नागपूर -विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप लावण्यात आले आहेत. विनोद दोषी नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने असे आरोप होत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम-जावेदची स्टोरी आहे. मागून मारलेला दगड पुढे कसा लागला, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यावर आरोप होतात. त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. कुठलाही पैसा, आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट विनोद तावडे आणि नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झाला आहे. उद्याचा दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकोसिस्टमने कव्हर फायरिंग केले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विनोद तावडे या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही, वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणून-बुजून आरोप करण्यात आले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
10 किलोचा गोटा काचेच्या खिडकीवर मारला, तर ती खिडकी तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडल्यानंतर बोनेटला साधी स्क्रॅच देखील का आली नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहे. एकच गोटा गाडीत दिसला असून तो गोटा कारच्या मागील बाजुने मारलेला आहे. मागील बाजुने दगड मारला, तर तो मागे लागायला पाहिजे. तो समोर कसा लागला? मागून फेकलेला दगड गोल फिरून समोरुन लागणे, अशाप्रकारचा दगड फक्त रंजनीकांतच्या चित्रपटात फेकला जाऊ शकतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.
एक किलोचा दगड लागल्यानंतर केवळ टाके पडले आहेत. त्यात कोणतेही मोठी जखम दिसत नाही. निवडणुकीत मुलाचा पराभव दिसू लागल्याने हा सर्व प्रकार घडवण्यात आला आहे. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशाप्रकारच्या स्टोरीला काल पवार साहेबांसह सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टम उपलब्ध करून दिली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.