मराठी रुपेरी पडद्यावर आलेल्या अनेक प्रेमकथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत व पंकज गुप्ता निर्मित काय झालं कळंना या चित्रपटातून अशीच एक हलखी-फुलखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे.
आशयघन कथानकाला दमदार दिग्दर्शनाची साथ मिळाली तर घडणारी कलाकृती ही सशक्त होते. काय झालं कळंना या चित्रपटातून अशीच वेगळ्या धाटणीची प्रेमकथा पहायला मिळणार असून या प्रेमकथेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
काय झालं कळंना या चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे.