Home Blog Page 680

सुरेल गायन, विलोभनिय नृत्याविष्काराला रसिकांची दाद


आयसीसीआरतर्फे ‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत सादरीकरणात प्रभुत्व असलेल्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना आज अनोख्या मैफलीचा आनंद घेता आला.

केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.27) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‌‘होरायझन‌’ उपक्रमाअंतर्गत भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी, कार्यक्रम अधिकारी आणि सल्लागार संजीवनी स्वामी, भारतीय विद्या भवनचे प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.
मैफलीच्या पहिल्या सत्रात अर्चना सहकारी यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात एक निषाद बिहागडा रागातील मध्य लयीतील ‌‘बैरन बिन‌’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून डॉ. सहकारी यांनी द्रुत बिहागडामधील ‌‘पाती ना भेजी‌’ हा छोटा ख्याल बहारदारपणे सादर केला. ‌‘ओ दिलदारा आजा रे‌’ हा खमाज रागातील पं. कुमार गंधर्व यांनी रचलेला टपख्याल सादर करून त्यांनी रसिकांना तृप्त केले. सुरेल आवाज, सहज फिरत आणि उत्तम गायनशैली यामुळे डॉ. सहकारी यांच्या गायन मैफलीत रंग भरले.
डॉ. अर्चना सहकारी यांना रोहित प्रभुदेसाई (तबला), मेघा प्रभुदेसाई (संवादिनी), अनोखी गुरव (सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांचे बहारदार नृत्य झाले. त्यांनी आपल्या नृत्याविष्काराची सुरुवात गुरू केलुचरण महोपात्रा यांनी रचलेल्या महिषासुरमर्दिनीचे रूप दर्शविणाऱ्या रचनेने केली. स्त्रीशक्तीची महती सांगणाऱ्या या दुर्गा अष्टपदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर मौमिता वत्स घोष यांनी ओडिसी नृत्यातील पल्लवी हा प्रकार सादर केला. ज्यात सहज सोप्या नृत्यविष्कारापासून सुरुवात होऊन क्लिष्ट व जलद हालचालींचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता त्यांनी राधा-कृष्णाच्या नात्याचे दर्शन घडविणाऱ्या पंडित भुवनेश्वर यांनी रचेलेल्या आणि गुरू पंडित केलुचरण महापात्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‌‘धीरे समिरे यमुना तिरे‌’ या रचनेने केली. या नृत्य रचनेद्वारे राधा-कृष्णाच्या नात्यातील आत्मा-परमात्म्याचे अनुबंध उलगडले गेले. जलद पदन्यास, तालबद्ध हालचाली अन्‌‍ विलोभनिय हावभाव यातून मौमिता यांचा नृत्याविष्कार लक्ष्यवेधी ठरला. मौमिता वत्स घोष यांचे पुण्यातील पहिले नृत्य सादरीकरण होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. पंडित सुहास व्यास यांचा सन्मान सुदर्शन शेट्टी यांनी केला तर कलाकारांचा सत्कार पंडित सुहास व्यास यांनी केला.

पंडित सुहास व्यास म्हणाले, आयसीसीआर ही संस्था देशातील सांस्कृतिक चळवळीच्या वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून होरायझन सिरीजद्वारे नवनवीन कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. देशाच्या विविध भागातच नव्हे तर देशाबाहेरही भारतीय कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे विदेशात भारतीय संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत आहे..

आयसीसीआर आणि भारतीय विद्याभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनीवन कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते, असे प्रा. नंदकुमार काकिर्डे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका घैसास यांनी केले.

संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक विकासासह नक्षल भागात विकासात्मक जडणघडण – उद्योगमंत्री उदय सामंत

0

नागपूर– महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध होऊन ज्या भागात आजवर उद्योगाची बीजे रुजली नव्हती त्या भागात आम्ही लक्ष केंद्रीत केले. गत दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला संपूर्ण भारतात अव्वल आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आता महाराष्ट्राकडे वेधून घेतले आहे. नक्षल भागात विकासात्मक जडणघडणीतून गडचिरोली जिल्ह्याचे स्वरूप आता पूर्णतः बदलून दाखविले आहे. आजवर नक्षलवादी जिल्हा म्हणून जी ओळख होती ती मिटविण्यात आपले शासन यशस्वी ठरल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.

हॉटेल सेंटर पॅाईंट येथे महाराष्ट्राच्या औद्योगिक यशाला अधोरेखित करणाऱ्या ‘महाराष्ट्राची औद्योगिक भरारी’ या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी आ. आशीष जायस्वाल, अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) तथा समन्वयक महाराष्ट्राची उद्योग भरारी प्रदीप चंद्रन, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य अभियंता राजेश झंझाळ, उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, वर्धा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, हिंगणा इंडस्ट्रीज  असोसिएशनचे पी. मोहन, लॉयड ग्रूपचे संचालक तथा प्रकल्प  प्रमुख व्यंकटेशन, आवादा ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक मुर्तुझा, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे घिमे, परनार्ड रिकार्ड इंडियाचे संचालक राजेंद्र देशमुख यांच्यासह पूर्व विदर्भातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचा शुभारंभ नागपूरपासून होत असल्याचा विशेष उल्लेख उद्योगमंत्री सामंत  यांनी करून विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. एमआयडीने उद्योजकांना केवळ जागा उपलब्ध करून देणे या उद्देशापर्यंतच सीमित असलेल्या महामंडळाचे स्वरूप आता आपण पूर्णपणे बदललेले आहे. चांगल्या उद्योजकांना, विदेशी गुंतवणूकदारांना, विदेशातील उद्योजकांना जर राज्यात निमंत्रित करायचे असेल तर त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला आम्ही प्राधान्य दिले. या प्रयत्नांमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत सोईसुविधांसाठी आम्ही प्राधान्याने लक्ष दिले आहे. यात पूर्व विदर्भातील 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीज, मलनिःसारण व्यवस्था, पोलिस स्थानक या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. उद्योजकांबरोबर कामगारांनाही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यांचेही आरोग्य सुदृढ राहण्याची गरज आहे. एमआयडीसीच्या क्षेत्रात केंद्र सरकारची रुग्णालये साकारावीत यासाठी कोणताही मोबदला न घेता त्यांना रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जात  असल्याचे उद्योगमंत्री सामंत यावेळी म्हणाले.

विदर्भातील कापूस उत्पादक शेतक-यांना औद्योगिक क्षेत्राची जोड मिळावी यासाठी अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यमातून होणार आहे. भंडारा,  गोंदिया,  चंद्रपूर, गडचिरोली,  वर्धा या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राला एक वेगळी दिशा आपण देत आहोत. नागपूर विभागात सुमारे 1 हजारापेक्षा अधिक हेक्टर भूखंड वाटप करून यातून 42 हजार 937.43 कोटी रुपये गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी सांगितले. यातून 29 हजार 927 रोजगार निर्मिती झाली आहे. उद्योगवाढीला चालना मिळून 80 हजार रोजगार निर्मिती यामाध्यमातून झाली आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे 35 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. विदर्भातून कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.

याच उपक्रमात आपण लाडक्या बहिणींचा प्रातिनिधीक गौरव केला. तो गौरव योजनांसाठी नसून राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये, राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये त्यांनाही प्राधान्य मिळावे, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी लवकरच विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक 75 हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्यातील युवकांच्या कौशल्य रुजावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रांना स्थानिक पातळीवरील उद्योजकांनी पुढे येऊन त्यात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान एमआयडीसी, डायरेक्टोरेट आफ इंडस्ट्रीज, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातर्फे व्यवसायासाठी देण्यात येणारे अनुदान, पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवा कार्यप्रशिक्षण योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

नारायण सेवा संस्थानचा मोफत मॉड्युलर आर्टिफिशियल लिंब फिटमेंट कॅम्प २९ सप्टेंबरला

  • टिंगरे नगर, तिरुपती गार्डन येथे ३६० दिव्यांगांना लावले जाणार कृत्रिम अवयव

पुणे,: देश-विदेशात दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थान तर्फे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्य देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी पुण्यात मोफत नारायण लिंब आणि कॅलीपर्स फिटमेंट शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर तिरुपती गार्डन मंगल कार्यालय, टिंगरे नगर, रोड नं. २, विश्रांतवाडी येथे सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.
नारायण सेवा संस्थानचे मीडिया व जनसंपर्क संचालक भगवान प्रसाद गौड़ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, संस्थान गेल्या ३९ वर्षांपासून विविध राज्यांमधील दिव्यांग बंधू-भगिनींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या परंपरेत, ९ जून रोजी संस्थानने पुण्यात मोफत लिंब मेजरमेंट कॅम्प आयोजित केला होता, ज्यात सुमारे ५०० लोक सहभागी झाले होते. यापैकी ३६० जणांना कृत्रिम अवयव बसविण्याचा निर्णय घेतला गेला. आता त्यांचे हात-पाय लावण्यासाठी शिबिर आयोजित केले जात आहे.
गौड़ यांनी सांगितले की, नारायण सेवा संस्थानने रायपूर, लखनऊ, कोलकाता, जयपूर, विशाखापट्टणम, गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये अशा प्रकारचे शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत. पुण्यातील शिबिरासाठी 25 पेक्षा अधिक स्वयंसेवी संघटना, जसे की रामा हॉस्पिटॅलिटी, यशश्वी ग्रुप, अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन, राउंड टेबल इंडिया, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय, जय शिवराय प्रतिष्ठान आणि इतर संस्था एकत्र येऊन काम करणार आहेत.
पुण्यातील या शिबिरात 360 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोफत लिंब बसवून एक नवीन जीवनदान दिले जाणार आहे. यासाठी संस्थानने केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना, प्रशासकीय अधिकारी, आणि समाजसेवकांना आमंत्रित केले आहे. दिव्यांगांना शिबिरामध्ये मोफत जेवण आणि फिटमेंटनंतर चालण्याचे प्रशिक्षण तसेच उपकरणांच्या वापर व देखभालीची माहिती दिली जाणार आहे.
नारायण सेवा संस्थान 1985 पासून मानवसेवेत कार्यरत आहे. संस्थापक कैलाश मानव यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकल्पांद्वारे त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून सशक्त बनवले आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिर,श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन ; तब्बल ५७२ हून अधिक रुग्णांची नोंदणी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, इनरव्हील क्लब ऑफ खडकी डिस्ट्रिक्ट ३१३, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लिमिटेड, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड व जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिराचे आयोजन बाबुराव सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे करण्यात आले आहे.

यावेळी टाटा ऑटोकॉम्प सिस्टीमचे चेअरमन अरविंद गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीजचे सुधीर मेहता, अध्यक्ष अरिहंत मेहता, संचालिका रितिका मेहता, इनरव्हील क्लब ऑफ खडकी च्या अध्यक्ष डाॅ.सुनीती गोयल, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ज्या रुग्णांना हात किंवा पाय नाहीत. त्यांना जयपूर फूट बसवून देण्यात येणार आहे. रुग्णांना कोणावरही अवलंबून न राहता आनंदाने जीवन व्यतीत करता यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयपूर फूट सोबतच व्हील चेअर, कुबड्या, कॅलिपर चे देखील वाटप शिबिरात झाले आहे. तब्बल ५७२ रुग्णांची नोंदणी झाली असून शिबिराचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून रुग्ण आले आहेत.

विधानसभा निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुल्कांसारखे वादग्रस्त अधिकारी हटवा.काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी.

0
  • गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची अद्याप मदत नाही, अवकाळी पावसासारखेच अवकाळी सरकार.

मुंबई, विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २४ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली.
यासंदर्भात टिळक भवन मध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजपा युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजपा युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निष्पक्ष होणार नाही. अशी मागणी काँग्रेसने केली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
भाजपा युती सरकारने विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे, विकास कुठेच दिसत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये सरकारची स्वच्छ व विकास केल्याची प्रतिमा मीडियातून दाखवण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्यामार्फत मीडियाच्या प्रमुख व्यक्तींना बोलावून टार्गेट दिले जात आहे. यासाठी एमएसआरडीसी, एमएमआरडीए, म्हाडा, सीडको, प्रदुषण महामंडळ, एसआरए यांचा पैसा वापरला जात आहे. राज्य सरकारच्या विविध महामंडळावर हजारो कोटींचे कर्ज आहे. महामंडळे ५० हजार कोटी रुपये तोट्यात आहेत हे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. सरकारकडे पैसे नसताना या महामंडळाचा पैसा वापरून कोट्यवधींची उधळपट्टी सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ७३ टक्के ओला भागात दुष्काळ आहे. गेल्या तीन चार दिवसांत ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. शेतकरी संकटात आहे पण सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. मुंबईतील नालेसफाईच्या कामात जातीने लक्ष घातल्याने मुंबई तुंबणार नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एका कार्यक्रमात केला आणि संध्याकाळी झालेल्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. अवकाळी पावसासारखे भाजपा युती सरकारही अवकाळीच आहे, असेही पटोले म्हणाले.

खाजगी जागेतील मतदान केंद्र रद्द करा..
यावेळी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मुनाफ हकीम म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची कालमर्यादा संपली असतानाही सरकारने त्यांना कालमर्यादा वाढवून दिली आहे. पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सरकार दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. कालमर्यादा संपलेल्या पोलीस महासंचालक यांना पदावरून हटवावे, तसेच राज्यातील अनेक विभागात शिपाई ते अधिकारी हे ३ वर्षांपासून त्याच जागी काम करत आहेत, ते बदलले पाहिजेत अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका निवडणूक आयोगाकडे मांडली. त्यावर अशा प्रकारचे वादग्रस्त अधिकारी निवडणूक काळात राहणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे.
खासगी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरु करण्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजेत. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे 17 C फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत अशी भूमिकाही यावेळी मांडल्याचे मुनाफ हकीम यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, डॉ. गजानन देसाई, काकासाहेब कुलकर्णी, मदन जाधव आदी उपस्थित होते.

तनिष्कने साजरा केला ३,५०,९९३ पुणेकर कुटुंबांचा आनंद: विश्वास आणि कारीगरीचा सोनेरी वारसा 

0

पुणे, भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य, तनिष्कने पुण्यामध्ये ३,५०,९९३ कुटुंबे ब्रँड वारशाचा भाग बनल्याचा आनंद साजरा केला. पुण्यामध्ये तनिष्कच्या आजवरच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्यनगरीमध्ये दशकांपूर्वी पदार्पण केलेल्या तनिष्कने अल्पावधीतच इथल्या चोखंदळ ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळवले, लहानसा समारंभ असो किंवा मोठा सोहळा, तो साजरा करण्यात तनिष्कने ग्राहकांची मनाजोगती साथ दिली. सुरुवातीपासून तनिष्क ब्रँडने आपल्या ग्राहकांसाठी असे अनुभव निर्माण करण्यावर भर दिला जे सोनेरी आठवणी बनून कायमचे मनावर कोरले जातील.

पुणेकर ग्राहकांकडून सातत्याने मिळत असलेला स्नेह आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तनिष्क ब्रँडने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तनिष्कचे मौल्यवान ग्राहक आणि त्यांनी ब्रँडसोबत मिळून निर्माण केलेला वारसा यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी एक फॅशन शो करण्यात आला ज्यामध्ये तनिष्कचे शानदार दागिने परिधान करून तनिष्कच्या ग्राहकांनी रॅम्प वॉक केला. ग्लॅमर आणि शान यांनी चमचमत्या संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये ग्राहकांनी त्यांच्या अनोख्या कहाण्या, अनुभव आणि विशेष क्षण यांचे प्रतीक असलेले दागिने प्रदर्शित केले. 

अतुलनीय कारीगरी, खास डिझाईन आणि गुणवत्तेप्रती बांधिलकी ही तनिष्कच्या उत्पादनांच्या सर्वोत्कृष्टतेची गुरुकिल्ली आहे. पारंपरिक कलात्मकता आणि आधुनिक शान यांचा मिलाप असलेले सर्वोत्तम दागिने तनिष्क सातत्याने प्रस्तुत केले आहेत. ग्राहकांच्या सन्मानार्थ ब्रँडने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये रिवाह बाय तनिष्क हा लग्नातील दागिन्यांचा खास सब-ब्रँड यावेळी पेश करण्यात आला, लग्नाचा अर्थात व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस अधिक खास व्हावा याची पुरेपूर काळजी रिवाहमध्ये घेण्यात आली आहे. पुणेरी नवरीला आवडतील आणि साजेसे ठरतील अशा दागिन्यांची विशाल श्रेणी रिवाहमध्ये उपलब्ध आहे. हळद, मेंदी या पारंपरिक कार्यक्रमांपासून, मौजमस्तीने भरपूर संगीत आणि रिसेप्शनपर्यंत प्रत्येक प्रसंगात साजेसे ठरतील असा नववधूचा संपूर्ण साज यामध्ये आहे. मुल्लई मोतु, ठुशी, पोल्का राणी हार, कोल्हापुरी साज, मोहनमाळ आणि मराठी वज्र टीक असे दागिने नववधूचा साज परिपूर्ण करतात. 

या कलेक्शनला अनुरूप अशा नाजूक डिझाईनच्या स्टडेड बांगड्या देखील तनिष्कमध्ये आहेत. तोडे, शिंदेशाही तोडे, पाटल्या आणि पिचोडी असे विविध प्रकार नववधूची शान वाढवतात. परंपरेच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि आधुनिकतेचा अप्रतिम मिलाप दर्शवणाऱ्या आधुनिक मंगळसूत्र डिझाइन्सचे डोर कलेक्शन यावेळी प्रस्तुत करण्यात आले. पुणेकर नववधुंनी पहिल्या पसंतीचा मान दिलेले हे कलेक्शन अनेकांच्या जीवनातील खास क्षणांचे साक्षीदार ठरले आहे.

टेल्स ऑफ ट्रॅडीशनमध्ये जडाऊ डिझाइन्स तनिष्कची अनोखी कारीगरी दर्शवतात, अनकट पोल्की, राजसी राजवाडा कुंदन नेकलेस शानदार आहेत, ओपन सेटिंग्समध्ये अनकट हिरे असलेले तेजस्वी चक्री दागिने डोळे दिपवतात. या कलेक्शनमध्ये आकर्षक मीनाकारी, इन्ले काम आणि उठावदार रंगांचे कॅल्सिडोनी दागिने देखील आहेत.

तनिष्कच्या बेस्ट ऑफ नॅचरल डायमंड्स कलेक्शनमध्ये पुण्यासाठी खास म्हणून तयार करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या श्रेणींमधील दागिने निवडून तब्बल १६३४४६ महिलांनी तनिष्कला पसंत केले आहे, याचा देखील आनंद यावेळी साजरा करण्यात आला. एथरियल वंडर्स या मनोहारी श्रेणीमध्ये ऍक्वामरीन, टांझानाईट, पेस्टल टूरमलाईन्स आणि दुर्मिळ सिट्रिन्स यासारख्या दुर्मिळ स्टोन्सचा वापर करून तनिष्कचे सर्वात खास कलेक्शन तयार करण्यात आले आहे. क्लासिक हाय ज्वेलरी श्रेणीमध्ये भव्यता दर्शवणारे दागिने आहेत. द एन्चेंटेड ट्रेल्स कलेक्शन, तनिष्कचे नवे कलेक्शन देखील या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. नदीच्या प्रवाहाचे अभिजात सौंदर्य, प्रकाश आणि पाण्याचा परस्परसंवाद, बहरलेल्या फुलांची मोहकता, फांद्यांची आकर्षक हालचाल आणि हिरव्यागार  जंगलातील पानांची कुजबुज हे विविध घटक समाविष्ट करून, नैसर्गिक सौंदर्यातून प्रेरणा घेऊन हे कलेक्शन तयार करण्यात आले आहे. निसर्गाच्या शांततेची कविता, निर्मळ प्रवाहांमधून सरकणाऱ्या बोटींचे नृत्य या कलेक्शनमध्ये दाखवण्यात आले आहे. हार्ट्स अँड ऍरोज कलेक्शनमध्ये कानातले, अंगठ्या आणि सॉलिटेअर स्ट्रिंगमध्ये उत्तम प्रकारचे कट डायमंड सॉलिटेअर्स प्रस्तुत केले आहेत, ज्यांनी पुणेकर ग्राहकांना जीवनातील खास क्षण साजरे करण्यासाठी अतुलनीय तेज प्रदान केले आहे.

तनिष्कने हा महत्त्वाचा टप्पा साजरा करत असताना, पुणेकर ग्राहकांनी ब्रँडला दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या ब्रँडचा वारसा गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहकांसोबत निर्माण झालेल्या चिरस्थायी नातेसंबंधांच्या पायावर बांधला गेला आहे. ज्यांनी तनिष्कवर वर्षानुवर्षे विश्वास ठेवला आहे ते विविध वयोगटातील ग्राहक तनिष्कच्या आजवरच्या वाटचालीतील महत्त्वाचा भाग बनले आहेत.

टायटन कंपनी लिमिटेडचे तनिष्कचे कॅटेगरीमार्केटिंग आणि रिटेलचे व्हीपी श्री अरुण नारायण यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करताना सांगितले, ,५०,९९३ पुणेकर कुटुंबे आमच्या परिवाराचा भाग बनल्याचा आनंद आणि महत्त्वाचा टप्पा साजरा करतानाअभिमानाबरोबरीनेच कृतज्ञतेने आमचा ऊर भरून आला आहेतुमच्या जीवनातील सर्वात चांगल्या क्षणांमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलोनववधूंसाठी आयुष्यभराच्या सोनेरी आठवणी निर्माण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहेआम्ही मिळवलेले यश तुमच्या विश्वासावर आधारलेले आहेउत्कृष्टताकारीगरी आणि तुमच्या कहाण्या सांगणारे दागिने निर्माण करण्याचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोतअतुलनीय गुणवत्तासेवा आणि संस्मरणीय अनुभव सातत्याने प्रदान करत राहू हे आमचे वचन आहेआम्हाला तुमच्या आयुष्याचा आणि कुटुंबाचा सोनेरी भाग बनवल्याबद्दल मनःपूर्वक आभारपुणे!”

केंद्र शासनाच्या सहकार विभागातर्फे विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि सक्षमीकरण-सहकार आयुक्त दीपक तावरे

0

पुणे,:- केंद्र शासनाच्या सहकार विभागामार्फत राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची “नोडल एजन्सी” म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या नूतनीकृत कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी तावरे बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमास अपर निबंधक मिलींद आकरे, सहसंचालक कृषी विनय आवटे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, पुणे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, महामंडळाचे राज्य समन्वयक रमेश शिगटे, धनंजय डोईफोडे, महाव्यवस्थापक शिल्पा कडू, ज्योती शंखपाल, व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, श्री.दिंगबर साबळे आणि महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तावरे म्हणाले, अटल अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ४२८ संस्थाना कर्ज आणि अनुदान वितरणासाठी रुपये ७२ कोटी ४२ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सुमारे शंभर संस्थांना दोन कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. राज्यातील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासद शेतकऱ्यांना नियमित आणि वाजवी दाराने खत पुरवठा करणे, संस्थाना खत परवान्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले असून गेल्या चार वर्षात महामंडळाने रुपये ८५ कोटी रकमेचा खत पुरवठा केला आहे.

महामंडळाने शासनाच्या विविध योजना, उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती, प्रक्रिया उद्योग, स्मार्ट प्रकल्प, मॅग्नेट प्रकल्प,पोकरा प्रकल्प, नाबार्ड,आत्मा, एन.एच.एम. तसेच पंधरा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्यामार्फत महामंडळाची क्लस्टर बेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून नियुक्ती झाली असून शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी, प्रशिक्षण, कृषी निविष्ठा उपलब्ध करणे, अभ्यास दौऱ्याचे आयोजन, शेतमाल विक्रीसाठी मार्गदर्शन,प्रक्रियादार, निर्यातदार, खरेदीदार जोडणी असे कामकाज करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

“सहकार से समृद्धी” योजने अंतर्गत केंद्र सरकार विविध सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी कटिबद्ध असुन त्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना सुधारीत तंत्रज्ञान, उद्योगवाढ, उत्पन्नवाढ, विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करीत असून यामध्ये राज्यातील सुमारे बारा हजार संस्थांचा समावेश आहे. या संस्थांच्या संगणीकरणास केंद्र शासनाने मान्यता दिली असून संस्थांना संगणकाचा पुरवठा करण्यात आला आहे अशीही माहिती श्री. तावरे यांनी यावेळी दिली.

नाबार्ड तर्फे महामंडळाची प्रोडयुसर ऑर्गनायझेशन प्रमोटींग इन्स्टिट्यूट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तीस शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी, प्रशिक्षण, व्यवसाय विकास आराखडा तयार करणे, निविष्ठा व्यवसाय, इत्यादी प्लॅटफॉर्मवर कंपन्यांची नोंदणी, शेतमाल विक्रीसाठी खाजगी कंपन्या, खरेदीदार प्रक्रियादारांसोबत जोडणी, प्रकल्पांचा लाभ मिळवून देणे यासंबधी कामकाज करण्यात येत आहे असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी सांगितले.

राज्यातील १ हजार २५२ विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, १ हजार ४९ विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय संस्था आणि ५ हजार ६०७ विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी भारतीय बियाणे सहकारी समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केले आहे. या सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत मार्गदर्शन, व्यवसाय वृद्धीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

मावळ येथील शेकडो एकर अकृषिक (एनए) जमिनीची फाईलच गहाळ; माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड

  • कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय; ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभागात करणार तक्रार

पुणे :- मावळ तालुक्यातील शिलिंब गावातील शेकडो एकर अकृषिक (एनए) जमिनीची फाईलच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती अधिकारात उघड झाली आहे. प्रशासन आणि जमीनमालक यांच्या संगनमतानेच हा प्रकार झाल्याचा आरोप पतित पावन संघटनेचे मावळ तालुका संघटक अंकुश चोरगे यांनी केला आहे. यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय निर्माण होत असून या प्रकरणी ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभागात करणार तक्रार करणार असल्याचे चोरगे म्हणाले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील शिलींब व चावसर या गावी शेकडो एकर जमिनीचे संकलन करून २००८ मधे मावळ तहसीलदार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडून अर्जदार रायटर लाइफस्टाईल प्रा लि, यांना अकृषिक परवानगी देण्यात आली. सदर प्रोजेक्ट मधे ९५ हेक्टर जागा एनए असताना ईसी आणि पीएमआरडीए ने १३१ हेक्टर वर प्लॅन मंजूर केला आहे आणि त्यावर रायटर लाइफस्टाईल प्रा लि यांनी पंचतारांकित हॉटेल उभारले आहे. यावेळी जमीन खरेदी करताना अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे अंकुश चोरगे यांनी म्हंटले आहे. शेकडो एकर जमिनीची अकृषिक परवानगीची मुख्य फाईल जिल्हाधिकारी महसूल कार्यालयाकडे नसल्याची माहिती प्रशासनाने माहिती अधिकारात दिली. तहसीलदार मावळ, नगर रचना पुणे ग्रामीण, पुणे महानगर विकास प्राधिकरण यापैकी कोणाकडेही अकृषिक जमिनीची मुख्य फाईल शासकीय अभिलेखात नसल्याचे पत्र या सर्व विभागांनी दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन केले आहे, अनेक खरेदी खतांना शेतकरी पुरावा नसतांना ही पूर्ण क्षेत्र एनए करण्यात आले आहेत. तसेच अकृषिक परवानगी घेताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकरणातील प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तत्पर लक्ष न घातल्यास सदर विषयाची तक्रार ईडी ला आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ला करणार असल्याचे अंकुश चोरगे यांनी म्हटले आहे.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे १० व्या जागतिक विज्ञान,धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराजबाग,पुणे येथे आयोजन

  •  राष्ट्रपिता म. गांधींच्या १५५ व्या जयंती निमित्त ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर  रोजी जागतिक परिषद

पुणे – २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हे स्वामी विवेकानंदांचे भाकित सत्यात उतरविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर या दरम्यान विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या सम्मेलनचा उद्घाटन समारोह गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० या  वेळी होणार आहे. या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. करणसिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोप ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. होणार आहे. यावेळी केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ महोम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व सम्मेलनाचे मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा व डॉ.संजय उपाध्ये उपस्थित होते. या परिषदेमध्ये ११ विषयांवरील ज्ञानाधिष्ठित सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये १ राष्ट्रांच्या प्रमुखांची भूमिका – संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी “शांतता संस्कृती” ला प्रोत्साहन देण्यासाठी जगात पसरलेली अराजकता, गोंधळ, रक्तपात, दहशतवाद, नरसंहार आणि भीषण हिंसा कमी करण्यासाठी राजकीय नेते
२.धर्माची संकल्पना आणि भूमिका – जागतिक धर्मांचे सर्वात आदरणीय आणि आदरणीय प्रमुखांचा “दैवी आशीर्वाद समारंभ”.
३: जागतिक शांतीसाठी विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्यात एकवाक्यता प्रस्थापित करण्याची गरज आहे.
४: सार्वभौमिक शब्दः ओम, योग, विपश्यना, नमाज, प्रार्थना आणि ध्यान इत्यादि हे जगातील शांततेची संस्कृती साकारण्याचे  दैवी मार्ग आहेत.
५: विद्यापीठे / महाविद्यालयांच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये विज्ञान आणि अध्यात्माच्या योग्य घटकांसह “मूल्याधिष्ठीत वैश्विक शिक्षण प्रणाली” ला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
६: परमसत्य- सर्वशक्तिमान देव समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी चेतना आणि वास्तवाच्या शाळा स्थापन करण्याची गरज आहे.
७: जगातील तीर्थ क्षेत्रांना दैवी ज्ञानाच्या केंद्रांमध्ये बदलण्याची गरज आहे किंवा जागतिक शांतता वाढवण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म / धर्म यांची भूमिका आहे.
८.ग्लोबल वार्मिंग कमी करणे आणि मानवी अस्तित्वासाठी शाश्वत विकास उद्दिष्टे पुन्हा परिभाषित करणे आवश्यक आहे.
९: संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांना संपूर्ण नियंत्रण आणि थेट हस्तक्षेपासाठी सक्षम करण्याची नितांत गरज आहे. जेणे करून अराजकता, गोंधळ, रक्तपात, नरसंहार, दहशतवाद आणि राष्ट्रांमधील युद्धे/ संघर्ष आणि इतर क्षुल्लक समस्या टाळता व थांबवता येईल.
१०: जीनोम ते ओम
११: शांततेची संस्कृती प्रस्थापित करण्यात माध्यमांची भूमिका
आदि विषयांचा समावेश आहे.


झोराष्ट्रियन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र व चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग यांच्या पुतळ्यांची स्थापना
जागतिक परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २ अ‍ॅाक्टोबरला झोरास्ट्रियन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र आणि सातव्या शतकात भारतात येऊन भारताची ओळख जगासमोर मांडणारा चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग ह्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची स्थापना जगातील सर्वात विशाल अशा तत्त्वज्ञ संत श्री. ज्ञानेश्वर-श्री तुकाराम महाराज विश्वशांती सभागृहात करण्यात येणार आहे. या प्रसंगी
भारतातील पारशी समाजातील मान्यवर व्यक्ति, तसेच दिल्ली येथील चिनी दूतावासातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जपानचे निसर्ग सौंदर्य, संस्कृती पाहून हरखले पुणेकर

  • ‘लँडस्केप अँड लिजंड्स’ तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन; रविवारपर्यंत विनामूल्य खुले राहणार
  • जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलीडेजतर्फे आयोजन; छायाचित्रे, पेंटिंग्जचा मनोहारी संगम

पुणे: जपानमधील अद्भुत निसर्गरम्य स्थळांची व तेथील वन्यजीवांची छायाचित्रे, कुंचल्यातून साकारलेले निसर्गसौंदर्य, छोट्या पारंपरिक बाहुल्या, हस्तकलेतून प्रतिबिंबित केलेली जपानी संस्कृती पाहून पुणेकर हरखुन गेले. निमित्त होते, जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलीडेजच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘लँडस्केप अँड लिजेंड्स: ए जपानी कल्चर मोझॅक’ या प्रदर्शनाचे!

जपानी कला, संस्कृती आणि कारागिरीचा त्रिवेणी संगम असलेले हे प्रदर्शन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात भरले आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. २९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे. छायाचित्रकार किरण जोशी यांनी काढलेली छायाचित्रे आणि चित्रकार आसावरी अरगडे यांनी रेखाटलेली चित्रे मन मोहून टाकत आहेत. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संचालनालयाच्या मौसमी खोसे, हिताची अस्तिमो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उत्सुमी सान, संचालक सुधीर गोगटे, संयोजक व ‘गेट सेट गो’चे संचालक अमित कुलकर्णी, अस्मी कुलकर्णी, गायिका मनीषा निश्चल आदी उपस्थित होते.

शमा पवार म्हणाल्या, “जपान आणि भारत यांच्यातील नाते खूप प्राचीन आहे. प्राचीन संस्कृती, निसर्गसौंदर्य याचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनात डोळ्यांचे पारणे फिटले असून, प्रत्यक्ष जपान फिरतो आहोत, असा अनुभव येतो. इतके सुंदर ठिकाण पाहण्यास आपणही जावे, अशी भावना मनात येते. महाराष्ट्र आणि भारताची पर्यटन स्थळे जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न सुरु आहेत. इनक्रीडेबल इंडिया आणि महाराष्ट्र अनलिमिटेड या उपक्रमातून पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला जात आहे.”

जुनरो उत्सुमी सान यांनी भारतीयांचे जपानला कायमच प्रेम मिळाले असून, पर्यटन व व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट होत असल्याचे नमूद केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात जपान वेगळ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. लवकरच दिव्यांगांसाठी एक जपानची सहल आयोजित करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

जपानमधील निसर्गसंपन्न लँडस्केप फोटोग्राफी, वाइल्डलाईफ फोटोग्राफी, पर्यटनस्थळांचे वॉटर कलरमधील कॅनव्हास पेंटिंग्ज, प्रसिद्ध ओरिगामी आणि त्याची प्रात्यक्षिके, तेथील आकर्षक वस्तू, जगप्रसिद्ध सुंदर बाहुल्या, जपानी कला, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

मौसमी खोसे, सुधीर गोगटे यांनीही मनोगते व्यक्त केली. ओंकार दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अस्मि कुलकर्णी यांनी आभार मानले. किरण जोशी आणि आसावरी अरगडे यांचा विशेष सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक पर्यटन प्रेमींनी उपस्थिती लावत प्रदर्शनचा आनंद घेतला. 

महिंद्रा फायनान्सची यूग्रो कॅपिटल लिमिटेडसोबत भागीदारी

●     एमएसएमईंना व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज (एलएपी) प्रदान करण्याचा उद्देश

●     महिंद्रा फायनान्सच्या एमएसएमई एमएसएमई कर्ज पोर्टफोलिओला चालना देण्यासाठी भागीदारी

मुंबई महिंद्रा फायनान्स ही भारतातील आघाडीच्या एनबीएफसीपैकी एक कंपनी असून, महिंद्रा समूहाचा एक भाग आहे. कंपनीने आज डाटाटेक एनबीएफसी आणि एमएसएमई विभागातील भारतातील सर्वात मोठे सह-कर्जदार यूग्रो कॅपिटल लिमिटेड यांच्याशी भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला व्यवसाय कर्ज मिळेल व मालमत्ता (LAP) विरुद्ध सुरक्षित परवडणारी कर्जे मिळतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धीच्या शक्यता सुधारतील.

महिंद्रा फायनान्स आणि यूग्रो कॅपिटलचे सामर्थ्य या भागीदारीच्या संरचनेत एकत्र करण्याचे उद्दिष्ट आहे. यूग्रो त्यांचे डेटा विश्लेषण, वितरण नेटवर्क आणि ग्राउंड प्रेझेन्सचा फायदा घेतील. एमएसएमई व्यवसायही महिंद्र फायनान्सच्या ब्रँड इक्विटीचे भांडवल करण्यास सक्षम असतील. त्यामुळे विविध प्रकारच्या ग्राहकांच्या विस्तृत विभागांमध्ये क्रेडिट अ‍ॅक्सेस मिळेल. त्यामुळे वेळेवर आर्थिक साहाय्य शोधणाऱ्या एमएसएमईना वेळीच कर्ज मिळेल.

भागीदारीबद्दल बोलतानामहिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राऊल रेबेलो म्हणाले, “यूग्रो कॅपिटलसोबतची ही भागीदारी भारताच्या एमएसएमई इकोसीस्टमसाठी फायद्याची ठरेल. लहान व्यवसायातील कर्जातील अंतर भरून काढण्यास मदत करेल. व्यवसायांना वाढीस मदत करण्यासाठी या क्षेत्राला सर्वसमावेशक आर्थिक उपाय प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट असेल. कारण उदयोन्मुख भारतासाठी जबाबदार आर्थिक उपाय भागीदार होण्याच्या आमचे ध्येय आहे.”

यूग्रो कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ म्हणाले, “या धोरणात्मक भागीदारीमध्ये महिंद्रा फायनान्ससोबतच्या आमच्या सहकार्यामुळे एमएसएमईंसाठी क्रेडिट उपलब्धतेमध्ये लक्षणीय वाढ होईल. एकत्रितपणे आर्थिक समावेशासाठी आमची सामाईक बांधिलकी पुढे घेऊन जात वेळेवर आणि कार्यक्षम वित्तपुरवठा उपाय वितरित करण्याचे आमचे ध्येय आहे. ही भागीदारी एमएसएमईचे सक्षमीकरण आणि देशभरात त्यांच्या वाढीला गती देण्यासाठी एक मजबूत पाऊल आहे. एमएसएमई अच्छा है’ हे यूग्रोचा मूळ विश्वास प्रतिबिंबित करते आणि भारतातील प्रत्येक एमएसएमईच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्याचे आमचे ध्येय अधिक मजबूत करते.

महिंद्र फायनान्सच्या एमएसएमई ग्राहकांना हाताळण्याचा अनुभव, हायपरलोकल स्कीम आणि किफायतशीर भांडवलाचा फायदा एमएसएमई व्यवसाय घेतील व एमएसएमई वित्त तज्ज्ञ म्हणून यूग्रो कॅपिटलच्या कौशल्याचा फायदाही एमएसएमईंना होईल. आर्थिक लँडस्केपचे गतिशील स्वरूप ओळखून, सहयोगाची कल्पना दीर्घकालीन वचनबद्धता म्हणून केली गेली आहे, प्रारंभिक करार तीन वर्षांचा आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

0

मुंबई  माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहक सेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. २६ सप्टेंबर २०२४ रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामकाजात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणकडून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ग्राहक सेवेत अधिक सुलभता आणणाऱ्या ऊर्जा चॅटबॉट व ईव्ही मोबाईल ॲपसाठी महावितरणला हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

महावितरणचे ऊर्जा चॅटबॉट २४ तास  ग्राहकांच्या सेवेत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना नवीन जोडणी अर्ज, तक्रार नोंदणी करणे, वीजबिल भरणे इ. सेवा सुलभपणे उपलब्ध झालेल्या आहेत. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत ग्राहकांना तत्परतेने, सुरक्षितरितीने माहिती प्रदान करून ग्राहकांचे समाधान करण्यात येत आहे. महावितरणच्या इलेक्ट्रिक व्हेईकल उपक्रमासाठी मानव विरहित ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या उभारणी व इलेक्ट्रिक व्हेईकल वापरकर्त्यांसाठी मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप वापरकर्त्यांस चार्जिंग स्टेशन शोधणे व ई-वाहनांच्या व्यवस्थापनात मदत करते. हे ॲप महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वाढीला चालना देणारे ठरले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पुरस्कार महावितरणतर्फे महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) एकनाथ चव्हाण यांनी स्वीकारले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे व माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.

संजय राऊतांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा व जामीनही मंजूर

0

मुंबई : मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या सहभागी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.संजय राऊतांच्या या आरोपाविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आता संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना 15 दिवसांची कैद सुनावली आहे. 

संयज राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

आब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना दिलासा; कोर्टाने दिला जामीन; ३० दिवस शिक्षेवर स्थगिती

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.या प्रकरणात शिवडी कोर्टाने त्यानं दोषी ठरवले होते. कोर्टाने संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी व २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावली गेल्यानंतर संजय राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र नायायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे. मेधा सोमय्यांनी २०२२ मध्ये संजय राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

शिवडी कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावल्यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर याचिकेवर झालेल्या सुनावणीत राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात दाद मागण्याची मुभादेखील सत्र न्यायालयाने दिली आहे.

मीरा भाईंदरमधील टॉयलेट घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने राखून ठेवला होता. या निकालाची आज (26 सप्टेंबर) सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हा संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र आता सत्र न्यायालयाने राऊतांना जामीन दिला आहे.

एकाच शहरात, एकाच मेट्रोचे किती वेळा उद्घाटन करणार -आमदार रवींद्र धंगेकर

पुणे – शहर एकच मेट्रोही एकच त्याचे तुम्ही कितीवेळा उद्घाटन करणार? यामुळे सरकारी तिजोरीतील जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून उद्घाटनाचे घाट रचले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी केली.

जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ आणि स्वारगेट स्थानक ते कात्रज स्थानक टप्पा एक या विस्तारित भूमिगत मार्गीकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार होते. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. या पार्श्वभूमीवर, आमदार धंगेकर बोलत होते.

आमदार धंगेकर म्हणाले, एकाच शहरात मेट्रोचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन केले जात आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे इव्हेंट भाजप आयोजित करत आहे आणि त्यातून ते स्वतःची जाहिरातबाजी करीत आहेत. पण, यामुळे सरकारच्या तिजोरीतील सर्वसामान्यांचा पैसा खर्च होतोय. याआधी पंतप्रधानांनी ऑनलाईन माध्यमातून उद्घाटने केली आहेत. तसेच याही वेळेस त्यांना ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करता आले असते. पण तसे करण्यातबाले नाही. कारण भाजपच्या डोक्यात केवळ निवडणुका आहेत.

पंतप्रधान येणार म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून तयारी करण्यात आली होती. अखेरच्या क्षणाला त्यांचा दौरा रद्द झाला. पण सर्वसामान्यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. याला जबाबदार कोण? पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्याची नामुष्की कोणामुळे ओढावली? याची उत्तरेही जनतेसमोर आली पाहिजेत, असे आमदार धंगेकर यांनी सांगितले.


काँग्रेसने ‘असे’ कधीही केले नाही!

या देशात मेट्रो आणण्याचे पहिले ऐतिहासिक पाऊल काँग्रेसने उचलले. दूरदृष्टी ठेवून डीपीआर आणला. हे देशातील जनतेला माहिती आहे. पण, याची जाहिरातबाजी काँग्रेसने कधीही केली नाही. जनतेचा पैसा जपून, काळजीपूर्वक वापरण्याचे काम काँग्रेसने केले. पण सध्याच्या सरकारमध्ये तसे होताना दिसत नाही, अशी खंत आमदार धंगेकर यांनी व्यक्त केली.

जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक ते स्वारगेट स्थानक या भूमिगत मार्गावरील प्रवासी सेवेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होवू शकला नाही. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिकाच्या हस्ते हा शुभारंभ करायला हवा होता. पण, सत्ताधाऱ्यांनी तसे केले नाही.

रवींद्र धंगेकर,आमदार

पंतप्रधान मोदी यांचा राजकीय दौरा रद्द झाला,पुणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – मेट्रो उदघाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन भाजपचा प्रचार करणार होते. पण, पावसाने व्यत्यय आणला आणि हा दौरा रद्द झाला, त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज (गुरुवारी) व्यक्त केली.

मेट्रोच्या स्वारगेट येथील अर्धवट कामाची पहाणी मोहन जोशी यांनी केली. या अर्धवट प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान मोदी करणार होते आणि त्यातून पुणेकरांची दिशाभूल केली जाणार होती. हा दौरा वादग्रस्त ठरून आपल्या अंगलट येईल, याची जाणीव मोदी आणि त्यांच्या पक्षाला झाली असावी, त्यातूनच त्यांनी हा दौरा रद्द केला. मेट्रोच्या ३२ किलोमीटर मार्गावरील वेगवेळ्या टप्प्यांचे भूमिपूजन आणि उदघाटन यासाठी पंतप्रधान मोदी आधी ५ वेळा येऊन गेले याच प्रकल्पातील एका टप्प्याच्या उदघाटनासाठी ते आज सहाव्यांदा येथे येणार होते. त्यातून वाद निर्माण झाला असता. सध्या महाराष्ट्रात भाजपसाठी प्रतिकूल वातावरण आहे. त्यात पुन्हा नव्याने काही वाद निर्माण होणे म्हणजे प्रकरण अंगलट येण्यासारखेच होते. म्हणून त्यांनी दौरा टाळला, असे मोहन जोशी म्हणाले.

पंतप्रधान मोदींची सभा स.प.महाविद्यालयाच्या पटांगणावरती होणार होती. ही सभा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच एक भाग होता. या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद करण्यात येणार होती. पाऊस आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी मोदींचा पुणे दौरा हा त्या त्रासात भर घालणारा होता. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.