पुणे, दि. ८ सप्टेंबर २०२६ –
लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून मोबाईल आणि सोनसाखळी लुटणाऱ्या टोळीला बंड गार्डन पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद केले आहे.
घटनेचा प्रकार –
फिर्यादी अक्षय माधव बोंबले, वय २८ वर्षे, (रा. पुणे गेस्ट हाऊस, बुधवार पेठ, पुणे) हे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वा. ते ड्युटी संपवून घरी जात असताना ससून हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस, रेल्वे विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील फूटपाथवर ४ इसमांनी त्यांची दुचाकी अडवली.
“गांजा पितो काय” असे म्हणून शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडील मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने चोरून नेली.
याबाबत बंड गार्डन पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ३०९(६), ३५१(२), ३५२, ३(५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई –
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी २ तपास पथके तयार केली होती. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड यांना आरोपी नाना पेठ, पुणे येथे लपून बसल्याची माहिती मिळाली.
सपोनि गणेश चव्हाण, सहा. फौजदार प्रदीप शितोळे, पो.अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून अतिशय कमी वेळात आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी –
१) रॉकी रणजित पात्रो, वय २४ वर्षे
२) विशाल उर्फ विक्की रणजित पात्रो, वय २० वर्षे (दोन्ही रा. रेल्वे क्वार्टर्स, पुणे स्टेशन)
३) एक विधी संघर्षित बालक
विधी संघर्षित बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले असता त्याला येरवडा निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त शुभ्रा सात्ये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक विनोद साळुंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल पवार, सपोनि गणेश चव्हाण, पो.अं. सरस साळवी, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव, मनोज भोकरे, शिवाजी सरक, अनिकेत माने यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.

