Home Blog Page 570

खडकवासला विधानसभा मतदारसंघात वेबकास्टिंग कक्षाची यशस्वी कामगिरी

पुणे: येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत वेबकास्टिंग कक्षाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. निवडणुकीची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या कक्षाचे यशस्वी नेतृत्व नोडल अधिकारी वासुदेव कुटबेट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कुटबेट यांना मंडळ अधिकारी संदीप शिंदे यांनी सहकार्य केले, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुसंगत आणि प्रभावी ठरली.
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह वेबकास्टिंग) सुनिश्चित करण्यात आले. मतदान केंद्रांवर होणाऱ्या सर्व गतिविधींचे अचूक आणि पारदर्शक निरीक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गोंधळाची किंवा अनियमिततेची तात्काळ दखल घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. मतदान प्रक्रियेतील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग हे वेबकास्टिंग कक्षाच्या कार्यक्षमतेमुळे शक्य झाले.
या कक्षाने चुकता येणार नाहीत असे अचूक नियोजन केले होते. मतदान प्रक्रियेतील एकही घटक दुर्लक्षित न होईल याची काळजी घेतली गेली. स्थानिक प्रशासन व निवडणूक अधिकारी यांनी वेबकास्टिंग कक्षाच्या कार्याची विशेष प्रशंसा केली.
वेबकास्टिंग कक्षाच्या यशस्वी कामगिरीमुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली, ज्यामुळे नागरिकांमध्ये निवडणुकीसाठी विश्वास निर्माण झाला.

पैसे वाटप सब झूट, तावडेंवरच झाला हल्ला-:अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी -फडणविसांच्या ट्वीस्टने दिवसभरातील घडामोडींचे चित्रच पालटवले

नागपूर -विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप लावण्यात आले आहेत. विनोद दोषी नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने असे आरोप होत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी आहे. मागून मारलेला दगड पुढे कसा लागला, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर आरोप होतात. त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. कुठलाही पैसा, आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट विनोद तावडे आणि नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झाला आहे. उद्याचा दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकोसिस्टमने कव्हर फायरिंग केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विनोद तावडे या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप करण्यात आले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

10 किलोचा गोटा काचेच्या खिडकीवर मारला, तर ती खिडकी तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडल्यानंतर बोनेटला साधी स्क्रॅच देखील का आली नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहे. एकच गोटा गाडीत दिसला असून तो गोटा कारच्या मागील बाजुने मारलेला आहे. मागील बाजुने दगड मारला, तर तो मागे लागायला पाहिजे. तो समोर कसा लागला? मागून फेकलेला दगड गोल फिरून समोरुन लागणे, अशाप्रकारचा दगड फक्त रंजनीकांतच्या चित्रपटात फेकला जाऊ शकतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

एक किलोचा दगड लागल्यानंतर केवळ टाके पडले आहेत. त्यात कोणतेही मोठी जखम दिसत नाही. निवडणुकीत मुलाचा पराभव दिसू लागल्याने हा सर्व प्रकार घडवण्यात आला आहे. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशाप्रकारच्या स्टोरीला काल पवार साहेबांसह सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टम उपलब्ध करून दिली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुन्हा एक मराठा नेतृत्व संपवले, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप – सुषमा अंधारे

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असा थेट आरोपच सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टीका केली. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला… ! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असे म्हणत देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना विचारला.

आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा
कशाला निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या? उमेदवारी अर्ज, चिन्ह, स्क्रूटनीचे नाटक कशाला ..? आचारसंहितेच धाक फक्त विरोधकांना दाखवायचा? आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा आणि लगेचच फडणवीस विनोद तावडे यांचा शपथविधी करून टाका. उद्याचे मतदान, परवाच्या निकालाची वाट बघू नका, असा घणाघातही अंधारे यांनी केला.

मतदान साहित्यासह पथके मतदान केंद्रांकडे रवाना-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार

पुणे,दि.१९ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी चिंचवडमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण आज पार पडले असून सर्व पथके विहीत वेळेत मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार १३० अधिकारी, कर्मचारी नियुक्त आणि ४८ सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे. आज थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यापूर्वी सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार असून ५६४ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणारे १३५३ बॅलेट युनिट, ६७६ कंट्रोल युनिट आणि ७३३ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. ५६४ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २२५ बॅलेट युनिट, ११२ कंट्रोल युनिट आणि १६९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. यासोबतच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य देखील यावेळी सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी बसेस, जीप तसेच इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावर केंद्र क्रमांकाची माहिती दर्शविण्यात आली होती.

यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना नेमून दिलेल्या वाहनांमध्ये बसवून विहीत वेळेत केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले होते. साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथके देण्यात आली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
०००

गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, मी मरणार नाहीआणि तुम्हाला सोडणारही नाही, डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा इशारा

0

नागपूर-राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर काल हल्ला करण्यात आला होता. अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपुरातील उपचार करण्यात आले. अनिल देशमुख यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले होते. त्यांच्यावर काटोलच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

पुणे दि.१९: पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दमछाक होत हे पथक पोहोचले. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता मतदान साहित्य वाटपास सुरूवात झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.

भोर येथे सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप करण्यात आले. या मतदान केंद्रावर लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या बॅकपॅकचे वितरण डॉ. खरात यांच्या हस्ते मतदान कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावर असलेले मतदान केंद्र असून १६० मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भोरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. रायरीमार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत १८ किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येते.

मतदान कर्मचाऱ्यांनी हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, असेही डॉ. खरात म्हणाले.

पर्वतीत भाजपकडून पैसे वाटपाचा आरोप करत मविआ उमेदवाराचा पोलीस ठाण्यापुढे ठिय्या

पुणे-पर्वती मतदारसंघात इंदिरानगर भागात भाजपचा एक कार्यकर्ता मतदानाच्या स्लिप व पैसे वाटत असल्याचा आराेप आघाडीच्या उमेदवार अश्वीनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी केला आहे. याप्रकरणी दाेषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पाेलिस ठाण्यासमाेर ठिय्या आंदाेलन केले.

नितीन कदम यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्याला माहिती मिळाली कि भाजपा चा एक कार्यकर्ता इंदिरानगर परिसरात पैसे वाटप करत आहे. संबंधित व्यक्ती हा मतदानाची स्लिप साेबत पैसे नागरिकांना देत असल्याने आपण सदर ठिकाणी गेलो . त्यावेळी सदर व्यक्तीकडे त्यांनी विचारपूस करत, खिशातील पैसे दाखव असे सांगत त्याला अडवून धरले. त्यानंतर सदर व्यक्ती आपल्याला धक्काबुक्की करून पळून गेला.

याबाबत आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम म्हणाल्या, निवडणुक ही लाेकशाहीचा उत्सव असून ती पारदर्शकपणे झाली पाहिजे. पैसे वाटप सुरु असेल तर पाेलिस यंत्रणा कमकुवत पडल्याचे दिसून येते. ही निवडणुक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी निवडणुक अधिकारी यांच्याकडे आम्ही पूर्वसूचना देऊन लेखी पत्र देखील दिले हाेते. गुंडशाही वापर, पैसे वाटप करुन निवडणुक हाेत असेल तर ते चुकीचे आहे. पाेलिस कुठे गस्त घालताना दिसत नाही. पाेलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पैसे वाटप सुरु असेल तर पाेलीसांनी कितपत काम केले दिसून येत आहे. पर्वती मतदारसंघात पाेलिस यंत्रणा गस्त घालताना दिसले पाहिजे कारण हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अाहे. मतदानाचे प्रचंड कामकाज असताना भाजपकडून गुंड दहशत करुन पैसे वाटप करत असेल तर हा संविधान व लाेकशाहीचा अपमान अाहे.

राज्यात सत्ताधारी भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का?: सचिन सावंत.

निवडणुकीत भाजपा युतीकडून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर, प्रचार संपल्यानंतरही भाजपा नेते विरारमध्ये काय करत होते.

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. लोकशाही व संविधानाचा गळा घोटून सत्ताधारी पक्ष साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर खुलेआमपणे करत आहेत. सर्वात आश्चर्याची व गंभीर बाब म्हणजे हे सर्व घडत असताना पोलीस दल व निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का? असा सवाल करून भाजपा नेते विनोद तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे धरू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी दिला आहे.

विरार प्रकरणी टिळक भवनमध्ये बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व युतीने विधानसभा निवडणुकीत लाजलज्जा सर्वकाही सोडली असून खुलेआमपणे पैशांचे वाटप केले जात आहे. शिंदेसेनेच्या एका आमदाराशी संबधित वाहनात मोठी रक्कम वाहनात सापडली पण त्याचे पुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटत केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता विरारमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचे पैसे वाटण्याचे प्रकरण उघड झाले आहे. सत्तातुराणां न भय न लज्जा! अशी भारतीय जनता पक्षाची वर्तणूक आहे. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपा व सत्ताधारी पक्ष पैशाचा वापर करून लोकशाहीचे धिंडवडे काढत आहेत.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरील कोणताही नेता दुसऱ्या मतदारसंघात राहू शकत नाही असे असताना विनोद तावडे काल संध्याकाळ पासून विरारमध्ये काय करत होते, हा प्रश्न आहे. तावडेंवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२६ नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे, या कायद्यानुसार दोषीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक अधिकारी स्वतंत्र व निष्पक्षपाती भूमिका घेत नाहीत हा आमचा आक्षेप आहे. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शक, निर्भय व निष्पक्षपातीपणे पार पडावा यासाठी निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची असून तसे त्यांनी कृतीतून दाखवावे, असेही सचिन सावंत म्हणाले.

फडणवीस यांची ही “लाडका विनोद” योजना आहे का? – कॅांग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा उपरोधक सवाल ?

पुणे-ना मै खाउंगा ना किसीको खाने दूंगा अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदीजींच्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस यांनी “ लाडका विनोद “ अशी काही योजना सुरू केली आहे का अशी खोचक प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली आहे. १९८७ साली स्व. बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्माचा प्रचारात वापर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षाकरीता काढून घेतला होता. तसा तावडे यांचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरणही वॅाशींग मशीनमधे घालून क्लिन चिट देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. स्व. अ. बि. बाजपेयी, शा. प्र. मूखर्जी , दि.द. उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजप ला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी “चिक्की पासून नाचक्की “ ची सुरवात करत कुठे नेवून ठेवला आहे हा भाजप असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

विनोद तावडेंना तात्काळ अटक कराः रमेश चेन्नीथला

पराभवाच्या भितीने भाजपाकडून राज्यभरात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न

निवडणूक आयोगाने तावडेंसह भाजपावरही कारवाई करावी

मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२४
भारतीय जनता पक्ष आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. आज वसई विरार येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून १० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पण अद्याप तावडे यांना अटक केली नाही. प्रचार संपल्यानंतर नियमानुसार मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती थांबू शकत नाही पण तावडे यांनी वसई विरारला जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आचारसंहिता भंग केल्याचे मान्य केले आहे. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. फक्त वसई विरारच नाही तर राज्यभरात भाजपा आणि महायुतीकडून पैसे वाटून जनमत विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरात सुरु असलेल्या पैसे वाटपावर कारवाई करून पैसे वाटणा-यांना अटक करावी तरच निष्पक्ष निवडणुका पार पडतील असे चेन्नीथला म्हणाले.

भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावीः बाळासाहेब थोरात

प्रचार संपल्यावर आचारसंहिता आणि नियम मोडून वसई विरार मध्ये पैसे वाटप सुरु असताना आयोगाचे अधिकारी आणि पोलीस काय करत होते?

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. आज वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जवळपास १० लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे पण कुणालाही अटक केली नाही. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील नेत्यांनी व स्टारप्रचारकांनी मतदारसंघात थांबण्यास कायद्याने मनाई असतानाही तावडे वसई विरार मध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कालच नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत पण दुर्देवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

विनोद तावडे प्रकरण हे भाजप, महायुतीमधील गँगवॉर:उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे प्रकरण भाजप किंवा महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावा करत भाजपचा नोट जिहाद असल्याची टीका केली आहे. महायुतीचे लोक राज्यात अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. ते जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात आहेत. या प्रकरणी सर्व पुरावे असतानाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रच उद्या काय ती कारवाई करेल, असे ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विनोद तावडे यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने पाहिला पाहिजे. काल अनिल देशमुख यांचे डोके आपोआप फुटले. आज पैसे वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादुचे पैसे कुठून आले? ते कुणाच्या खिशात जात होते? मी तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतील पैसे कोण तपासणार? निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग पत्करावा लागेल.

निवडणूक आयोगाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण गुन्हा दाखल व आरोपी फरार होता असे होता कामा नये. कदाचित हे यांच्यातील गँगवॉर असेल. याविषयी मला काही ठिकाणाहून माहिती मिळाली आहे. काल नाशिकमध्ये त्यांच्यापैकी एका पक्षाने पैसे वाटल्याची माहिती आहे. त्यामुळे कायदा सर्वांना समान असेल तर निवडणूक आयोगाने या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई केली पाहिजे.

ठाकरे म्हणाले, विनोद तावडे हे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकारे कशी पाडली? व कशी स्थापन केली? याचा सुद्धा हा पुरावा आहे. ज्या जागृतपणे ज्यांनी कुणी हे कट कारस्थान उजेडात आणले, त्यांचे या प्रकरणी कौतुक झाले पाहिजे. विनोद तावडे प्रकरण हे भाजप किंवा महायुतीमधील अंतर्गत गँगवॉर असू शकेल. हितेंद्र ठाकूर यांनी तसे संकेत दिलेत. महायुतीच्या योजना कशा फसव्या आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले पाहिजे. एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्यांच्या थप्या जात आहेत हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी हे प्रकरण महायुतीचा नोट जिहाद असल्याचीही टीका केली. हा भाजप, मिंधे व अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? विनोद तावडे यांना पीएचडी मिळाली पाहिजे. त्यांनी काही राज्यांत सरकार पाडले व स्थापन केले. त्याचे गुपित काय आहे ते आज उघड झाले. भाजपचा हा नोट जिहाद आहे. त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

भाजपने निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. पण आता हे पाहून ‘पैसा बाटेंगे और जितेंगे’ असे त्यांचे काही सुरू असल्याचा संशय येतो. या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. महाराष्ट्र या प्रकरणाचा काय तो निर्णय घेईल. महायुतीचे लोक अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. जिंकण्यासाठी वाट्टेल त्या पातळीवर ते जात आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर हल्ला झाला, तो कुणी केला याचे उत्तर मिळतच नाही. सर्व पुरावे असतानाही या प्रकरणी कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र उद्या काय तो कारवाई करेल, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले,पैशांसंदर्भात FIRची नोंद नाही, भाजप नेत्याने टीप दिल्याचा दावा खोटा

मुंबई-माझी प्रतिमा मलिन व्हायचे कारण नाही, कारण पैशाचा विषय माझा नाही. पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. भाजपच्या लोकांनी टीप दिली, हे हितेंद्र ठाकुर धादांत खोटे सांगत आहेत. टीप दिल्याचा दावा हा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडे यांनी दिले. ते आज सायंकाळी माध्यमांशी बोलत होते. कुणाला शंका असल्यास तुम्ही चौकशी करावी, सीसीटीव्ही तपासावे, असेही विनोद तावडे म्हणाले.

विनोद तावडे म्हणाले, वसई येथील घटनेसंदर्भात तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. मी आणि हितेंद्र ठाकुर दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतल्यामुळे एक, माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो हा दुसरा आणि हितेंद्र ठाकुरही त्यांचा मतदारसंघ नसताना तिथे आले, याबाबत तिसरा एफआयआर नोंद झाला आहे. मात्र, पैशाचा एकही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पैशांसंदर्भातल्या सर्व बातम्या खोट्या आहेत.

पुढे बोलताना विनोद तावडे यांनी हिंतेंद्र ठाकुर यांच्या टीपच्या विधानावरही भाष्य केले. भाजपच्या नेत्याने टीप दिल्याचे हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटले होते, मात्र हे धादांत खोटे आहे. त्यात काही तथ्य नाही, असे तावडे यांनी सांगितले. तुम्हाला शंका आली असेल, तर तुम्ही पैसे तपासा, हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासा. जे मिळेल ते करा, माझे काही म्हणणे नाही, असे तावडे म्हणाले.

दरम्यान, विनोद तावडे यांचे वसई येथील घटनेबाबत निवेदन जाहीर केले आहे. त्या ते म्हणाले की, वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजप उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला. हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली.

हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी व सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असे विनोद तावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

पैसे वाटप आणि हल्ले: निवडणुकीतील गुन्हेगारीला तातडीने पायबंद घाला- अंकुश काकडे

पुणे-निवडणुकीतील गुन्हेगारीला तातडीने पायबंद घाला अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भात काकडे म्हणाले,’ आज पुणे शहरात वडगाव शेरी मतदार संघातील माजी नगरसेविका सुरेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर धानोरी येथे ४ अज्ञात इसमाने हल्ला केला त्यात श्री चंद्रकांत टिंगरे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलीस त्या ठिकाणी तक्रार घेण्यामध्ये चाल ढकलपणा करीत आहेत. तसेच पर्वती मतदारसंघांमध्ये बिबेवेवाडी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उघड उघड पैशाचे वाटप करीत आहेत. तेथील उमेदवार अश्विनी कदम यांनी संबंधितांविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण त्यावर ही कारवाई केली जात नाही. अशाच प्रकारच्या घटना इतर मतदारसंघांमध्ये पोलीस खात्याकडून नोटीसा दिल्यात कार्यकर्त्यांना नोटीस दिले जात आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ सौ वंदना चव्हाण,श्री अरविंद शिंदे, श्री अंकुश काकडे श्री संजय मोरे, श्री बापूसाहेब पठारे, सौ अश्विनी कदम,सौ रेखा टिंगरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत त्वरित कडक कारवाई करावी,अशी मागणी केली. उद्या मतदान संपेपर्यंत सर्व मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी केली.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला

पुणे-वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणारे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.

सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देऊन यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडी दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.चंद्रकांत टिंगरे यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती बापूसाहेब पठारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळताच चंद्रकांत टिंगरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात केली. या हल्लेखोरांचा पोलीस तपास करीत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे म्हणाले की, निवडणूक मतदानाला काही तास उरले आहे. वडगावशेरी भागातील महत्वाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत. ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, अशा शब्दात या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला.