि. सीएसआर विभागाच्या सहकार्यातून नागरवस्ती व गावांमध्ये कम्युनिटी लर्निंग सेंटर्स चालविली जातात याचा लाभ १ली ते १२वीं पर्यतच्या २५०० हून अधिक विद्यार्थी घेत आहेत. लाभ धारकांमध्ये दुर्बल घटकांबरोबरच मुलींची संख्या लक्षणीय आहे.”
यावेळी रमेश वेणूगोपालस्वामी यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्मिता रोकडे यांनी सूत्रसंचालन व मुग्धा देशपांडे यांनी आभार मानले