पुणे:कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, भजन, भक्ती आणि साहित्य याचा मनोहारी संगम असणारा आणि नवरात्रात सलग 10 दिवस चालू असणारा ‘पुणे नवरात्रौ महोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमाखदार 30वे वर्ष साजरे करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चेन्निथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे याचे शानदार उद्घाटन संपन्न होईल, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विधिवत घटस्थापना – शिवदर्शन येथील दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिरात गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर सौ. जयश्री बागुल व श्री आबा बागुल यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होईल.
विशेष आकर्षण– सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती हे विशेष आकर्षण असेल.
‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’- विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविले जाते. राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना यंदा (दि. 3) उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
नेत्रदीपक उद्घाटन सोहळा – कार्यक्रमाचा प्रारंभ सनईच्या मंजुळ सुरांनी होणार असून दीपप्रज्वलनाने 30व्या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देवीची सामूहिक आरती होईल.
महोत्सवाची सुरुवात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या ‘दुर्गा नमनाने’ होईल. त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे ‘देवीचा जागर व गोंधळ’ सादर करणार आहेत.
‘नृत्यरंग’ कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा नृत्याविष्कार व बॉलीवुड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे करणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध उद्योजक, बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी आमदार उल्हास पवार, आमदार,रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संग्रामदादा थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार संजय जगताप, शहर अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे, माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा गट संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती असणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- भव्य उद्घाटन सोहळा: श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास ‘परंपरा’ कार्यक्रम, हिंदी-मराठी संगीत रजनी ‘मेलडी बिटस्’, ‘महाराष्ट्राचा लोकमेळा’, सलग ‘12 तासांचा लावणी महोत्सव’, हिंदी गीतांचा सुरेल नजराणा ‘ऑल टाईम्स हिट्स’, ‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन आणि अजय-अतुल’ यांची लोकप्रिय गीते, ‘रिदम बेसवर आधारित बहारदार ऑर्केस्ट्रा’, ‘जुनून’ अंतर्गत फिल्मी कव्वाली आणि सुफी गाणी’, ‘बॉलिवुड म्युझिकल बिटस्’ अंतर्गत हिंदी ऑर्केस्ट्रा, ‘अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट’ असे भरगच्च कार्यक्रम दि. 3 ते दि. 12 ऑक्टोबर या काळात रोज सायंकाळी 7.00 वाजता पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे संपन्न होतील.
महोत्सवाचे थेट प्रक्षेपण- ‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’चा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षेपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे.
रसिकांसाठी सर्व कार्यक्रम विनामूल्य- नवरात्रौच्या कालावधीत सलग 10 दिवस आणि तब्बल 30 वर्षे चालू असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. यातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. या महोत्सवाअंतर्गत पुणे नवरात्रौ महिला महोत्सवही गेली 25 वर्षे साजरा होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम सविस्तर माहिती : –
गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‘परंपरा’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार असून श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे.
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : अभिजित कोसंबी व प्रसेनजित कोसंबी प्रस्तुत हिंदी-मराठी संगीत रजनी ‘मेलडी बिटस्’चे आयोजन करण्यात आले आहे. यात श्रेया मयुराज, स्वप्ना पानसे यांचा सहभाग आहे.
शनिवार, दि. 5 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‘महाराष्ट्राचा लोकमेळा’ प्रा. गणेश चंदनशिवे, योगेश चिकटगावकर, शाहीर यशवंत जाधव, संपदा सादर करणार आहेत.
रंगणार 12 तासांचा लावणी महोत्सव
रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी : दुपारी 12 ते रात्री 12 या कालावधीत लावणी महोत्सवाचे आयोजन होणार असून यात ‘छत्तीस नखरेवाली’, ‘ओरिजनल जल्लोष अप्सरांचा’, ‘तुमच्यासाठी कायपण’, ‘कैरी मी पाडाची’ आणि ‘चंद्रकला’ असे लावण्यांचे कार्यक्रम रंगणार आहेत.
सोमवार, दि. 7 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : हिंदी गीतांचा सुरेल नजराणा ‘ऑल टाईम्स हिट्स’ सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, चारुलता पाटणकर, धनंजय पवार व भव्य वाद्यवृंदासह सादर करणार आहेत.
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : मुकेश देढीया, मकरंद पाटणकर, धनंजय पवार, तेजस्वीनी, राधिका अत्रे ‘ए. आर. रहमान, आर. डी. बर्मन आणि अजय-अतुल हिट्स’ अंतर्गत लोकप्रिय गीतेसादर करणार आहेत.
बुधवार, दि. 9 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‘रेट्रो रिदम्स’ अंतर्गत रिदम बेसवर आधारित बहारदार ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे. सौरभ दप्तरदार, कोमल कृष्णा व राजेश्वरी पवार यांचा सहभाग असणार आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‘जुनून’ अंतर्गत फिल्मी कव्वाली आणि सुफी गाणी यांचे सादरीकरण होणार आहे. संदीप पंचवाटकर, विवेक पांडे, राजेश्वरी पवार आणि भाग्यश्री बंगारे यांचा सहभाग आहे.
शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : ‘बॉलिवुड म्युझिकल बिटस्’ अंतर्गत हिंदी ऑर्केस्ट्राचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. पल्लवी पत्की-ढोले, सा रे ग म फेम रफी हबिब, विनोद कुमार, कविता जावळकर आणि संतोष कुमार यांचा सहभाग आहे.
शनिवार, दि. 12 ऑक्टोबर : सायंकाळी 7 वाजता : दसऱ्याच्या दिवशी हिंदी-मराठीतील गाजत असलेली प्रसिद्ध जोडी अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी आणि रोहित राऊत यांचे ‘अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये रंगारंग सादरीकरण होणार आहे.
नवरात्रौ महोत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही संस्थेतर्फे राबविण्यात येतात. शादेय नवरात्रीनिमित्त पुणेकर भाविकांनी जागृत देवस्थान आलेल्या श्री लक्ष्मीमातेचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सौ. जयश्री बागुल (अध्यक्षा, पुणे नवरात्रौ महिला महोत्सव), घन:श्याम सावंत (उपाध्यक्ष), श्री गणेश सह. बँक लि. पुणेचे चेअरमन नंदकुमार बानगुडे (कोषाध्यक्ष), नंदकुमार कोंढाळकर (सचिव), श्री गणेश सह. बँक लि. पुणेचे चेअरमन रमेश भंडारी (सदस्य), कपिल बागुल (सदस्य), सागर बागुल (सदस्य) हेमंत बागुल (सदस्य), महेश ढवळे (सदस्य), सागर आरोळे (सदस्य) हे मुख्य पदाधिकारी आहेत. राजेंद्र बागुल, जयवंत जगताप, अमित भगत, इम्तियाझ तांबोळी, अभिषेक बागुल, टी. एस. पवार, राजेंद्र बडगे, विलास रत्नपारखी हे कार्यकारिणी सदस्य असून ‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन, अधिश प्रकाश पायगुडे सांस्कृतिक प्रमुख आहेत. घटस्थापना, पूजाअर्चा व धर्मिक विधीचे प्रमुख वेदमूर्ती श्री. श्रीकांत दंडवते गुरुजी, श्री. होतीलाल शर्मा गुरुजी आहेत.