विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार सुनील टिंगरे
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघाला सुनील टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून त्यामुळे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केले.
वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ धानोरी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी मुळीक म्हणाले, गेल्या दहा वर्षातील विकास आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. यापुढील पाच वर्ष आम्ही दोघे आमदार म्हणून वडगाव शेरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊ, आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना असणारे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. महविकास आघाडीचे महिन्याला शंभर कोटींचा मलिदा गोळा करणारे सरकार नको आहे. महिला, शेतकरी, युवकांचे हित जोपासणारे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे. महाराष्ट्राच्या पुढील सरकारमध्ये वडगावशेरीचा विधानसभेत एक व विधान परिषदेत एक असे दोन आमदार असणार आहेत. अनेकांना माझी काळजी होती. परंतु जोपर्यंत एखादा मतदारसंघ कोणाला जाणार त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनाच तिकीट मागण्याचा अधिकार असतो. माझी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. सुनील टिंगरे यांना आमदार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा संदेश आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचा आहे.
आमदार सुनील टिंगरे यांनी विरोधाकांकडून पसरविण्यात येणार्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. विरोधक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष देऊ नये. महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले असून जगदीश मुळीक व मी दोघेही आमदार होणार आहोत. याबद्दल कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. प्रत्येक मतदारापर्यंत माहिती सरकारची कामे पोहोचवावीत, असे आवाहन टिंगरे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. महायुतीकडे विरोध करण्यासारखे काही नाही. त्यामुळे टिंगरे यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेला महत्त्व न देता जोरदार प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे बाळासाहेब जानराव म्हणाले, सुनील टिंगरे यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. नाराज असलेले माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे व अय्युब शेख यांचीही आम्ही समजूत काढू, असे जानराव यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग खेसे, अर्जुन गरुड, अशोक खांदवे, मंगेश गोळे, सतीश कुसमाडे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, अनिल टिंगरे, राहुल भंडारे, भगवान जाधव, अशोक कांबळे, उषा कळमकर, ऐश्वर्या जाधव तसेच, सतीश म्हस्के, नवनाथ मोझे, संतोष खांदवे, शशिकांत टिंगरे, मोहनराव शिंदे सरकार, सुनील टिंगरे, अर्जुन जगताप, चंद्रकांत जंजिरे, गुलाब पठारे, विकास पठारे, रवींद्र गलांडे, सुधीर गलांडे, कुलदीप शर्मा, आनंद सरोदे, सचिन टिंगरे, विनायक टिंगरे, रवी टिंगरे, बंडू खांदवे, दीपक शिर्के, मिलिंद खांदवे, रवींद्र देवकर, साहेबराव धापटे, शामा जाधव, दत्ता भालेराव, पदाधिकारी व कार्यकर्ते, धानोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.