मुंबई.दि.७: राज्यातील खासगी ट्युशन क्लासेस आणि कोचिंग संस्थांकडून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोट्या यशोगाथा, निकालांचा गैरवापर, अवाजवी शुल्क आकारणी आणि विद्यार्थी-पालकांची होत असलेली आर्थिक फसवणूक या गंभीर प्रश्नावर विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना क्रमांक ७ अंतर्गत विधानपरिषद सदस्य श्री कृपाल तुमाने यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.
या चर्चेत सहभागी होत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गेल्या पाच ते दहा वर्षांत राज्यात खासगी क्लासेसची किती नोंदणी झाली, त्यांची पडताळणी कशी झाली, तसेच विविध स्पर्धा परीक्षा आणि पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडे यासंदर्भातील नेमका डेटा व तपासणी अहवाल उपलब्ध आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. अशी माहिती उपलब्ध नसल्यास या संपूर्ण परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी शासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री श्री दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत खासगी ट्युशन क्लासेस आणि कोचिंग संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात नव्हता. मात्र, या क्षेत्रात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थी-पालकांचे हित जपण्यासाठी येत्या अधिवेशनात स्वतंत्र कायदा सादर करण्यात येणार असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जाईल.

