पुणे-पर्वती मतदारसंघात इंदिरानगर भागात भाजपचा एक कार्यकर्ता मतदानाच्या स्लिप व पैसे वाटत असल्याचा आराेप आघाडीच्या उमेदवार अश्वीनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी केला आहे. याप्रकरणी दाेषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी पाेलिस ठाण्यासमाेर ठिय्या आंदाेलन केले.
नितीन कदम यांनी असे म्हटले आहे कि,’आपल्याला माहिती मिळाली कि भाजपा चा एक कार्यकर्ता इंदिरानगर परिसरात पैसे वाटप करत आहे. संबंधित व्यक्ती हा मतदानाची स्लिप साेबत पैसे नागरिकांना देत असल्याने आपण सदर ठिकाणी गेलो . त्यावेळी सदर व्यक्तीकडे त्यांनी विचारपूस करत, खिशातील पैसे दाखव असे सांगत त्याला अडवून धरले. त्यानंतर सदर व्यक्ती आपल्याला धक्काबुक्की करून पळून गेला.
याबाबत आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम म्हणाल्या, निवडणुक ही लाेकशाहीचा उत्सव असून ती पारदर्शकपणे झाली पाहिजे. पैसे वाटप सुरु असेल तर पाेलिस यंत्रणा कमकुवत पडल्याचे दिसून येते. ही निवडणुक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी निवडणुक अधिकारी यांच्याकडे आम्ही पूर्वसूचना देऊन लेखी पत्र देखील दिले हाेते. गुंडशाही वापर, पैसे वाटप करुन निवडणुक हाेत असेल तर ते चुकीचे आहे. पाेलिस कुठे गस्त घालताना दिसत नाही. पाेलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पैसे वाटप सुरु असेल तर पाेलीसांनी कितपत काम केले दिसून येत आहे. पर्वती मतदारसंघात पाेलिस यंत्रणा गस्त घालताना दिसले पाहिजे कारण हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अाहे. मतदानाचे प्रचंड कामकाज असताना भाजपकडून गुंड दहशत करुन पैसे वाटप करत असेल तर हा संविधान व लाेकशाहीचा अपमान अाहे.