पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा; ५ जणांचा मृत्यू, एक बेपत्ता, ७ हजार ६६४ नागरिकांचे स्थलांतर,२२ ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Date:

जिल्ह्यात ५८ मंडलांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात ५ ते ७ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती पुराच्या पाण्यात बेपत्ता आहे. पूर आणि दरडींच्या धोक्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांमधून ७ हजार ६६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखेने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार, ७ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील ५८ महसूल मंडलांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मावळ तालुक्यात सर्वाधिक १६६.४ मिमी, मुळशीमध्ये ११८.२ मिमी, वेल्ह्यात १०९.६ मिमी, खेडमध्ये ९५.६ मिमी, हवेलीत ८९.६ मिमी, तर पुणे शहरात ८३.३ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

मावळमध्ये भिंत आणि दरड कोसळून जीवितहानी

मावळ तालुक्यातील पाटण गावात घरावर दरड कोसळल्यामुळे नंदू तिकोने, माऊली तिकोने आणि अनिता तिकोने यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी एनडीआरएफ, पीएमआरडीए, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि स्थानिक आपत्ती मित्रांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड परिसरातील भैरव चौकात संरक्षण भिंत कोसळल्याच्या घटनेत सुनील बेटा (वय ४३) यांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. खेड तालुक्यात दुचाकीसह ओढ्यात वाहून जाण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये समीर जाधव यांचा मृत्यू झाला असून आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.

खंडाळा येथील रस्टिक आयलंड सोसायटी परिसरात दरड कोसळल्याने पीएमआरडीएची पथके आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा शोधकार्य करीत आहे.

७,६६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

पूरग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ५ हजार ४१ नागरिक, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार १०५ नागरिक, लोणावळा परिसरातील सुमारे १ हजार ५० नागरिक, मावळ तालुक्यातील विविध गावांतील नागरिक आणि चाकण परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.

पूरग्रस्त नागरिकांना शाळा, अंगणवाड्या, समाजमंदिरे आणि अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

२२ ठिकाणी दरडी; अनेक रस्ते बंद

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात २२ ठिकाणी लहान-मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. किमान १६ ठिकाणी रस्ते बंद किंवा वाहतूक प्रभावित झाली असून मावळ, खेड, भोर, वेल्हा, हवेली, जुन्नर आणि मुळशी तालुक्यांतील अनेक रस्त्यांवर पाणी, दरडी आणि पूल खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

एनडीआरएफ आणि पीएमआरडीएची पथके कार्यरत

जिल्ह्यात मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके, पीएमआरडीएची चार पथके, ३०० स्थानिक आपत्ती मित्र आणि पाच स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.

खडकवासला धरण ८८.५२ टक्के

अहवालातील धरणसाठ्याच्या माहितीनुसार जाधववाडी आणि टाटा लोणावळा धरणे १०० टक्के, खडकवासला धरण ८८.५२ टक्के, पवना ५९.६० टक्के, मुळशी ५१.५ टक्के, पानशेत ४२.८७ टक्के, वरसगाव ३६.०५ टक्के, तर टेमघर धरण २३.८१ टक्के भरले आहे.

इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पूल, नदीपात्र आणि धोकादायक पर्यटनस्थळांकडे जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्त्यांचे झाले नाले..केंद्रीय मंत्री मोहोळ अधिकाऱ्यांना म्हणाले,आजवर तुम्ही काय केले.. ?

आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा पुणे (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि...

पन्नास वर्षांच्या संघर्षाला न्याय; महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक – डॉ. नीलम गोऱ्हे”

"शेतकरी महिलांच्या श्रमांना अखेर कायदेशीर मान्यता; सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे...

स्वारगेट मेट्रो स्थानकाला गळती:प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; महामेट्रोच्या हायटेक दाव्यांची पोलखोल

पुणे- पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल...