राज कपूर, तपन सिन्हा, अक्कीनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचा करिष्मा त्यांच्या पुनरुज्जीवित कलाकृतींच्या माध्यमातून या वर्षी पुन्हा अनुभवता येणार
नवी दिल्ली- 5 नोव्हेंबर 2024
55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फी यंदा भारतीय चित्रपटाच्या अनेक पैलूंना आकार देणाऱ्या चार व्यक्तिमत्वांना आदरांजली अर्पण करणार आहे. राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या संपन्न वारशाचे स्मरण त्यांनी चित्रपट जगतासाठी दिलेले योगदान चित्रपट प्रदर्शन, प्रत्यक्ष चर्चा, परिसंवाद आदी विविध कार्यक्रमांमार्फत उपस्थितांसमोर मांडण्यात येणार आहे.
एनएफडीसी-एनएफएआयकडून अभिजात कलाकृतींचे पुनरुज्जीवन
भारतीय चित्रपट जगतातील या चार मानबिंदूंना विशेष आदरांजली म्हणून इफ्फी त्यांच्या एनएफडीसी-एनएफएआयने पुनरुज्जीवित केलेल्या काही अभिजात कलाकृती प्रेक्षकांना अनुभवता याव्यात म्हणून घेऊन येत आहे. बारकाव्यांकडे लक्ष पुरवून निर्माण केलेल्या या चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींमुळे प्रेक्षकांना अतिशय भव्य आणि कलासंपन्न अनुभव घेणे शक्य होईल.
राज कपूर यांचा ‘आवारा’ हा चित्रपट डिजिटली पुनरुज्जीवित केला असून कपूर यांच्या चित्रपटातील सामान्य माणसाच्या जीवनप्रवासातील जिव्हाळा, विनोद आणि सहानुभूती यांची अनुभूती महोत्सवात विशेष ठरणार आहे. हे पुनरुज्जीवन म्हणजे राज कपूर यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रात दिलेले असाधारण योगदान, सामाजिक विषयांची अतिशय बारकाईने आणि कळकळीने मांडणी करण्याची त्यांची बांधिलकी यांना सार्थ अभिवादन आहे.
तपन सिन्हा दिग्दर्शित ‘हार्मोनियम’ हा कालातीत चित्रपट, क्लिष्ट विषय कथाकथनातून मांडण्याच्या त्यांच्या कौशल्याचे प्रेक्षकांना दर्शन घडवेल. लक्षवेधी संकल्पना आणि सखोल कथन असलेला ‘हार्मोनियम’, सिन्हा यांचा कलात्मक वारसा आणि चित्रपट साकारण्याच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.
चित्रपटाच्या इतिहासात एएनआर यांचा ठसा उमटवलेल्या ‘देवदासू’ चित्रपटाची पुनरुज्जीवित प्रत इफ्फीमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. एएनआर यांनी पडद्यावर साकारलेला देवदास समकालीन प्रेक्षकांना भारतीय सांस्कृतिक ओळख असलेल्या या भावनिक व्यक्तिमत्वाशी जोडून घेण्याची संधी देईल.
‘हम दोनो’ या आणखी एका कालातीत चित्रपटाच्या वर्धित ऑडिओ-व्हिज्युअल प्रतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. मोहम्मद रफी यांनी अमर केलेली गीते असलेल्या या चित्रपटाच्या पुनरुज्जीवित प्रतीचे प्रदर्शन रफी यांचे भारतीय संगीत आणि चित्रपटातील अपवादात्मक योगदान साजरे करते, त्यांच्या आवाजाची जादू सर्व पिढ्यांसाठी पुनरुज्जीवित झाली आहे.
मानबिंदूना अभिवादन
कालातीत चित्रपटांच्या पुनरुज्जीवित प्रतींच्या प्रदर्शनासह इफ्फीमध्ये यंदा या चार व्यक्तिमत्वांच्या वारशाचाही गौरव होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात या चौघांच्या जीवनाचा, यशाचा गौरव करणारा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाला चौघांच्या चित्रपट जगतातील प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाची जोड दिली जाणार आहे.
पॅनेल चर्चा आणि प्रत्यक्ष संवाद सत्रे : सन्माननीय अतिथी आणि चार दिग्गजांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सखोल चर्चा आणि प्रत्यक्ष संवादाची सत्रे यामुळे त्यांच्या जीवनाविषयीचे वेगवेगळे पैलू समोर येतील.या संभाषणांमुळे चित्रपट उद्योगावर त्यांच्या कामाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक परिणाम जाणून घेता येतील.
माय स्टॅम्प चे अनावरण : इफ्फी या चार दिग्गजांच्या सन्मानार्थ विशेष सन्मानभाव म्हणून त्यांना समर्पित एका अनोख्या माय स्टॅम्पचे प्रकाशन करेल. माय स्टॅम्प हे या चार दिग्गजांनी भारतीय संस्कृती आणि चित्रपटांवर उमटवलेल्या ठशाचे प्रतीक आहे.
द्विभाषिक माहितीपत्रके: प्रत्येक दिग्गजाच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी विशेष द्विभाषिक माहितीपत्रके जी संग्राह्य स्मृतीचिन्हे म्हणूनही काम करतील. ही माहितीपत्रके उपस्थितांना चित्रपट क्षेत्रातील या महान व्यक्तींच्या वारशाचे महत्त्व कथन करतील आणि त्यांची प्रशंसा मिळवतील.
गाण्यांचा कारवाँ: राज कपूर आणि मोहम्मद रफी यांच्याशी संबंधित 150 गाणी आणि तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव (ANR) यांच्याशी संबंधित 75 गाणी असलेला संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांना या कलाकारांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची ओळख करून देईल. भारतीय चित्रपटांच्या संगीतावर त्यांचा प्रभाव अधोरेखित करेल.
कलाकृती प्रदर्शन : राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या जीवनातील दुर्मिळ संस्मरणीय वस्तू, छायाचित्रे आणि कलाकृती असलेले प्रदर्शन प्रेक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा परिचय करून देईल.
संकल्पनेवर आधारित कार्यक्रम : प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला समर्पित केलेल्या दिवशी, संपूर्ण मनोरंजन क्षेत्रामध्ये संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे नियोजन केले गेले आहे . यामध्ये इमर्सिव ॲक्टिव्हिटी, डिजिटल डिस्प्ले, आकर्षक प्रश्नमंजुषा इत्यादींचा समावेश असेल.प्रेक्षकांना या दिग्गजांच्या चिरंतन वारशाची जाणीव करून देणे हा यामागचा हेतू आहे.
वालुकाशिल्पकला प्रदर्शन: शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून, कला अकादमीमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्याद्वारे दिग्गज कलाकारांना अभिवादन म्हणून वालुकामय कलाकृती साकारण्यात येणार आहे.
एक चिरंतन अभिवादन
कला, इतिहास आणि परस्परसंवाद यांच्या एकत्रिकरणाद्वारे राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचा वारसा आणि चित्रपट जगतावर अनंत काळापर्यंत राहणारा प्रभाव यांच्या अनुभूतीच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचा इफ्फीचा प्रयत्न राहील.
इफ्फी म्हणजे केवळ चित्रपटांचे प्रदर्शन आणि चित्रपटप्रेमींचे एकत्र येणे नव्हे! तर सार स्वरूपात, जगभरातील प्रेक्षक आणि कलाकारांना त्यांच्या सदाबहार वारशाने सतत प्रेरणा देणाऱ्या अनेक चित्रतपस्वींच्या यशाचा आनंद साजरा करून आणि त्यांचा सन्मान करून प्रेक्षकांना त्यांच्या चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी देणे हा या महोत्सवाचा हेतू आहे.