मुंबई-महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या पंधरवड्यापूर्वी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते.पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर, ईसीआयने राज्य सरकारकडे महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी वर्मा एक होते. या शर्यतीत अन्य दोन वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार सिंघल आणि त्यांचा बॅचमेट रितेश कुमार यांचा सहभाग होता.
राज्यात आचार संहिता लागू झाल्यानंतर तब्बल 28 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 15 अधिकारी हे मुबंईतील होते. पोलिस महासंचालकांनी राज्यभरातील 300 हून अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. पण राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता आयपीएस संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक पद हे कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सर्वोच्च श्रेणीचे आयपीएस अधिकारी असतात. पोलिस दलाचे प्रशासन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. संजय वर्मा यांना जवळपास 30 वर्षांचा पोलिस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचा तपास आणि तिथून पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी राज्यात जवळपास दोन हजारांहून अधिक तज्ञांचा चमू तयार केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा त्यांचे कौतुकही करण्यात आले.