- घरोघरी जाऊन आबा बागुल यांनी घेतली माता भगिनींची भेट
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री आबा बागुल यांनी मंगळवारी पर्वती मतदारसंघातील माता भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या.
यावेळी सर्वांनी आबा बागुल यांना विजयी करण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला.’ आबा तुम्ही, ‘पर्वती’चे हिरा आहात, आणि तुम्हाला निवडणूक चिन्हही हिरा मिळाले आहे. हा शुभसंकेत असल्याच्या भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी आबा बागुल म्हणाले की, नागरिकांच्या या प्रतिसादामुळे विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, नागरिकांच्या या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. आता एकच निर्धार विजयाचा आहे, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
आबा बागुल यांनी मंगळवारी सकाळी प्रथम मार्केट यार्ड येथे फुल मार्केट, तरकारी मार्केट येथे भेट दिली. येत्या सहा महिन्यात येथील वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर मार्केट मध्ये आलेल्या शेतकऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसाठी लगेज काउंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी केवळ गाळेधारकच नव्हे तर भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी आबांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मार्केटयार्ड परिसराचा विकास तुमच्यामार्फत व्हावा अशी इच्छाही यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
मार्केटयार्ड भेटीनंतर बागुल यांनी संभाजी नगर, चव्हाण नगर, शंकर महाराज वसाहत येथे घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. आबा,आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहोत, आपण निश्चिंत रहा असा विश्वासही नागरिकांनी दिला. आबांची उमेदवारी हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे, आबा हे हिरा आहेत व ते विधानसभेत विजयी होऊनच जाणार असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
दरम्यान या भेटीगाठीनंतर बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांची व्यक्तिगत भेट घेतली. त्यावेळी शेकडो नागरिकांनीही गर्दी केली होती. आबा बागुल यांना विजयाच्या शुभेच्छा देत, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही यावेळी नागरिकांनी दिली.