२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आयोजन
पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. यानंतर “पुढे काय?” याचा विचार करताना मराठी माणसाचे कर्तुत्व वाढले पाहिजे; तरच भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नावर सरकारला जबाबदार धरणे चूक आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोक कर्तुत्ववान असतील तरच भाषा मोठी होते. जोपर्यंत मराठी भाषिक हा वैज्ञानिक होत नाही; तोपर्यंत मराठी भाषा ज्ञान भाषा होऊ शकत नाही, असे परखड मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सोमवारी (४ ऑक्टोबर) सायन्स पार्क येथे “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, भाषा तज्ज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवणी, स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचे आपणच मारेकरी आहोत. मराठी शाळा बंद पाडण्यामध्ये साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कारण आपणच आपली मुले मराठी शाळांमधून शिकवली नाहीत तर समाजापुढे काय आदर्श ठेवणार. कला, साहित्य, संगीत, चित्रपट या माध्यमांमध्ये भाषा टिकवण्याची मोठी शक्ती आहे. कवी गझलकार सुरेश भट, संगीतकार गायक सुधीर फडके, मंगेशकर कुटुंबीय यांचा मराठी भाषा टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. वारकरी संप्रदाय आणि ग्रामीण भाग येथे मराठी टिकून आहे. मराठी टिकून ठेवण्यासाठी आणि ज्ञानभाषा होण्यासाठी यापुढील काळात ‘मराठी पास नसेल, तिथे त्या व्यक्तीला राज्यात कोठेही नोकरी मिळणार नाही’, असा कायदा करण्याची वेळ आली आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर मराठीचे मारेकरी मंत्री आहेत. दिल्लीला खुश करण्यासाठी ते मातृभाषेतून बोलतानाच हिंदी आणि इंग्रजी मध्ये माध्यमांशी संवाद साधतात. दिल्लीश्वरांची कृपा करण्यासाठी हे लांगुलचालन केले जात आहे. भाषा जाती जातींमध्ये वाटली जाणार आहे का? असा मला प्रश्न पडतो. मातृभाषा जगण्याचे बळ देते. साहित्य, चित्रपट, माध्यम, संगीत उपासक यांच्यावर भाषा टिकविण्याची जबाबदारी आहे, असे रामदास फुटाणे यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपण यासाठी उत्सव साजरा केला. मराठी राजभाषा म्हणून एक दिवसाचा कार्यक्रम करणार आणि उर्वरित ३६४ दिवस आपण काय करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे. श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी असा लढा सध्या चालू आहे. मराठी ज्ञानभाषा खरोखरच आहे का, मराठी शिकून रोजगार मिळणार आहेत का, याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे. राज्यांनी इंग्रजीची कास धरली आहे. न्याय व्यवस्था, प्रशासनामध्ये इंग्रजीचा वापर केला जातो; ही खंत आहे. जोपर्यंत आपण मराठीतून संवाद साधण्यावर भर देत नाही; तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यातून पुढे मराठीसाठी संशोधन आणि विकास यावर भर दिला पाहिजे. भारतातील अन्य राज्यांमध्ये जेथे मराठी शाळा महाविद्यालय सुरू होती, ती तशीच चालू राहिली पाहिजे. अन्य राज्यांतील विद्यापीठांमध्ये मराठी अध्ययन केंद्र सुरू झाले पाहिजे. अन्य भाषेतील चांगले साहित्य आणि मराठी भाषेतील चांगल्या साहित्याचा अन्य भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे. यासाठी एखादी अनुवाद अकादमी उभारली पाहिजे, असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.
मराठी भाषकांनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अठरा हजार मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाले आहेत. आपल्याला आपल्या भाषेविषयी आस्था नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर प्रगती होते हे सिद्ध झाले आहे. परंतु याबाबत पालकांना आत्मविश्वास नाही. केवळ सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. मातृभाषा मराठी आणि शिक्षण इंग्रजी भाषेत यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. मुलांची जिज्ञासा वृत्ती रोखली जाते. अनेक ठिकाणी वाचनालय बंद झाली आहे. जेथे अर्थोद्योग मोठा ती भाषा मोठी होते; हे सप्रमाण सांगता येते. अमेरिकेत गुजराती भाषिकांची संख्या अधिक आहे. तेथे उद्योग व्यवसाय उभारण्यात गुजराती लोकांचा मोठा वाटा आहे. तेथे इंग्रजी बरोबरच गुजराती भाषा वापरली जाते. ‘पटेल्स मोटेल्स’ असे ही म्हटले जाते. तो विचार करता उद्योगांमध्ये मराठी माणूस मागे आहे. भाषिक वैभव मुलांपुढे ठेवण्यासाठी मराठी भाषेत संवाद, वाचन त्याचे महत्त्व समजून सांगणे यावर भर दिला पाहिजे. भाषेच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे, संजय सोनवणी यांनी सांगितले.
प्रारंभी प्रवीण तुपे यांनी स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या २६ वर्षांचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, स्थानिक कलाकार, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने स्वर सागर कार्य करत आहे, असे तुपे यांनी सांगितले.स्वागत बाबासाहेब काळे यांनी केले. सुत्रसंचलन सीमा गांधी यांनी तर परिसंवादाचे समन्वयन आणि आभार राजन लाखे यांनी मानले.
लोकसभेला दणका दिला म्हणून मराठीला अभिजात दर्जा – रामदास फुटाणे
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून दणका मिळाला म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अन्यथा आणखीन प्रतीक्षा करावी लागली असती. देहू – आळंदी ही मराठीची दोन विद्यापीठे आहेत. तर ज्ञानोबा माऊलींनी लिहिलेले ‘पसायदान’ वाचले की मराठी भाषा अभिजात आहे हे स्पष्ट होते. अन्य कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे रामदास फुटाणे म्हणाले. यावेळी त्यांनी खुमासदार शैलीत वात्रटिका सादर केली.
आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली ।
शेंबडी नातवंडे इंग्रजी बोलू लागली ।।
नातू नाचू लागला, नात नाचू लागली ।
अन रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली ।।
परिणाम असा झाला अजान मुळाखाली माती खचू लागली ।