पुणे दि.१९: पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दमछाक होत हे पथक पोहोचले. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथील मतदान साहित्य वाटप केंद्रावरून आज मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता मतदान साहित्य वाटपास सुरूवात झाली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
भोर येथे सर्वप्रथम रायरेश्वर पठारावर असलेल्या मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप करण्यात आले. या मतदान केंद्रावर लोखंडी शिडीच्या सहाय्याने पोहोचावे लागत असल्याने भारत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या बॅकपॅकचे वितरण डॉ. खरात यांच्या हस्ते मतदान कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
रायरेश्वर हे पुण्यातील सर्वांत उंचावर असलेले मतदान केंद्र असून १६० मतदारांसाठी या मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भोरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी रायरेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाता येते. रायरीमार्गे रायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत १८ किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यानंतर एक तास पायी वाटचाल करून लोखंडी शिडीच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येते.
मतदान कर्मचाऱ्यांनी हे अंतर पूर्ण करून मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविले. देशाच्या प्रत्येक पात्र मतदाराला लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी होता यावे यासाठी या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. जिल्ह्यासह राज्याच्या इतरही भागात मतदान कर्मचारी अशा विविध आव्हानांचा सामना करीत नागरिकांना या उत्सवात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात, असेही डॉ. खरात म्हणाले.