आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा
पुणे (प्रतिनिधी)
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केलीत, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पुणेकरांना समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको, अशा स्पष्ट शब्दांत मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यावर १२० पाणी साठणाऱ्या ठिकाणांपैकी ८५ ठिकाणांची कामे करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला. त्यावर कामे झालेल्या ८५ ठिकाणांपैकी किती ठिकाणी पाणी साचले नाही, असा प्रतिप्रश्न मोहोळ यांनी केला.
शहरात मान्सूनचे उशीरा आगमन झाले असले तरी गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे समोर आले होते. यात पार्श्वभूमीवर दिल्लीहून परतताच मोहोळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेते निलेश निकम, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह गटनेते, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे पुढच्या काही वर्षांचा विचार करुन हे प्रश्न सोडवावे लागतील. शिवाय पावसाचा ट्रेंड बदलला असून गेल्या काही वर्षात कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. त्यादृष्टीने काय तयारी केली? याचीही विचारणा केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना केली. आवश्यक त्या सर्व यंत्रणा पुरवण्यास आम्ही तयार असून तुम्ही पुणेकरांना कोणतीही अडचण येणार नाही, असे काम करा, असेही मोहोळ म्हणाले.
सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष सुरु करण्याचेही निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून नदीपात्रात विशेष लक्ष देवून फ्लड सेंसरची संख्या वाढण्यासंदर्भातही सूचना दिल्या आहेत. शिवाय वॅार्ड ऑफिसर यांनी स्थानिक पातळीवर नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याबाबतही सूचना दिल्या.
कामे केलेल्या किती ठिकाणी पाणी साचले नाही?
पुणे महापालिका हद्दीत एकूण १२० पाणी साठणारी ठिकाणे असून त्यापैकी ८५ ठिकाणांची कामे पूर्ण केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर ८५ पैकी किती ठिकाणी पाणी साठले नाही? असा सवाल मोहोळ यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती. त्यावर मोहोळ यांनी पुढच्या बैठकीत ८५ ठिकाणांचे पाऊस असतानाचे फोटो उपलब्ध करा, असे निर्देश दिले.
‘खड्डे बुजवण्यावर विशेष लक्ष द्या’
कमी वेळात अधिक पाऊस होत असल्याने शहरात खड्डे पडण्याची शक्यता असून खड्ड्यांची माहिती प्राप्त झाल्यावर लगेचच खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा, अशीही सूचना यावेळी मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. पुणेकरांना खड्ड्यांची माहिती महापालिकेला कळविण्यासाठी वॅाट्स अपनंबर उपलब्ध करुन देण्याबाबतही मोहोळ यांनी सूचित केली.

