मुंबई- उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे प्रकरण भाजप किंवा महायुतीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावा करत भाजपचा नोट जिहाद असल्याची टीका केली आहे. महायुतीचे लोक राज्यात अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. ते जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात आहेत. या प्रकरणी सर्व पुरावे असतानाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रच उद्या काय ती कारवाई करेल, असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विनोद तावडे यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओ निवडणूक आयोगाने पाहिला पाहिजे. काल अनिल देशमुख यांचे डोके आपोआप फुटले. आज पैसे वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादुचे पैसे कुठून आले? ते कुणाच्या खिशात जात होते? मी तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. मग यांच्या बॅगेतील पैसे कोण तपासणार? निवडणूक आयोगाने यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग पत्करावा लागेल.
निवडणूक आयोगाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण गुन्हा दाखल व आरोपी फरार होता असे होता कामा नये. कदाचित हे यांच्यातील गँगवॉर असेल. याविषयी मला काही ठिकाणाहून माहिती मिळाली आहे. काल नाशिकमध्ये त्यांच्यापैकी एका पक्षाने पैसे वाटल्याची माहिती आहे. त्यामुळे कायदा सर्वांना समान असेल तर निवडणूक आयोगाने या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई केली पाहिजे.
ठाकरे म्हणाले, विनोद तावडे हे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकारे कशी पाडली? व कशी स्थापन केली? याचा सुद्धा हा पुरावा आहे. ज्या जागृतपणे ज्यांनी कुणी हे कट कारस्थान उजेडात आणले, त्यांचे या प्रकरणी कौतुक झाले पाहिजे. विनोद तावडे प्रकरण हे भाजप किंवा महायुतीमधील अंतर्गत गँगवॉर असू शकेल. हितेंद्र ठाकूर यांनी तसे संकेत दिलेत. महायुतीच्या योजना कशा फसव्या आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले पाहिजे. एका बाजूला बहिणीला 1500 आणि यांना मात्र थप्यांच्या थप्या जात आहेत हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी हे प्रकरण महायुतीचा नोट जिहाद असल्याचीही टीका केली. हा भाजप, मिंधे व अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? विनोद तावडे यांना पीएचडी मिळाली पाहिजे. त्यांनी काही राज्यांत सरकार पाडले व स्थापन केले. त्याचे गुपित काय आहे ते आज उघड झाले. भाजपचा हा नोट जिहाद आहे. त्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.
भाजपने निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. पण आता हे पाहून ‘पैसा बाटेंगे और जितेंगे’ असे त्यांचे काही सुरू असल्याचा संशय येतो. या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. महाराष्ट्र या प्रकरणाचा काय तो निर्णय घेईल. महायुतीचे लोक अत्यंत निर्घृणपणे राजकारण करत आहेत. जिंकण्यासाठी वाट्टेल त्या पातळीवर ते जात आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर हल्ला झाला, तो कुणी केला याचे उत्तर मिळतच नाही. सर्व पुरावे असतानाही या प्रकरणी कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र उद्या काय तो कारवाई करेल, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.