संगीत रंगभूमीने रसिकांना आत्मानंद दिला : निर्मला गोगटे
पुणे : सुमारे 181 वर्षांची परंपरा लाभलेल्या संगीत रंगभूमीने रसिकांना आत्मानंद दिला. यातूनच संगीत कला लोकाभिमुख झाली आणि रंगभूमीला प्रतिष्ठा लाभली, असे प्रतिपादन संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेत्री, विदुषी निर्मला गोगटे यांनी केले. विष्णुदास भावे यांच्या कल्पक प्रयत्नांनी काही तरी नवल वर्तले अशी घटना घडली. या संगीत नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून विष्णुदास भावे यांच्या कर्तृत्वाचे स्मरण होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सुमारे 130 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे पुणेकर रसिकांच्या आग्रहास्तव दिवाळीनिमित्त संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. 5) रंगभूमीदिनाचे औचित्य साधून विदुषी निर्मला गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी गोगटे बोलत होत्या. लोकमान्य मल्टिपर्पज सोसाटीचे संस्थापक किरण ठाकूर, ज्येष्ठ अभिनेत्री ईला पवार, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. दि. 5 ते दि. 7 नोव्हेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विद्याधर गोखले लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग झाला.
बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र आणि गुरुवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकांचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
भरत नाट्य मंदिराच्या कार्याचे कौतुक करताना गोगटे म्हणाल्या, भरत नाट्य मंदिराने अखंडितपणे रंगभूमीची सेवा केली आहे. येथील सभागृहाची रचना अतिशय उत्तम असल्याने येथे नाट्यप्रयोग हमखास रंगतो. या रंगभूमीला भरतमुनींचा आशीर्वाद लाभला आहे. पुणेकर रसिकांनी संगीत नाट्य महोत्सवाचा आग्रह धरला ही अतिशय आनंददायी आणि कौतुकास्पद बाब आहे.
किरण ठाकूर म्हणाले, संगीत नाट्य परंपरा जपली गेली पाहिजे. मराठी माणूस नाट्यवेडा आहे. मराठी रंगभूमीवरती एकापेक्षा एक सरस नाट्यकर्मी घडत आहेत. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी आपल्या बरोबर नाटक घेऊन गेला आहे. आजच्या काळात रसिक पुन्हा एकदा संगीत नाट्य रंगभूमीकडे आकर्षित होण्याची गरज आहे. भरत नाट्य मंदिराच्या कार्याचे कौतुक करून किरण ठाकूर यांनी भरत नाट्य मंदिरास पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली आणि मराठी संगीत रंगभूमीला वैभावाचे दिवस यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
ईला पवार यांनी रंगभूमीदिनानिमित्त कलाकार आणि नाट्य रसिकांना शुभेच्छा दिल्या.
अभय जबडे यांनी प्रास्ताविकात संगीत नाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. मान्यवरांचा सत्कार पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते झाला.