पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, इनरव्हील क्लब ऑफ खडकी डिस्ट्रिक्ट ३१३, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लिमिटेड, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड व जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबिराचे आयोजन बाबुराव सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे करण्यात आले आहे.
यावेळी टाटा ऑटोकॉम्प सिस्टीमचे चेअरमन अरविंद गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीजचे सुधीर मेहता, अध्यक्ष अरिहंत मेहता, संचालिका रितिका मेहता, इनरव्हील क्लब ऑफ खडकी च्या अध्यक्ष डाॅ.सुनीती गोयल, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश सूर्यवंशी म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ज्या रुग्णांना हात किंवा पाय नाहीत. त्यांना जयपूर फूट बसवून देण्यात येणार आहे. रुग्णांना कोणावरही अवलंबून न राहता आनंदाने जीवन व्यतीत करता यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयपूर फूट सोबतच व्हील चेअर, कुबड्या, कॅलिपर चे देखील वाटप शिबिरात झाले आहे. तब्बल ५७२ रुग्णांची नोंदणी झाली असून शिबिराचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून रुग्ण आले आहेत.