पुणे: वाहतूक समस्या आजही सुटलेली तर नाहीच पण ती सोडविण्याचा प्रयत्न म्हणुनच कॉंग्रेस: राष्ट्रवादीने आणलेल्या मेट्रोचा टप्प्याटप्प्याचा खेळ अन इव्हेंटबाजी करत राजकीय संधीसाधूपणाचेच प्रदर्शन सुरू ठेवले आहे असा आरोप करून पंतप्रधानांच्या भाषणापेक्षा जनतेची सुविधा महत्त्वाची आहे ही भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका उद्घाटन करण्यात आले. स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही.
पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. “खरंतर कितीही पाऊस असला तरी पंतप्रधानांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करणे शक्य होते. मात्र इव्हेंटबाजीचा हव्यास पुणेकरांच्या हिताच्या आड आला. जिथे सभा होणार होती त्या मैदानावर चिखल असल्याने नरेंद्र मोदींची भाषण ठोकण्याची संधी हुकली म्हणून संपूर्ण उद्घाटन कार्यक्रमास रद्द करण्यात आला. हा समस्त पुणेकरांचा अपमान होता.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद प वर पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. जनतेचा हितासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फीत कापून या मेट्रो मार्गीकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, मोहनदादा जोशी, संजय मोरे, गजानन थरकुडे, संगीताताई तिवारी, आशाताई साने, उदय महाले, अजित दरेकर, किशोर कांबळे, दिलशाद आत्तार, रमीज सय्यद आणि मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.