पुणे- मी घड्याळ व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. पण भविष्यात काही स्थित्यंतरे घडली तर मी काहीही सांगू शकत नाही,राज्यात काहीही घडू शकते. कदाचित शरद पवार अन् अजित पवार हे एकत्रही येऊ शकतात, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांचे समर्थक जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.
आमदार अतुल बेनके यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त विधान केले. यावेळी त्यांनी आपला शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट केले.माझे शरद पवारांशी पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर कोणतेही बोलणे झाले नाही. त्यांनीही हा विषय काढला नाही. त्यामुळे पक्षांतराचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडली आहेत. भविष्यातही घडू शकतात. कदाचित शरद पवार व अजित पवार एकत्रही येऊ शकतील. पण भविष्यातील राजकारणावर आताच काही सांगता येत नाही. असे अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. बेनके कुटुंबाचा गत 40 वर्षांचा राजकीय इतिहास हा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. 6 महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी अजित पवार यांच्यासोबतच राहणे पसंत करेन, असेही अतुल बेनके यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.अतुल बेनके पुढे बोलताना म्हणाले की, मी लोकसभा निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आढळराव पाटलांचा प्रचार केला. पण जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वागत करणे माझी जबाबदारी आहे. त्यांच्या स्वागतापलिकडे आमच्या भेटीत दुसरे काहीही नव्हते.
उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे आमदार आपापल्या सोईचे राजकीय पक्ष शोधून तिकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडून पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण आता बेनके यांनी स्वतःच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.