‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ अंतर्गत वारकऱ्यांसाठी सर्वंकष सुविधा; सेवाभाव, स्वच्छता आणि आधुनिक व्यवस्थापनाचा संगम
पुणे, दि. ७ जुलै २०२६ : आषाढी वारीचे मंगलमय वातावरण संपूर्ण पुणे शहरात अनुभवायला मिळत असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी सज्ज झाली आहे. हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरभर व्यापक नियोजन करण्यात आले असून पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमामध्ये पारंपरिक सेवाभावाला आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी प्रशासनाची जोड देण्यात आली आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन पूर्ण केले असून स्वच्छता, अखंडित पाणीपुरवठा, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, वाहतूक समन्वय तसेच नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागप्रमुखांसमवेत पालखी मार्ग तसेच विविध मुक्कामस्थळांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
सध्या शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन पथके, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालखी मार्गावर स्वच्छता, सुरक्षितता आणि तातडीची मदत उपलब्ध राहील, यासाठी स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेतील बदल, प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे. सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे
——-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात होणारे आगमन ही प्रत्येक पुणेकरासाठी श्रद्धा, सेवा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. वारकऱ्यांची सेवा हीच खरी संतसेवा मानून पुणे महानगरपालिकेने सर्व विभागांना सज्ज ठेवले आहे. संतांनी दिलेला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सर्व पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य करत सेवाभावाने या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे.
- मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे

