गणेश मंडळांना प्रदेश संयोजक राजेश पांडे यांचे आवाहन
पुणे:शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या परिसरात अमृत कलश स्थापन करून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबवावे आणि नागरिकांना सेल्फी विथ मेरी माटी अभियानात नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना या आशयाचे पत्र पाठविण्यात आले असून, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहे.
पांडे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये राष्ट्राभिमान, एकता, स्वातंत्र्य मिळण्याची प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. स्वातंत्र्य आंदोलनातील जनजागृतीचे गणेशोत्सवाने केलेले कार्य मोलाचे आहे. यावर्षी आपण आत्मनिर्भर भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान सुरू केले आहे. ज्या मातीने देशभक्त जन्माला घातले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, ज्या मातीमुळे आपले जीवन आहे त्या आपल्या देशाच्या मातीला आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी गणेश मंडळांनी गणपती मांडवाच्या परिसरात अमृत कलश स्थापन करावे, दर्शनाला आलेल्या भाविकांना अभियानाची माहिती द्यावी, तसेच भाविकांनी हातात माती घेऊन सेल्फी काढावे, माती हातात घेतलेला सेल्फी क्यूआर कोडवर अपलोड करावा किंवा https://selfiewithmerimaati.in/photoupload/ या लिंकवर पाठवावा आणि माती कलशात अर्पण करावी असे आवाहन करीत आहे.’