आयसीसीआरतर्फे ‘होरायझन’ उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत सादरीकरणात प्रभुत्व असलेल्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना आज अनोख्या मैफलीचा आनंद घेता आला.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (दि.27) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘होरायझन’ उपक्रमाअंतर्गत भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी, कार्यक्रम अधिकारी आणि सल्लागार संजीवनी स्वामी, भारतीय विद्या भवनचे प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.
मैफलीच्या पहिल्या सत्रात अर्चना सहकारी यांचे गायन झाले. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात एक निषाद बिहागडा रागातील मध्य लयीतील ‘बैरन बिन’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून डॉ. सहकारी यांनी द्रुत बिहागडामधील ‘पाती ना भेजी’ हा छोटा ख्याल बहारदारपणे सादर केला. ‘ओ दिलदारा आजा रे’ हा खमाज रागातील पं. कुमार गंधर्व यांनी रचलेला टपख्याल सादर करून त्यांनी रसिकांना तृप्त केले. सुरेल आवाज, सहज फिरत आणि उत्तम गायनशैली यामुळे डॉ. सहकारी यांच्या गायन मैफलीत रंग भरले.
डॉ. अर्चना सहकारी यांना रोहित प्रभुदेसाई (तबला), मेघा प्रभुदेसाई (संवादिनी), अनोखी गुरव (सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांचे बहारदार नृत्य झाले. त्यांनी आपल्या नृत्याविष्काराची सुरुवात गुरू केलुचरण महोपात्रा यांनी रचलेल्या महिषासुरमर्दिनीचे रूप दर्शविणाऱ्या रचनेने केली. स्त्रीशक्तीची महती सांगणाऱ्या या दुर्गा अष्टपदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर मौमिता वत्स घोष यांनी ओडिसी नृत्यातील पल्लवी हा प्रकार सादर केला. ज्यात सहज सोप्या नृत्यविष्कारापासून सुरुवात होऊन क्लिष्ट व जलद हालचालींचा समावेश होता. कार्यक्रमाची सांगता त्यांनी राधा-कृष्णाच्या नात्याचे दर्शन घडविणाऱ्या पंडित भुवनेश्वर यांनी रचेलेल्या आणि गुरू पंडित केलुचरण महापात्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘धीरे समिरे यमुना तिरे’ या रचनेने केली. या नृत्य रचनेद्वारे राधा-कृष्णाच्या नात्यातील आत्मा-परमात्म्याचे अनुबंध उलगडले गेले. जलद पदन्यास, तालबद्ध हालचाली अन् विलोभनिय हावभाव यातून मौमिता यांचा नृत्याविष्कार लक्ष्यवेधी ठरला. मौमिता वत्स घोष यांचे पुण्यातील पहिले नृत्य सादरीकरण होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. पंडित सुहास व्यास यांचा सन्मान सुदर्शन शेट्टी यांनी केला तर कलाकारांचा सत्कार पंडित सुहास व्यास यांनी केला.
पंडित सुहास व्यास म्हणाले, आयसीसीआर ही संस्था देशातील सांस्कृतिक चळवळीच्या वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून होरायझन सिरीजद्वारे नवनवीन कलाकारांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. देशाच्या विविध भागातच नव्हे तर देशाबाहेरही भारतीय कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे, त्यामुळे विदेशात भारतीय संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत आहे..
आयसीसीआर आणि भारतीय विद्याभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनीवन कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते, असे प्रा. नंदकुमार काकिर्डे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका घैसास यांनी केले.