नागपूर-राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर काल हल्ला करण्यात आला होता. अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपुरातील उपचार करण्यात आले. अनिल देशमुख यांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या घटनेत अनिल देशमुख हे जखमी झाले होते. त्यांच्यावर काटोलच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.