सातारा:सातारा – पुणे – बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या तपासणीत सुमारे 95 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे या ठिकाणी क्रेटा कारमध्ये ही रोकड सापडली आहे. महामार्ग पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली असून ही रोकड नेमकी कुणाची? याचा तपास सातारा ग्रामिण पोलिस करत आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सातारा तालुका पोलिसांनी क्रेटा कारमधून (क्र. एम. एच. 48 सी. टी. 5239) 95 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच राजस्थानच्या मनोज गोयल व दिपू चव्हाण या 2 तरूणांना ताब्यात घेतले. या दोन्ही तरूणांची चौकशी केली असता त्यांनी ही रक्कम मुंबईहून कोल्हापूरला नेत असल्याचे सांगितले. कार मालकाचे नाव मुकेश कस्तुरचंद्र देवरा, (रा. गोकुळ प्लाझा, विरार वेस्ट , पालघर) आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर 27 ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी कारमधून 7 कोटी 53 लाख रूपये किंमतीचे 9 किलो सोने व 60 किलो चांदी जप्त केली होती. तत्पूर्वी, गुजरात पासिंगच्या बोलेरो गाडीतूनही 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळीच्या दोन दिवस आधी साताऱ्याजवळच्या आनेवाडी टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाने एका वाहनातून 34 लाखांचे सोने जप्त केले होते.