सातारा:सातारा – पुणे – बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या तपासणीत सुमारे 95 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे या ठिकाणी क्रेटा कारमध्ये ही रोकड सापडली आहे. महामार्ग पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली असून ही रोकड नेमकी कुणाची? याचा तपास सातारा ग्रामिण पोलिस करत आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सातारा तालुका पोलिसांनी क्रेटा कारमधून (क्र. एम. एच. 48 सी. टी. 5239) 95 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच राजस्थानच्या मनोज गोयल व दिपू चव्हाण या 2 तरूणांना ताब्यात घेतले. या दोन्ही तरूणांची चौकशी केली असता त्यांनी ही रक्कम मुंबईहून कोल्हापूरला नेत असल्याचे सांगितले. कार मालकाचे नाव मुकेश कस्तुरचंद्र देवरा, (रा. गोकुळ प्लाझा, विरार वेस्ट , पालघर) आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर 27 ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी कारमधून 7 कोटी 53 लाख रूपये किंमतीचे 9 किलो सोने व 60 किलो चांदी जप्त केली होती. तत्पूर्वी, गुजरात पासिंगच्या बोलेरो गाडीतूनही 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळीच्या दोन दिवस आधी साताऱ्याजवळच्या आनेवाडी टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाने एका वाहनातून 34 लाखांचे सोने जप्त केले होते.
साताऱ्याजवळ क्रेटा कारमधून 95 लाखांची रोकड जप्त
उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे:-मनवेश सिंग सिद्धू
पुणे, दि. ५: विधानसभा निवडणूक निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवारांनी प्रचार करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक गोष्टीची रिसतर परवानगी घ्यावी, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. सिद्धू बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू म्हणाले, उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली, रोड-शो, प्रचार सभा इत्यादी बाबत एक खिडक कक्ष योजनेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४८ तास अगोदर परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी २४ तासांच्या आत देण्यात येईल. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणारे स्पिकर आणि वाहने याबाबतही परवानगी घेणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रचार प्रसारासाठी जे पोस्टर्स छपाई करून घेतले जातात त्यावर संबंधित मुद्रणालयाचे नाव, संपर्क क्रमांक छापणे, एकूण छपाई केलेल्या पोस्टर्सचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.
सोशल मिडीयाचा वापर प्रसिद्धीसाठी करताना प्रसिद्धीस दिलेला मजकुर प्रक्षोभक आढळल्यास उमेदवाराविरोधात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या जाहिरातीबाबतचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
0000
कर्तृत्व वाढवले तरच मराठी भाषा होईल मोठी – डॉ. सदानंद मोरे
२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आयोजन
पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. यानंतर “पुढे काय?” याचा विचार करताना मराठी माणसाचे कर्तुत्व वाढले पाहिजे; तरच भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नावर सरकारला जबाबदार धरणे चूक आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोक कर्तुत्ववान असतील तरच भाषा मोठी होते. जोपर्यंत मराठी भाषिक हा वैज्ञानिक होत नाही; तोपर्यंत मराठी भाषा ज्ञान भाषा होऊ शकत नाही, असे परखड मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सोमवारी (४ ऑक्टोबर) सायन्स पार्क येथे “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, भाषा तज्ज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवणी, स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचे आपणच मारेकरी आहोत. मराठी शाळा बंद पाडण्यामध्ये साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कारण आपणच आपली मुले मराठी शाळांमधून शिकवली नाहीत तर समाजापुढे काय आदर्श ठेवणार. कला, साहित्य, संगीत, चित्रपट या माध्यमांमध्ये भाषा टिकवण्याची मोठी शक्ती आहे. कवी गझलकार सुरेश भट, संगीतकार गायक सुधीर फडके, मंगेशकर कुटुंबीय यांचा मराठी भाषा टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. वारकरी संप्रदाय आणि ग्रामीण भाग येथे मराठी टिकून आहे. मराठी टिकून ठेवण्यासाठी आणि ज्ञानभाषा होण्यासाठी यापुढील काळात ‘मराठी पास नसेल, तिथे त्या व्यक्तीला राज्यात कोठेही नोकरी मिळणार नाही’, असा कायदा करण्याची वेळ आली आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर मराठीचे मारेकरी मंत्री आहेत. दिल्लीला खुश करण्यासाठी ते मातृभाषेतून बोलतानाच हिंदी आणि इंग्रजी मध्ये माध्यमांशी संवाद साधतात. दिल्लीश्वरांची कृपा करण्यासाठी हे लांगुलचालन केले जात आहे. भाषा जाती जातींमध्ये वाटली जाणार आहे का? असा मला प्रश्न पडतो. मातृभाषा जगण्याचे बळ देते. साहित्य, चित्रपट, माध्यम, संगीत उपासक यांच्यावर भाषा टिकविण्याची जबाबदारी आहे, असे रामदास फुटाणे यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपण यासाठी उत्सव साजरा केला. मराठी राजभाषा म्हणून एक दिवसाचा कार्यक्रम करणार आणि उर्वरित ३६४ दिवस आपण काय करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे. श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी असा लढा सध्या चालू आहे. मराठी ज्ञानभाषा खरोखरच आहे का, मराठी शिकून रोजगार मिळणार आहेत का, याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे. राज्यांनी इंग्रजीची कास धरली आहे. न्याय व्यवस्था, प्रशासनामध्ये इंग्रजीचा वापर केला जातो; ही खंत आहे. जोपर्यंत आपण मराठीतून संवाद साधण्यावर भर देत नाही; तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यातून पुढे मराठीसाठी संशोधन आणि विकास यावर भर दिला पाहिजे. भारतातील अन्य राज्यांमध्ये जेथे मराठी शाळा महाविद्यालय सुरू होती, ती तशीच चालू राहिली पाहिजे. अन्य राज्यांतील विद्यापीठांमध्ये मराठी अध्ययन केंद्र सुरू झाले पाहिजे. अन्य भाषेतील चांगले साहित्य आणि मराठी भाषेतील चांगल्या साहित्याचा अन्य भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे. यासाठी एखादी अनुवाद अकादमी उभारली पाहिजे, असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.
मराठी भाषकांनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अठरा हजार मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाले आहेत. आपल्याला आपल्या भाषेविषयी आस्था नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर प्रगती होते हे सिद्ध झाले आहे. परंतु याबाबत पालकांना आत्मविश्वास नाही. केवळ सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. मातृभाषा मराठी आणि शिक्षण इंग्रजी भाषेत यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. मुलांची जिज्ञासा वृत्ती रोखली जाते. अनेक ठिकाणी वाचनालय बंद झाली आहे. जेथे अर्थोद्योग मोठा ती भाषा मोठी होते; हे सप्रमाण सांगता येते. अमेरिकेत गुजराती भाषिकांची संख्या अधिक आहे. तेथे उद्योग व्यवसाय उभारण्यात गुजराती लोकांचा मोठा वाटा आहे. तेथे इंग्रजी बरोबरच गुजराती भाषा वापरली जाते. ‘पटेल्स मोटेल्स’ असे ही म्हटले जाते. तो विचार करता उद्योगांमध्ये मराठी माणूस मागे आहे. भाषिक वैभव मुलांपुढे ठेवण्यासाठी मराठी भाषेत संवाद, वाचन त्याचे महत्त्व समजून सांगणे यावर भर दिला पाहिजे. भाषेच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे, संजय सोनवणी यांनी सांगितले.
प्रारंभी प्रवीण तुपे यांनी स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या २६ वर्षांचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, स्थानिक कलाकार, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने स्वर सागर कार्य करत आहे, असे तुपे यांनी सांगितले.स्वागत बाबासाहेब काळे यांनी केले. सुत्रसंचलन सीमा गांधी यांनी तर परिसंवादाचे समन्वयन आणि आभार राजन लाखे यांनी मानले.
लोकसभेला दणका दिला म्हणून मराठीला अभिजात दर्जा – रामदास फुटाणे
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून दणका मिळाला म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अन्यथा आणखीन प्रतीक्षा करावी लागली असती. देहू – आळंदी ही मराठीची दोन विद्यापीठे आहेत. तर ज्ञानोबा माऊलींनी लिहिलेले ‘पसायदान’ वाचले की मराठी भाषा अभिजात आहे हे स्पष्ट होते. अन्य कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे रामदास फुटाणे म्हणाले. यावेळी त्यांनी खुमासदार शैलीत वात्रटिका सादर केली.
आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली ।
शेंबडी नातवंडे इंग्रजी बोलू लागली ।।
नातू नाचू लागला, नात नाचू लागली ।
अन रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली ।।
परिणाम असा झाला अजान मुळाखाली माती खचू लागली ।
आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली ।।
बालगंधर्व रंगमंदिर येथे मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम
पुणे, दि. ५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम कार्यक्रम राबविला. यावेळी कला व साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच रसिकांनी स्वाक्षरी करून ‘मी मतदान करणारच’ असा संकल्प करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहिम घेवून मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्यांनी सेल्फी पॉईंटवर सेल्फी देखील घेतला. यावेळी स्वीप पथकाचे नोडल अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने घरातील सर्व पात्र मतदार असलेले ताई, दादा, आई, बाबा, काका, काकी अशा सर्वांनी मतदान करावे, याविषयी कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
माधुरी मिसाळ चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने पर्वती मतदारसंघातून निवडून येतील – पंकजा मुंडे
माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची पर्वतीत पदयात्रा
पुणे
आमदार माधुरी मिसाळ या माझ्या विधिमंडळातील जुन्या सहकारी आहेत. त्यांचा विविध नागरी प्रश्नांसंदर्भात सखोल अभ्यास आहे. विविध विकासकामांचा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. प्रशासनावर त्यांचा चांगला अंकुश आहे. त्यांचा अनुभव आणि अभ्यासामुळे विधानसभेतील प्रतोद अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. पर्वती मतदारसंघात त्यांच्यामुळे मोठे विकास प्रकल्प उभे राहू शकले. राज्यातील शहरी मतदारसंघासाठी त्यांनी पर्वतीमध्ये केलेला विकास अनुकरणीय आहे ,त्यामुळेच माधुरीताई चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने पर्वती मतदारसंघातून विजयी होतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस आमदार पंकजा मुंडे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
आमदार माधुरी सतीश मिसाळ यांच्या प्रचारार्थ जनता वसाहत येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष धीरज घाटे, दीपक मिसाळ, श्रीकांत पुजारी, अनिता कदम, आनंद रिठे, संतोष कदम, राजू कदम, सुनील बिबवे, विश्वास ननावरे, विनया बहुलीकर, महेंद्र गावडे, दैविक विचारे, श्रुती नाझिरकर, महेश बाटले, अक्षय वायाळ, बुवागिरी जीवन माने, सुधीर कुरुमकर, सुजित सामदेकर, बंडू सकपाळ, विशाल डहाळे, अमर हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यामध्ये महायुतीसाठी पोषक वातावरण असून महायुतीमधील सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल. महायुतीतील सर्व पक्षात चांगल्या प्रकारे समन्वय असल्याने बंडखोरी देखील रोखण्यात आम्हाला यश आले आहे. पुणे जिल्ह्यात 21 पैकी 18 जागा महायुतीकडे असून विधानसभा निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पंकजाताई यांची तब्येत बरी नसतानाही आज त्या माझ्या पदयात्रा रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत माझ्या प्रचाराच्या शुभारंभ झाला असून मतदारसंघात विविध विकास कामे आतापर्यंत मार्गी लावली असल्याने मतदार पुन्हा एकदा मला विक्रमी मतांनी निवडणुकीत विजयी करतील.’
दिवाळीनिमित्त भरत नाट्य मंदिर आयोजित पहिल्या संगीत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन
संगीत रंगभूमीने रसिकांना आत्मानंद दिला : निर्मला गोगटे
पुणे : सुमारे 181 वर्षांची परंपरा लाभलेल्या संगीत रंगभूमीने रसिकांना आत्मानंद दिला. यातूनच संगीत कला लोकाभिमुख झाली आणि रंगभूमीला प्रतिष्ठा लाभली, असे प्रतिपादन संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेत्री, विदुषी निर्मला गोगटे यांनी केले. विष्णुदास भावे यांच्या कल्पक प्रयत्नांनी काही तरी नवल वर्तले अशी घटना घडली. या संगीत नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून विष्णुदास भावे यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सुमारे 130 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे पुणेकर रसिकांच्या आग्रहास्तव दिवाळीनिमित्त संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 5) रंगभूमीदिनाचे औचित्य साधून विदुषी निर्मला गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी गोगटे बोलत होत्या. लोकमान्य मल्टिपर्पज सोसाटीचे संस्थापक किरण ठाकूर, ज्येष्ठ अभिनेत्री ईला पवार, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. दि. 5 ते दि. 7 नोव्हेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विद्याधर गोखले लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग झाला.
बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र आणि गुरुवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकांचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
भरत नाट्य मंदिराच्या कार्याचे कौतुक करताना गोगटे म्हणाल्या, भरत नाट्य मंदिराने अखंडितपणे रंगभूमीची सेवा केली आहे. येथील सभागृहाची रचना अतिशय उत्तम असल्याने येथे नाट्यप्रयोग हमखास रंगतो. या रंगभूमीला भरतमुनींचा आशीर्वाद लाभला आहे. पुणेकर रसिकांनी संगीत नाट्य महोत्सवाचा आग्रह धरला ही अतिशय आनंददायी आणि कौतुकास्पद बाब आहे.
किरण ठाकूर म्हणाले, संगीत नाट्य परंपरा जपली गेली पाहिजे. मराठी माणूस नाट्यवेडा आहे. मराठी रंगभूमीवरती एकापेक्षा एक सरस नाट्यकर्मी घडत आहेत. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी आपल्या बरोबर नाटक घेऊन गेला आहे. आजच्या काळात रसिक पुन्हा एकदा संगीत नाट्य रंगभूमीकडे आकर्षित होण्याची गरज आहे. भरत नाट्य मंदिराच्या कार्याचे कौतुक करून किरण ठाकूर यांनी भरत नाट्य मंदिरास पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली आणि मराठी संगीत रंगभूमीला वैभावाचे दिवस यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
ईला पवार यांनी रंगभूमीदिनानिमित्त कलाकार आणि नाट्य रसिकांना शुभेच्छा दिल्या.
अभय जबडे यांनी प्रास्ताविकात संगीत नाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. मान्यवरांचा सत्कार पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते झाला.
लंडन इथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान जागतिक पर्यटन बाजार (WTM) मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा सहभाग
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2024
लंडन मधील ‘एक्सेल लंडन’ इथे 5 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान भरणाऱ्या जागतिक पर्यटन बाजारात (WTM) भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय सहभागी होत आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटनमधून येणारे पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय मूळ असलेले 19 लाख नागरिक आहेत. पर्यटन मंत्रालयाने या पर्यटन बाजारासाठी 50 जणांचे पथक पाठवले असून त्या पथकात राज्य सरकारांचे, पर्यटन संस्थांचे, विमानकंपन्यांचे, हॉटेल मालकांचे प्रतिनिधी समाविष्ट असून भारताची सांस्कृतिक विविधता, पर्यटनाचे अनेक प्रकार व थक्क करून टाकणारे एकमेवाद्वितीय अनुभवांचे भांडार या जागतिक व्यासपीठावर सादर करण्याची जबाबदारी त्या पथकावर आहे. जागतिक स्तरावर एक दर्जेदार पर्यटन अनुभव देणारा देश म्हणून भारताचे स्थान बळकट करणे व त्यायोगे भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. WTM 2024 मधील इंडिया पॅव्हिलिअन मध्ये भारताची समृद्ध व विविधरंगी सांस्कृतिक परंपरा व भाषावैविध्य प्रदर्शित केले जाईल, ज्यातून आध्यात्मिक आणि आरोग्य पर्यटन, विवाहसमारंभ किंवा साहस पर्यटन, पर्यावरण व खाद्यपर्यटन, इत्यादी विविधरंगी अनुभव देणाऱ्या पर्यटनाची माहिती सादर केली जाईल. यावर्षी इंडिया पॅव्हिलिअनचा प्रमुख भर विवाह पर्यटन, MICE पर्यटन व महाकुंभ मेळा यावर राहणार आहे. भारतीय विवाहसोहळ्याची झलक दाखवणारा एक मंडपही इंडिया पॅव्हिलिअनमध्ये उभारण्यात आला आहे.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाखेरीज अनेक राज्य पर्यटन विभाग, पर्यटन व्यवस्थापन संस्था, विमान कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यादेखील या WTM 2024 मधील इंडिया पॅव्हिलिअनमध्ये सहभागी होणार आहेत.
‘आबा’,तुम्हीच निवडून येणार :’पर्वती’ मधील नागरिकांनी दिला आबांना आवाज!
- घरोघरी जाऊन आबा बागुल यांनी घेतली माता भगिनींची भेट
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री आबा बागुल यांनी मंगळवारी पर्वती मतदारसंघातील माता भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या.
यावेळी सर्वांनी आबा बागुल यांना विजयी करण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.’ आबा तुम्ही, ‘पर्वती’चे हिरा आहात, आणि तुम्हाला निवडणूक चिन्हही हिरा मिळाले आहे. हा शुभसंकेत असल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी आबा बागुल म्हणाले की, नागरिकांच्या या प्रतिसादामुळे विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, नागरिकांच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. आता एकच निर्धार विजयाचा आहे, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आबा बागुल यांनी मंगळवारी सकाळी प्रथम मार्केट यार्ड येथे फुल मार्केट, तरकारी मार्केट येथे भेट दिली. येत्या सहा महिन्यात येथील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर मार्केट मध्ये आलेल्या शेतकऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसाठी लगेज काउंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी केवळ गाळेधारकच नव्हे तर भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आबांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मार्केटयार्ड परिसराचा विकास तुमच्यामार्फत व्हावा अशी इच्छाही यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मार्केटयार्ड भेटीनंतर बागुल यांनी संभाजी नगर, चव्हाण नगर, शंकर महाराज वसाहत येथे घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. आबा,आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहोत, आपण निश्चिंत रहा असा विश्वासही नागरिकांनी दिला. आबांची उमेदवारी हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे, आबा हे हिरा आहेत व ते विधानसभेत विजयी होऊनच जाणार असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
दरम्यान या भेटीगाठीनंतर बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांची व्यक्तिगत भेट घेतली. त्यावेळी शेकडो नागरिकांनीही गर्दी केली होती. आबा बागुल यांना विजयाच्या शुभेच्छा देत, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही यावेळी नागरिकांनी दिली.
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी आयपीएस संजय वर्मा
मुंबई-महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या पंधरवड्यापूर्वी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते.पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर, ईसीआयने राज्य सरकारकडे महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी वर्मा एक होते. या शर्यतीत अन्य दोन वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार सिंघल आणि त्यांचा बॅचमेट रितेश कुमार यांचा सहभाग होता.
राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 15 अधिकारी हे मुबंईतील होते. पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील 300 हून अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता आयपीएस संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक पद हे कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च श्रेणीचे आयपीएस अधिकारी असतात. पोलिस दलाचे प्रशासन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. संजय वर्मा यांना जवळपास 30 वर्षांचा पोलिस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचा तपास आणि तिथून पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी राज्यात जवळपास दोन हजारांहून अधिक तज्ञांचा चमू तयार केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा त्यांचे कौतुकही करण्यात आले.
‘मध्य वस्तीत फिरा 10 रुपयांत’’ पुण्यदशम्’ उतरली पुणेकरांच्या पसंतीलाहेमंत रासने यांचा दावा
पुणे-शहरातील वाहतुकीची कोंडीआणि प्रदूषण कमी करण्यासाठी मध्य वस्तीतील अरुंद रस्त्यांवर दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची सुविधा देणारी पुण्यदशम् बससेवा पुणेकरांच्या पसंतीला उतरली असून, तीन वर्षांत एक कोटीहून अधिक नागरिकांनी प्रवास केला असल्याचा दावा भाजप महायुतीचे कसबा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी केला.
रासने यांच्या प्रचारार्थ शनिवार आणि नारायण पेठेत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, गायत्री खडके, राजेंद्र काकडे, उदय लेले, सुनील रसाळ, सुनील रासने, महेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने म्हणाले, “मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यदशम योजनेसाठी 50 मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना पुणेकरांसाठी अल्पावधीतच यशस्वी ठरली. शहरातील अरुंद रस्त्यांवर मध्यम आकाराच्या बसेसने प्रवाशांना सुरक्षित आणि सक्षम पर्याय दिला. या बसेसची रंगसंगती व रुट बोर्ड वेगळा असल्याने प्रवाशांना समजण्यास सोपे जाते. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि वेळेची बचत करणारी ही योजना आहे.”
रासने पुढे म्हणाले, “या योजनेतील बसगाड्या सीएनजीवर चालणाऱ्या असल्याने पर्यावरणपूरक आहेत. पहिल्या टप्प्यात कसबा मतदारसंघातील सर्व मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पूलगेट या वर्तुळाकार मार्गावर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. पुण्यदशमच्या माध्यमातून खासगी वाहनांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे प्रवाशांना वळविण्याचा प्रयत्न आहे. पुढील काळात आणखी 300 मिडी बसेस घेण्याचे नियोजन आहे.
आगामी काळात पीएमपीएमएलची सेवा प्रवासीस्नेही होण्याच्या दृष्टीने असे अभिनव उपक्रम राबविणार आहोत.”
इफ्फी साजरी करणार भारतीय चित्रपटाच्या चार मानबिंदूंची शताब्दी
राज कपूर, तपन सिन्हा, अक्कीनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचा करिष्मा त्यांच्या पुनरुज्जीवित कलाकृतींच्या माध्यमातून या वर्षी पुन्हा अनुभवता येणार
नवी दिल्ली- 5 नोव्हेंबर 2024
55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फी यंदा भारतीय चित्रपटाच्या अनेक पैलूंना आकार देणाऱ्या चार व्यक्तिमत्वांना आदरांजली अर्पण करणार आहे. राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या संपन्न वारशाचे स्मरण त्यांनी चित्रपट जगतासाठी दिलेले योगदान चित्रपट प्रदर्शन, प्रत्यक्ष चर्चा, परिसंवाद आदी विविध कार्यक्रमांमार्फत उपस्थितांसमोर मांडण्यात येणार आहे.
एनएफडीसी-एनएफएआयकडून अभिजात कलाकृतींचे पुनरुज्जीवन
भारतीय चित्रपट जगतातील या चार मानबिंदूंना विशेष आदरांजली म्हणून इफ्फी त्यांच्या एनएफडीसी-एनएफएआयने पुनरुज्जीवित केलेल्या काही अभिजात कलाकृती प्रेक्षकांना अनुभवता याव्यात म्हणून घेऊन येत आहे. बारकाव्यांकडे लक्ष पुरवून निर्माण केलेल्या या चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींमुळे प्रेक्षकांना अतिशय भव्य आणि कलासंपन्न अनुभव घेणे शक्य होईल.
राज कपूर यांचा ‘आवारा’ हा चित्रपट डिजिटली पुनरुज्जीवित केला असून कपूर यांच्या चित्रपटातील सामान्य माणसाच्या जीवनप्रवासातील जिव्हाळा, विनोद आणि सहानुभूती यांची अनुभूती महोत्सवात विशेष ठरणार आहे. हे पुनरुज्जीवन म्हणजे राज कपूर यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रात दिलेले असाधारण योगदान, सामाजिक विषयांची अतिशय बारकाईने आणि कळकळीने मांडणी करण्याची त्यांची बांधिलकी यांना सार्थ अभिवादन आहे.
तपन सिन्हा दिग्दर्शित ‘हार्मोनियम’ हा कालातीत चित्रपट, क्लिष्ट विषय कथाकथनातून मांडण्याच्या त्यांच्या कौशल्याचे प्रेक्षकांना दर्शन घडवेल. लक्षवेधी संकल्पना आणि सखोल कथन असलेला ‘हार्मोनियम’, सिन्हा यांचा कलात्मक वारसा आणि चित्रपट साकारण्याच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.
चित्रपटाच्या इतिहासात एएनआर यांचा ठसा उमटवलेल्या ‘देवदासू’ चित्रपटाची पुनरुज्जीवित प्रत इफ्फीमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. एएनआर यांनी पडद्यावर साकारलेला देवदास समकालीन प्रेक्षकांना भारतीय सांस्कृतिक ओळख असलेल्या या भावनिक व्यक्तिमत्वाशी जोडून घेण्याची संधी देईल.
‘हम दोनो’ या आणखी एका कालातीत चित्रपटाच्या वर्धित ऑडिओ-व्हिज्युअल प्रतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. मोहम्मद रफी यांनी अमर केलेली गीते असलेल्या या चित्रपटाच्या पुनरुज्जीवित प्रतीचे प्रदर्शन रफी यांचे भारतीय संगीत आणि चित्रपटातील अपवादात्मक योगदान साजरे करते, त्यांच्या आवाजाची जादू सर्व पिढ्यांसाठी पुनरुज्जीवित झाली आहे.
मानबिंदूना अभिवादन
कालातीत चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींच्या प्रदर्शनासह इफ्फीमध्ये यंदा या चार व्यक्तिमत्वांच्या वारशाचाही गौरव होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात या चौघांच्या जीवनाचा, यशाचा गौरव करणारा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाला चौघांच्या चित्रपट जगतातील प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाची जोड दिली जाणार आहे.
पॅनेल चर्चा आणि प्रत्यक्ष संवाद सत्रे : सन्माननीय अतिथी आणि चार दिग्गजांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सखोल चर्चा आणि प्रत्यक्ष संवादाची सत्रे यामुळे त्यांच्या जीवनाविषयीचे वेगवेगळे पैलू समोर येतील.या संभाषणांमुळे चित्रपट उद्योगावर त्यांच्या कामाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणाम जाणून घेता येतील.
माय स्टॅम्प चे अनावरण : इफ्फी या चार दिग्गजांच्या सन्मानार्थ विशेष सन्मानभाव म्हणून त्यांना समर्पित एका अनोख्या माय स्टॅम्पचे प्रकाशन करेल. माय स्टॅम्प हे या चार दिग्गजांनी भारतीय संस्कृती आणि चित्रपटांवर उमटवलेल्या ठशाचे प्रतीक आहे.
द्विभाषिक माहितीपत्रके: प्रत्येक दिग्गजाच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी विशेष द्विभाषिक माहितीपत्रके जी संग्राह्य स्मृतीचिन्हे म्हणूनही काम करतील. ही माहितीपत्रके उपस्थितांना चित्रपट क्षेत्रातील या महान व्यक्तींच्या वारशाचे महत्त्व कथन करतील आणि त्यांची प्रशंसा मिळवतील.
गाण्यांचा कारवाँ: राज कपूर आणि मोहम्मद रफी यांच्याशी संबंधित 150 गाणी आणि तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव (ANR) यांच्याशी संबंधित 75 गाणी असलेला संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांना या कलाकारांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची ओळख करून देईल. भारतीय चित्रपटांच्या संगीतावर त्यांचा प्रभाव अधोरेखित करेल.
कलाकृती प्रदर्शन : राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या जीवनातील दुर्मिळ संस्मरणीय वस्तू, छायाचित्रे आणि कलाकृती असलेले प्रदर्शन प्रेक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा परिचय करून देईल.
संकल्पनेवर आधारित कार्यक्रम : प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला समर्पित केलेल्या दिवशी, संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे नियोजन केले गेले आहे . यामध्ये इमर्सिव ॲक्टिव्हिटी, डिजिटल डिस्प्ले, आकर्षक प्रश्नमंजुषा इत्यादींचा समावेश असेल.प्रेक्षकांना या दिग्गजांच्या चिरंतन वारशाची जाणीव करून देणे हा यामागचा हेतू आहे.
वालुकाशिल्पकला प्रदर्शन: शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून, कला अकादमीमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्याद्वारे दिग्गज कलाकारांना अभिवादन म्हणून वालुकामय कलाकृती साकारण्यात येणार आहे.
एक चिरंतन अभिवादन
कला, इतिहास आणि परस्परसंवाद यांच्या एकत्रिकरणाद्वारे राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचा वारसा आणि चित्रपट जगतावर अनंत काळापर्यंत राहणारा प्रभाव यांच्या अनुभूतीच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचा इफ्फीचा प्रयत्न राहील.
इफ्फी म्हणजे केवळ चित्रपटांचे प्रदर्शन आणि चित्रपटप्रेमींचे एकत्र येणे नव्हे! तर सार स्वरूपात, जगभरातील प्रेक्षक आणि कलाकारांना त्यांच्या सदाबहार वारशाने सतत प्रेरणा देणाऱ्या अनेक चित्रतपस्वींच्या यशाचा आनंद साजरा करून आणि त्यांचा सन्मान करून प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे.
पर्वती मतदार संघाच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडीचाच भक्कम पर्याय
पुणे : पुणे शहरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार पडेल. पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व मित्र पक्ष च्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यावेळी धोबीपछाड देणार असल्याचा दावा मविआ कडून केला जात आहे. पर्वती विधानसभा निवडणुकीत अश्विनी नितीन कदम याच विजयी होतील असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाविकास आघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवारी जाहीर होताच अश्विनी नितीन कदम यांनी प्रभागनिहाय बैठकांचा धडाका लावला असुन पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद सुरू केला आहे. यावेळी अश्विनी कदम यांचे संवाद साधला असता ,” पक्षाने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखवून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि प्रभागनिहाय बैठकामध्ये नागरिकांचा दिलेला प्रतिसाद, त्यातील महिला आणि तरुणांची उपस्थिती आपल्या विक्रमी विजयाचे धोतक आहे. महाविकास आघाडी व मित्रपक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकजूट ही पर्वती विधानसभा मतदारसंघाला विकासात्मक दिशा देण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. पर्वती मतदार संघाच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडीचाच भक्कम पर्याय आहे. पर्वतीकर नागरिक पंधरा वर्षातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला विक्रमी मताने विजय करण्याचा पर्वती करणे ध्यास घेतला आहे. अशी भावना महाविकास आघाडी व मित्र पक्ष उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केली.पर्वतीच्या प्रगतीसाठी नगरसेवक म्हणून रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रोजगाराच्या संधी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या विकासकामांवरही प्रकाश टाकला.
३ दिवस ‘ड्रायडे’..महिनाभरात अवैध दारूधंद्याचे ९२३ गुन्हे दाखल, ८४३ जणांना अटक..
पुणे-महिनाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूधंद्याचे ९२३ गुन्हे दाखल करून ८४३ जणांना अटक केली आहे. अशी माहिती येथे राज्य उत्पाफान शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली ते म्हणाले ,पुणे जिल्हयात दि. १८/११/२०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजल्यापसून ते दि. २०/११/२०२४ मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत व दि.२३/११/२०२४ मतमोजणीच्या दिवशी जिल्हास्तरीय सर्व विधानसभा मतदान संघांचे अधिकृत निकाल घोषित होईपर्यंत कोरडा दिवस (ड्रायडे) घोषित करण्यात आलेला असून याकाळात जिल्हयातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, तसेच सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क प्रसाद सुर्वे, यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार दिनांक. ०१ ऑक्टोबर २०२४ पासुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विविध पथके तयार केली आहेत. या पथकांकडून जिल्हयातील सर्व हातभट्टी निर्मिती वाहतुक विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दिनांक. ०१/१०/२०२४ पासुन आतापर्यंत जिल्हयात एकूण ९२३ गुन्हे नोंद झाले असुन ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये ९६ वाहनासह एकुण ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारां विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये एकुण ५० प्रस्ताव संबंधित दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून त्यापैकी सदर इसमांकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यात येत असून आतापर्यंत १२ प्रकरणात रक्कम रुपये ९,८०,०००/- एवढया रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत.
या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असुन या गुन्हयांमध्ये रु. ३,६४,१७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
जिल्हयात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टींने एकुण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी अवैध मद्याची वाहतुक केली जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मद्य विक्रीच्या अनुज्ञप्तींचे नियमित निरीक्षण करण्यात येत असुन अनुज्ञप्त्या विहीत वेळेत चालू व बंद होतील तसेच अल्पवयीन ग्राहकांना मद्यविक्री होणार नाही याची दक्षता
घेण्यात येत आहे. तसेच निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे कामकाज करण्यात येत आहे. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांना अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतुक किंवा मद्यवाटप इ. संबंधी माहिती/तक्रार दयावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक. ०२० २६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस उद्या विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार,संध्याकाळी मुंबईतील BKC मध्ये मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’
नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलन’
शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत BKC मधील सभेत मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी काँग्रेसच्या ‘गॅरंटी’ जाहीर करणार.
मुंबई, दि. ५ नोव्हेंबर २०२४
काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, BKC मधील सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहे. एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे तो मविआ परत आणेल. तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल. काँग्रेसने कर्नाटक विधानसभेपासून गॅरंटी जाहीर केल्या असून ज्या जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.
कौन बनेगा करोडपती 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी नैनीताल येथील बोर्डिंगच्या दिवसांची आठवण काढताना बिबट्याशी झालेल्या थरारक चकमकीचा किस्सा सांगितला
या आठवड्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 या लोकप्रिय ज्ञान आधारित गेम शोमध्ये 8 ते 15 वयोगटातील प्रतिभावान मुले ‘KBC ज्युनियर’ अंतर्गत हॉट सीटवर दिसतील. त्यापैकी एक स्पर्धक आहे दिल्लीचा भाविक गर्ग. पाचवीत शिकणारा हा विद्यार्थी परिपक्व दिसतो आणि त्याला भारतीय इतिहासाविषयी जाणून घेण्यात रुची आहे.
अमिताभ बच्चन या छोट्या भाविकला म्हणतात, “माझ्या कम्प्युटर खूप हुशार आहे. त्याने मला सांगितले आहे की तू एक पुस्तक लिहिले आहेस.” त्यावर भाविकने खुलासा केला की अजून त्याचे पुस्तकाचे लिखाण सुरू आहे आणि त्या पुस्तकाचे नाव आहे ‘हिस्टरी ऑफ इंडिया’. तो पुढे म्हणाला की, त्याने या पुस्तकाची 86 पाने लिहून पूर्ण केली आहेत. ते प्रकाशित करून त्याची एक प्रत श्री. बच्चन यांना देण्याचे त्याने ठरवले आहे. यावर, श्री. बच्चन यांनी भाविकला वचन दिले की, भाविकने त्यांना इतके प्रभावित केले आहे की, ते भाविकच्या पुस्तकाचे छायाचित्र त्यावर स्वाक्षरी करून आपल्या सोशल मीडियावर नक्की पोस्ट करतील.
भाविकशी बोलता बोलता बिग बी आपल्या भूतकाळातील आठवणींत रमले. त्याने नैनीताल येथील आपले शाळेचे दिवस आठवले. बोर्डिंग स्कूलमधला रोमांच त्यांना आठवला. अज्ञाताच्या थरारासह अंधारात बिबट्या असल्याच्या शक्यतेने त्यांना जी भीती वाटली होती तो किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले, “एक दिवस एक माणूस धावतपळत आला आणि त्याने सांगितले की एक बिबट्या आला आहे. जमावात घाबरगुंडी उडाली. काही लोक भीतीने जागच्या जागी गोठले, तर काहींनी त्या बिबट्याचा सामना करण्यासाठी हॉकी स्टिक, टेनिस रॅकेट वगैरे जे हातात आले ते घेतले. त्यांनी झुडुपांच्या मागे शोध घेतला तेव्हा त्यांना बिबट्याची शेपूट दिसली आणि ते गर्भगळित झाले. सगळेजण सैरावैरा धावत आपल्या शाळेत परतले. त्यांच्यात एक मुलगा होता, जो त्याच्या आरोग्य समस्येमुळे जरा बाजूला बसायचा आणि सगळ्यांच्यात क्वचितच खेळायचा कारण त्याला खेळायला मना केले होते. पण त्यालाही बिबट्याला बघण्याची उत्सुकता वाटली. माझा लहान भाऊ, जो त्याच शाळेत शिकत होता, तो हे बघून थक्क झाला की हा मुलगा जो एरवी इतका शांत बसलेला असतो तो आज सगळ्यांपेक्षा जलद धावतो आहे. माझ्या भावाने सांगितले की, त्याने त्याच्या जवळून अत्यंत वेगाने एक आवाज जाताना ऐकला तेव्हा त्याला वाटले की तो बिबट्याच असावा पण पाहिले तर तो मुलगा वेगाने धावत होता! स्वतःचे आरोग्य ठीक नसतानाही, तेथून निसटण्याच्या उर्मीने तो इतका जलद धावत होता की ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. आमच्या शाळेत असे बरेच काही व्हायचे!” असा किस्सा सांगून बिग बी दिलखुलास हसले.
