मुंबई- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असा थेट आरोपच सुषमा अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीवर टीका केली. भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला… ! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवले, असे म्हणत देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना विचारला.
आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा
कशाला निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या? उमेदवारी अर्ज, चिन्ह, स्क्रूटनीचे नाटक कशाला ..? आचारसंहितेच धाक फक्त विरोधकांना दाखवायचा? आजच तुमचे सरकार झाले हे जाहीर करा आणि लगेचच फडणवीस विनोद तावडे यांचा शपथविधी करून टाका. उद्याचे मतदान, परवाच्या निकालाची वाट बघू नका, असा घणाघातही अंधारे यांनी केला.